बाराव्या दिवशी यात्रा ३०४९ मी. उंचीवरील गरोली पाताळ या ठिकाणी येते. हे अंतरसुद्धा १०-११ कि.मी. आहे. तेराव्या दिवशी यात्रेकरू कैलगंगेत स्नान करतात व ‘पातरनचौनिया’ या मुक्कामाकडे प्रस्थान करतात. हे अंतर १२ कि.मी. असून वाट अवघड व चढणीची आहे. पातरनचौनियाची उंची ३६५८ मी. आहे.
कोणतीही यात्रा ही संस्कृतीचे, रितीरिवाजाचे दर्शन आहे. श्रद्धायुक्त अंतःकरणाने परमेश्वरी चरणी लीन होण्यात मिळणारे सुख, समाधान व आनंद अवर्णनीय असतो. यालाच आपण परमेश्वराची कृपा म्हणतो. पण काहीवेळा उलटे चित्र दिसते. अशा अनेक कथा गोष्टीतून, लोकगीतातून ऐकायला मिळतात. ही अशीच एक कथा आहे चौदाव्या शतकात कनोजचा राजा यशधवल आपल्या गर्भवती पत्नीसहित या यात्रेत सहभागी झाला. त्याच्याबरोबर सैन्य व नृत्यांगना पण आल्या होत्या. हरिद्वार-ऋषीकेशमार्गे ते वाणला पोहोचले व यात्रेत सहभागी झाले. प्रचंड थंडी व श्रम विसरण्यासाठी त्यांना मद्यपानाची लहर आली. सर्वजण मद्यधुंद झाले. नृत्यांगना नाचू लागल्या. व्यभिचार सुरू झाला. यात्रेचे पावित्र्य संपले.
भाविक नाराज झाले. राजाला सांगणार तरी कोण? या व्यभिचारी व भ्रष्ट आचरणाने नंदादेवीचा कोप झाला. नृत्यांगनांचे रूपांतर दगडात झाले. आजही या ठिकाणी मोठे मोठे दगड विखरून पडलेले दिसतात. या ठिकाणचे नाव निराली धार होते ते बदलून पातर नचौनिया (वेश्यांचे नृत्यस्थान) असे पडले.
यात्रा पुढे चालू लागली. पण आलेल्या अनुभवाने सैनिकांना शहाणपण आले नाही. त्यांचे कामुक चाळे सुरूच होते. नंदादेवी रूष्ट झाली. निसर्गाने आपले रूप बदलले. यात्रा रूपकुंडला पोहोचली. पाऊस सुरू झाला. प्रचंड वादळ सुरू झाले. हिमपात सुरू झाला. पाहता पाहता सर्व सैन्य बर्फात गाडले गेले. आता फक्त त्यांचा आक्रोश कानी येत होता. काही वेळाने सर्व काही शांत झाले. भेदरलेले लोक तसेच स्तब्ध उभे होते. काय होत आहे, ते समजतच नव्हते.
क्रुद्ध नंदा शांत झाली. निसर्ग शांत झाला. निसर्गाचे हसरे रूप सर्वांना सुखावत होते. या मार्गावर वैतरणाकुंड म्हणून छोटे सरोवर आहे. सरोवराच्या काठावर नंदादेवीचे मंदिर आहे. या ठिकाणी यात्रेत मोक्ष पावलेल्या भाविकांना पिंडदान केले जाते. त्यांच्यासाठी प्रार्थना केली जाते.
चौदाव्या दिवशी यात्रा १६५०० फूट उंचावरील रूपकुंडला पोहोचते. हा मार्ग पूर्ण चढणीचा व बिकट आहे. नंदा व शिवाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्यभूमी! सर्व परिसर हिमाच्छदित! सरोवराचे पाणीसुद्धा बर्फाळ! पण सर्वांचे चेहरे आनंदाने उजळून निघतात. आत्मशांतीचे समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असते. स्वर्गीय आनंदाची सर्वांना अनुभूती होत असते. रूपकुंडजवळ नंदादेवीची व मेंढ्याची पूजाअर्चा होते. आरती होते. प्रार्थना होतात. प्रसाद वाटला जातो. सर्वजण आपले प्रतिबिंब सरोवराच्या पाण्यात पाहतात व शरीर देवतेला वंदन करतात.
या सरोवराच्या परिसरात व सरोवरात मानवी सांगाडे व हाडे मिळाली आहेत व अजूनही मिळतात. १९५५ साली काही अलंकारही या परिसरात मिळाले. यामुळे सर्व जगाचे लक्ष या सरोवराकडे वेधले गेले. खूप संशोधकांनी संशोधन केले. लेख व पुस्तके प्रसिद्ध झाली. १९५६ साली ही हाडे संशोधनासाठी अमेरिकेला पाठवली होती. डॉ. ग्रिफन यांनी निरनिराळ्या कसोट्या व कार्बन परीक्षणाद्वारे ही हाडे ५०० ते ६०० वर्षांपूर्वीची असावीत असे निदान काढले. पण ही हाडे व सांगाडे कुणाची आहेत व ती इथे कशी आली हे आजही समजलेले नाही. हे गूढ आजही उकललेले नाही. या सरोवराबद्दल बीबीसीने सुद्धा माहितीपट बनवले आहेत. जगात आज हे सरोवर ‘लेक ऑफ मिस्ट्री’ म्हणून ओळखले जाते.
पंधराव्या दिवशी यात्रा १७५०० फूट उंचीवरील ड्यूरांगली धार व शैलसमुद्र ग्लेशिअर ओलांडून होमकुंडला पोहोचते. हा या यात्रेतील अखेरचा व सर्वांत उंचीवरचा अवघड टप्पा आहे. प्रचंड वारा व थंडी, बेभरवशाचा निसर्ग! या सर्वावर नंदादेवीवरील प्रेम व श्रद्धा मात करते. हा दिवस नंदाष्टमीचा असतो.
होमकुंडापाशी श्रीयंत्राची व नंदाचे प्रतीक असलेल्या मेंढ्याची पूजा व आरती होते. यापुढे नंदा सर्वांना सोडून एकटीच आपल्या पतीच्या घरी जाणार असते. तिची जाण्याची वाट फक्त तिलाच माहिती आहे. मेंढ्याच्या पाठीवर नंदाचे अलंकार, वस्त्रभूषणे, भेटी, खाद्यपदार्थ ठेवण्यात येतात. नंदालापण माहेरचा विरह सहन होत नसतो. सर्वांचे डोळे भरून येतात. नंदा आपली वाटचाल सुरू करते. परत परत थांबून ती मागे वळून बघत असते. शून्य नजरेने सर्वजण हात जोडून उभे असतात. दूर जाणाऱ्या मेंढ्याकडे पाहत असतात. दूरवर लहान होत जाणारी ही आकृती शेवटी अदृश्य होते. अश्रूंचे बांध फुटतात. सर्वांचे सर्वकाही हरवलेले असते. नंदा आता परत कधी भेटणार हे फक्त नंदालाच माहीत आहे. सर्व वातावरण हृदयस्पर्शी झालेले असते.
गढवाल व कुमाऊँमध्ये नंदादेवी हे लोकमान्य दैवत आहे. खूप गावात नंदादेवीची मंदिरे आहेत. राजघराण्यांनीसुद्धा नंदादेवी हे आपले कुलदैवत मानले आहे. नंदादेवीला काली, कालिका देवी, पार्वती, शाकंबरी, चंद्रवदनी इ. नावांनीसुद्धा ओळखले जाते. नंदादेवीच्या कोणत्या न कोणत्या रूपाचे पूजन उत्तराखंडामध्ये कायम सुरू असते. विशेष उत्सव हा नंदाष्टमीला व नवरात्रात खूप उत्साहात साजरा केला जातो. नंदा ही आदिशक्ती आहे. ती उमा आहे. दुर्गा आहे. पार्वती आहे. शिवशक्ती आहे. अशा नंदाच्या सासरी पाठवण्याच्या यात्रेत सहभागी होण्याची संधी फक्त भाग्यवंताला, पुण्यवंताला लाभते. ही यात्रा धार्मिक, रोमांचकारी, साहसी व अत्यंत प्रतिष्ठेची आहे. पण ही यात्रा कधी सुरू झाली याचे नीट संदर्भ मिळत नाहीत. १५ व्या शतकात चंदराजा अजयपाल याने ही यात्रा सुरू केली असे सांगतात. काही लोकगीतांच्या आधारे ६ व्या शतकात ही यात्रा सुरू झाली असा निष्कर्ष निघतो. तर काही लोकगीते सांगतात की नवव्या शतकात चांदपूर गढीचा राजा शालीपाल याने आपले राजगुरू नौटियाल यांच्या गावी म्हणजे नौटी या ठिकाणी आपल्या इष्टदेवीचे म्हणजे नंदादेवीचे श्रीयंत्र स्थापन करून मंदीर बांधले व पूजेचे सर्व हक्क त्यांना देऊन या यात्रेचे सर्व नियम सांगितले. तसेच यात्रेची रूपरेषा ठरवली. त्यावेळपासून या यात्रेचे आयोजन नौटीहून केले जाते. नौटीच्या यात्रा कमिटीकडे २०० वर्षापासूनचा या यात्रेचा इतिहास उपलब्ध आहे.
आध्यात्मिक चेतना, सांस्कृतिक विरासत यांचे प्रतीक असलेली ही नंदराज जट यात्रा म्हणजे विशाल हिमालयाचे सुरम्य दर्शन घडवणारी हिंदू धर्मावरील श्रद्धा व विश्वास प्रगट करणारी यात्रा आहे. एकवीस दिवसात जवळजवळ २८० कि.मी. अंतर प्रतिकूल वातावरणात सुद्धा होणारी ही पदयात्रा जगातील सर्वात मोठी धार्मिक यात्रा असेल. या यात्रेवर सुद्धा बीबीसीने माहितीपट बनवले आहेत. ही यात्रा हिमालयाच्या दुर्गम पर्वतराजीतील महाकुंभ म्हणून सुद्धा ओळखली जाते.
आजपर्यंत या यात्रेच्या आयोजनाचा निश्चित असा काळ नव्हता. विसाव्या शतकात ही यात्रा १९०५, १९२५, १९५१, १९६८, २००० साली आयोजित केली होती. १९६८ सालची यात्रा प्रतिकूल हवामानामुळे पूर्ण होऊ शकली नाही. हल्लीच्या काळात १८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०१४ या दरम्यान या यात्रेचे आयोजन केले होते. आता मात्र कुंभमेळ्याप्रमाणे दर बारा वर्षांनी या यात्रेचे आयोजन करण्याचा एक प्रस्ताव यात्रा कमिटीपुढे आहे.
नंदादेवी हे उत्तराखंड राज्यातील लोकदैवत आहे. नंदादेवी हा पार्वतीमातेचा अवतार असेच तिचे रूप पाहिले जाते. तिने हिमालयाची पत्नी ‘मेना’ हिच्या उदरी जन्म घेतला म्हणून तिला शैलपुत्री असेही ओळखले जाते. उत्तराखंडातील लोक तिला आपल्या मुलीसारखे मानतात. नौटी, चांदपूर, करूड, कुलसारी, हेलंग, लाट, निती इ. ठिकाणी नंदादेवीची पुरातन मंदिरे आहेत. भारतातील हिमालयाचे सर्वोच्च उंचीचे दुसरे शिखर नंदादेवी म्हणून ओळखले जाते.
पण भारतात इतरत्र कुठेही नंदादेवीची मंदिरे पहायला मिळत नाहीत. पुराणानसुद्धा नंदादेवीचे उल्लेख कुठेही मिळत नाहीत. तसेच नंदादेवीच्या मूर्तीसुद्धा कोणत्याही पुरातन मंदिरात दाखवल्या जात नाहीत. मथुरेत आढळलेल्या काही देवीच्या मूर्तीपैकी एक मुर्ती ‘एकनांश’ देवी म्हणून दाखवली जाते. काहींच्या मते हीच देवी नंदादेवी म्हणून ओळखली गेली. तर काहींच्या मते मथुरेत जेव्हा श्रीकृष्णाचा जन्म झाला तेव्हा योगमायेने गोकुळात नंदराजाच्या पोटी जन्म घेतला. भगवंताने वसुदेवाला दोघांची अदलाबदल करायला सांगितली. त्याप्रमाणे वसुदेवाने श्रीकृष्णाला गोकुळात ठेवून नंदपुत्रीला मथुरेला घेऊन आला. जेव्हा कंस या मुलीला मारायला आला तेव्हा ती कंसाच्या हातून सुटली व तिने आपले मूळ स्वरूप प्रगट केले. योगमायेचे हे रूप म्हणजेच नंदादेवी! तर काही लोककथा सांगतात की नंदा ही अल्मोड्याच्या चांद घराण्यातील राजकन्या होती.
एकूणच नंदादेवी या देवतेबद्दल नीट माहिती किंवा तिचे माहात्म्य समजत नाही. काहीही असो, श्रद्धेपेक्षा श्रेष्ठ असे काहीच नाही.
नंदादेवी गढवाल-कुमाऊँ क्षेत्रात इष्टदेवी म्हणून पुजिली जाते. तिचे जागर साजरे केले जातात. काही मिळालेल्या ताम्रपटावरून कत्युरी राजाची ही इष्ट देवता होती, असे स्पष्ट होते. आजही गढवाल-कुमाऊँमध्ये भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षात गावोगावी, घरोघरी नंदादेवीचे उत्सव साजरे होतात. सलग सात दिवस हा उत्सव साजरा केला जातो. त्यावेळी नंदाचे माहेराविषयीचे प्रेम व सासरी जाताना होणारे दु:ख गाण्यातून प्रगट केले जाते. हे ऐकताना लोक विशेषत: स्त्रिया व मुली खूप भावनाविवश होतात. हा जागर ‘भित्तलपत्ती’ म्हणून सुद्धा ओळखला जातो.
नंदादेवी व हिमालयाच्या दुर्गम भागात १५-२० वर्षांनी होणारी ही नंदराज जाट यात्रा खूपजणांना माहीतही नाही. पण संस्कृतीचा हा अमूल्य ठेवा सर्वांना समजला पाहिजे, म्हणूनच हा प्रपंच!
-प्रकाश लेले
Leave a Reply