वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळं लहान वयातच नंदू पोळ यांचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला. ‘साष्टांग नमस्कार’ या नाटकातून त्यांनी अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. नंदू पोळ यांनी अनेक चित्रपट, मालिका तसेच नाटकातून आपल्या अभिनयाचे प्रेक्षकांची मने जिंकली होती.
नंदू पोळ यांची लहानखुरी मूर्ती ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाच्या प्रारंभीच ‘श्री गणराय नर्तन करी’ या नांदीत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असे. ‘गाढवाचं लग्न’ या सिनेमातील ‘राजा’च्या भूमिकेला वेगळी ओळख नंदू पोळ यांनी मिळवून दिली.
सिंहासन, सामना, एक होता विदूषक, नागिन, एक डाव भुताचा, कथा दोन गणपतरावांची, पक पक पकाक, दुर्गे दुर्गट भारी, गाढवाचं लग्न, इसराल गावाची इसराल माणसे, हसतील त्यांचे दात दिसतील या चित्रपटांतून त्यांनी काम केले होते. अनेक टीव्ही सीरियल्स आणि मालिकातूनही त्यांनी अभिनयाची चुणूक दाखवली.
नाजुका, प्रवासी, अडोस-प़डोस, मुक्ती, पिंपळपान, अकलेचे तारे, कायपालट यासारख्या मालिका-टीव्ही सीरियल्समध्येही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. मराठीप्रमाणेच हिंदी, कन्नड, गुजराती चित्रपट मालिकांतही त्यांनी काम केले.
डॉ. जब्बार पटेल, सई परांजपे, मणी कौल, अरुण खोपकर, स्मिता तळवलकर हे दिग्दर्शक तसेच डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, ओम पुरी, नसिरुद्दीन शहा, मोहन आगाशे, नाना पाटेकर, अशोक सराफ यांच्यासोबत त्यांनी दीर्घकाळ काम केले.
मराठी रंगभूमीच्या इतिहासात अनन्यसाधारण स्थान असणाऱ्या थिएटर अकॅडमीचे ते संस्थापक सदस्य आणि २० वर्षे कार्यकारी सदस्य होते. नंदू पोळ यांनी देशात अडीच हजार, तर परदेशात शेकडो नाट्यप्रयोग केले. स्वत:चा कलाप्रवास त्यांनी ‘मी, नंदू पोळ’ या पुस्तकातून उलगडला आहे.
पोळ उत्तम ध्वनिमुद्रणतज्ज्ञ होते. त्यांच्यातल्या उत्तम ध्वनिमुद्रणतज्ज्ञतेमुळे गणेशोत्सवात मंडळांच्या देखाव्यांमागील शब्द- स्वर ध्वनिमुद्रित करण्यासाठी ते रात्र- रात्र कष्ट करत. नंदू पोळ यांनी स्वत:चा स्टुडिओही काढला होता. नंदू पोळ यांचे २८ जुलै २०१६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply