नवीन लेखन...

नारदमुनींची महाराष्ट्रभेट

नारदमुनी म्हणजे आद्यपत्रकार ! पंचमहाभूतांमधील बातम्या मिळवून वर्तमान गरजेप्रमाणे त्या-त्या देवाच्या कानावर घालायची अलिखीत जबाबदारी त्यांच्यावर. कधी ब्रह्मा, विष्णू तर कधी महादेव, इंद्र… त्या-त्या देवाच्या दरबारात कळ लावली की पुढचे रामायण कसे सोपे जायचे.

पृथ्वीवरही नारदमुनींच्या फेऱ्या वरचेवर होत असतात. या साऱ्याच देवांना पृथ्वीवरचे वर्तमान जाणण्याची मोठीच उत्सुकता असते. सत्य-त्रेतायुगात आपण अनेक अवतार घेतले, आता कलियुगात तशी वेळ कधी येणार म्हणून उत्सकलेले विष्णू भगवान, पृथ्वीवरील जैविक व अन्य उत्क्रांतीकडे बारीक लक्ष ठेवून असलेले ब्रह्माजी आणि आपल्या कोपाला पृथ्वीवरील बरेचजण बळी पडण्यालायक असल्याचे ठाम मत असलेले महादेव… पृथ्वीकडून काही संदेश येत असल्याचे या तिघा देवांना जाणवते. लगेचच नारदमुनींना फर्मान जाते. नारायण..नारायण करत मुनिवर्यांची स्वारी दरबारात हजर होते.

“मुनिवर, पृथ्वीवर सारे काही कुशल मंगल आहे ना?’ ब्रह्मदेव विचारणा करतात.

“देवा, सारे काही आलबेल आहे असे धाडसी विधान म्या पामराने कसे करावे? पृथ्वीवर भारत नावाचा जो देश आहे, जेथे साक्षात विष्णुदेवांनी दशावतार घेतले होते,’ अशी हलकीच कोपरखळी मारून मुनिवर्य पुढे म्हणतात, “तेथे गरिबांना खायला अन्न नाही. लाखो टन धान्य सडून पडठकडत मध्या वाया जाते, पण ते गरिबांना मोफत वाटण्याची सरकारची तयारी नाही.’

“मग हे धान्य जाते कुठे? ‘ महादेवांचा प्रश्न.

“ते जाते मद्यनिर्मितीला,’ गालातल्या गालात हसत मुनिवर्य म्हणाले.

‘ओम नम: शिवाय’, म्हणत महादेव आवंढा गिळतात.

“मग गरिबांना अन्नधान्य कोण पुरवतं? ‘ “त्यांनी फक्त भाकरीचा अर्धचंद्र स्वप्नात पाहायचा’, मुनिवर किंचित गंभीर होत म्हणाले.

“आणखी काय खबरबात मुनिवर? ‘ देवांचा राजा इंद्रदेवांचा प्रश्र.

‘देवा, आपणा साऱ्यांना माहितीच असेल की, पृथ्वीवरील नेत्यांना भूखंडांचे श्रीखंड ओरपण्याची आणि मित्रांना आणि नातलगांना भरवायची खोडच जडली आहे. सध्या तेथे लवासा सिटीला दिलेल्या जमिनीबाबतचा वाद ऐन ऐरणीवर आहे.’

“हा प्रकार कोणी केला असावा हो? ‘ इंद्रदेवाचा प्रश्र

‘कुणास ठाऊक, पण सगळेच राजकारणी मतलबी. एकमेकांना सांभाळून घेणारे’, मिस्किल हसत मुनिवर म्हणतात.

“आणखी काय खबरबात? ‘ ब्रह्मदेवांचा प्रश्न.

“दहशतवादी संघटनांनी पुन्हा घातपाती कारवाया सुरू केल्या आहेत. देशाच्या एका बाजुने पाकिस्तान, दुसऱ्या बाजुने नेपाळमध्ये घुसखोरीच्या तयारीत असलेले चीनी आणि राजकारण्यांच्या उखाळ्यापाखाळ्या… हा ऐतिहासिक देश नेत्यांच्या सत्तास्पर्धेपुढे नागवला जातोय.’ मुनिवर त्यानंतरही बराच वेळ बोलत होते. त्यांच्या एकूणच वक्तृत्वशैलीमुळे नेहमीच प्रभावित होणाऱ्या देवांनी त्यांना तातडीने पृथ्वीवर जाऊन भारताला भेट देण्यास सांगितले. नारायण… नारायण असा तानपुर्‍्याच्या तालावर गजर करत मुनिवरांनी संमतीची मान डोलवली.

नारदमुनी पृथ्वीवर आले आणि त्यांची भेट थेट तासगावकर आबांशी झाली. आबा तंबाखू मळण्यात गुंग होते. त्यांनी लावलेली गुळणी ऐन पिकणीवर आली होती. पिंक कुठे मारायची याच विचारात असताना नारदमुनी त्यांच्यासमोर उभे ठाकले. आबांच्या कपाळावर दोन आठ्या पडल्या. मंत्रालयातील सिक्युरिटी इतकी टाईट (!) असूनही हा बहुरूपी आपल्यापर्यंत पोहोचलाच कसा? आबांचे डोके गरगरू लागला. भारतात लष्कर-ए-तोयबाचे दोन अतिरेकी शिरल्याची गुप्तचर यंत्रणांनी नुकतीच दिलेली माहिती न्यूज चॅनल्सवरून वारंवार प्रसारीत केली जात होती. समोर बहुरुप्याच्या वेशात आलेला अतिरेकी तर नसावा या विचाराने आबांना दरदरून घाम फुटतो. ते बारीक नजरेने त्यांच्याकडे काही हत्त्यार अथवा स्फोटके दिसतात का याचा शोध घेऊ लागतात.

आबांकडे सुहास्य नजरेने पहात मुनिवर नारायण… नारायणचा जप लावून आहेत. अरेच्चा.. अतिरेकी मराठी भाषाही शिकलेला दिसतोय, आबा पुन्हा दचकले. मुनिवरांना बसण्याची खूण करून आबा बेसिनकडे वळतात. मात्र जाण्यापूर्वी टेबेलावरची एक कळ दाबायला विसरत नाहीत. ही बेल सिक्युरिटीला अलर्ट करणारी होती. आबा बेसिनवर झक्कपैकी गुळणा करतात. तोंडातील तोफगोळा योग्य ठिकाणी डागून हात पुसत ते बाहेर येतात. एव्हाना झेड सिक्युरिटीच्या कमांडोजनी त्या बहुरुप्याला चहुबाजुंनी घेरलेले असेल, याची आबांना खात्री होती. परतल्यावर तसेच चित्र रश दिसून आल्यावर आबा खुषीने हसले. सिक्युरिटी इन्चार्ज’, कठोर भाषेत आबा आज्ञा देतात. येस सर, म्हणत इन्चार्ज समोर येतात आणि कडक सॅल्युट ठोकतात.

“ही तुमची सिक्युरिटी का? हाय अँलर्ट जारी आहे आणि कुणाला न कळता हा बहुरूपी माझ्या केबिनमध्ये आलाच कसा? ‘ आबा लालबुंद होत विचारतात.

“पण सर आम्ही कुणीच याला पाहिले नाही. आम्ही दरवाजावरच उभे आहोत. या खोलीला एखादा गुप्त दरवाजा तर नसावा ना? ‘ इन्चार्ज बोलण्याच्या भरात भलतेच बोलून जातात.

“शटअप, हा एखादा अतिरेकी निघाला तर? ‘ आबांच्या या प्रश्‍नावर सिक्युरिटी भलतीच जोशात येते. सारेजण एसएलआर सरसावून मुनिवरांना घेरतात. मुनिवरांना त्या लोहहत्त्यारांचे मोठेच कुतूहल वाटले. एका बंदकीवरून निरागसतेने हात फिरवू पाहताच त्यांच्या गळ्याशी एसएलआरचा रोख येतो. मुनिवर चपापून हात मागे घेतात. इन्चार्ज पुढे येतो आणि मुनिवरांच्या हातातील तानपुरा आणि चिपळ्या काढून घेतो. या तंबोऱ्यात काही स्फोटके आहेत काय, याचा शोध घेण्यासाठी तात्काळ श्‍वानपथक तेथे हजर होते. या शवानाचे येथे काय काम, असा प्रश्‍न मुनिवरांना पडतो. खरे तर श्‍वान या चतुष्पाद प्राण्यापासून आपण आपले चार हात दूर असलेलेच बरे, असा मुनिवरांचा समज आलिया भोगासी असावे सादर, असे मनात म्हणत मुनिवर शश्‍वानपथकाच्या कुत्र्याला तोंड देण्यास समोरे येतात. श्‍वान येते, मुनिवरांचे तोंड सुंघते आणि पुन्हा परत फिरते. मुनिवरांना तानपुरा, चिपळ्या सारे काही तपासले जाते. पण आडात असेल तर पोहोर्‍यात येणार ना? मुनिवरांच्या जवळ काहीच मिळाले नाही म्हटल्यावर आबा थोडे संयत होतात. आता समोरच्या बहुरूप्याशी बोलायची मानसिक तयारी झालेली असते.

“कोण आहात तुम्ही? ‘ आबा विचारतात. तोपर्यंत मुनिवरही किंचित स्थिरस्थावर झालेले असतात. नारायण…. नारायण असा गजर करीत मुनिवर उत्तरतात, ‘मला नारदमुनी म्हणतात. स्वर्ग, पाताळ, भूलोक आणि पंचमहाभूतात माझा वावर असतो.’

मुनिवरांच्या या उत्तरावर आबा विचारात पडतात. त्यांना येताना कोणीच पाहिलेले नसते. म्हणजे मुनिवर अगदीच खोटं बोलतायंत असेही समजायचे काही कारण नव्हते. परंतु आबा पडले सत्यशोधक समाजाचे ! देव-दानव यापैकी कोणावरच त्यांचा विश्‍वास नव्हता. हा सगळा भंपकपणा असल्याचे त्यांचे मत होते. त्यामुळे ते हळूच पुढे सरसावतात आणि मुनिवरांच्या अंगाला हात लावून पाहतात. मुनिवरांच्या अंगाला हात लावताच आबांना आपल्या अंगात वेगळीच एनर्जी आल्याचा साक्षात्कार होतो. आपण खरोखरच नारदमुनींसमोर उभे असल्याचे आबांना पटते.

“बोला, काय सेवा करू तुमची? ‘ आबा आता मात्र लीनदीन होतात. एव्हाना सिक्युरिटीची माणसेही हळूहळू केबिनमधून बाहेर होतात. उगाच काही चुकलं तर आबा नक्षलग्रस्त भागात बदली करतील ही भीतीही त्यामागे होती.

नारदमुनी आता थोडे खुलतात. हळूच एका खुर्चीवर बसतात. तानपुऱ्याच्या तारा छेडत हळूच विचारतात, ‘आबा मला ब्रह्मदेवांनी पाठवलंय.’

“कशासाठी? ‘ नकळत आबा विचारतात.

सध्या आपल्या देशात बरंचसं अन्नधान्य वाया चाललंय. ते कुणाच्याच मुखी न पडता फेकावं लागतंय म्हणून ब्रह्मदेव दुःखी आहेत. असं का होतं, हे ब्रह्मदेवांना जाणून घ्यायचंय !’ मुनिवर ठसक्यात बोलतात. ते ऐकून आबा आपण कुठल्या नव्या संकटात सापडणार आहोत, या विचारांनी त्रस्त होतात.

“त्याचं काय आहे, ते धान्य खुपच सडलं होतं. गोरगरीब बांधव म्हणजे आमचेच भाउबंद ! त्यांना असं अन्नधान्य फुकट म्हटलं तरी कसं द्यायचं? पुन्हा त्यांची तब्येत बिघडली तर आम्हाला बदनाम करायला विरोधक तयारच आहेत. त्यामुळे बारामतीकर थोरल्या आबांनी हे सडलेलं अन्नधान्य जनावरांना किंवा गोरगरिबांना न देता मद्यार्क उत्पादन करणार्‍या कारखान्यांना देण्याचा महान निर्णय घेतला. त्यामुळे कुठल्याही गरिबाच्या जीवावर बेतले नाही’, आबा जपून उत्तर देतात.

“पण अन्नधान्य सडण्याची पाळी कशी आली, तेच ब्रह्मदेवांना कळालेले नाही. तुम्ही सांगू शकाल का? म्हणजे भविष्यात असे काही होऊ नये म्हणून तुम्ही काय दक्षता घेणार आहात ते ब्रह्मदेवांना समजून घ्यायचंय’, मुनिवर सांगतात.

“पण स्वर्गात राहणारे ब्रह्मदेव हे सारे समजून घेऊन नेमके काय करणार आहेत? ‘ न समजून आबा विचारतात.

“ते तुम्हाला काय करायचंय? तुमच्याकडे काही संयुक्तिक कारण नसेल तर तसे सांगा. मी ब्रह्मदेवांना तुमचे उत्तर जसेच्या तसे देतो.’ आता आबा गोंधळतात. विधानसभेत विरोधकांच्या उभ्या-आडव्या प्रश्‍नांना न डगमगता सामोऱ्या जाणार्‍या आबांना या प्रश्‍नाने मात्र घाम फुटतो. जनतेला किंवा विरोधकांना फसवणे सोपे; पण साक्षात ब्रह्मदेवांना कसे फसवणार?

आता देवही मुलाखती घ्यायला पृथ्वीवर यायला लागले तर… या विचारांनी आबांना क्षणभर हसू फुटले. मुनिवर ते जाणून लगेच म्हणतात, “आबासाहेब, मी तर आद्य पत्रकार ! जगाच्या पाठीवर पत्रकार ही संकल्पनाच नव्हती तेव्हापासूनचा…

‘अरेच्चा खरंच की ! नारदमुनींपासून काही लपवता येणं कसं शक्‍य आहे? या विचारांनी आबा कासावीस होतात. विचार करता करता त्यांना एक शक्कल सुचते. ते बोलू लागतात आणि पुढे अवाक होण्याची पाळी नारदमुनींवर येणार असते.

‘मुनिवर, गेल्या काही वर्षात देशात प्रचंड अन्नधान्य उत्पादन झाले. इतके की शेतीमालाचे भाव कोसळले. शेतकरी बुडाले. अनेकांनी आत्महत्त्या केल्या. शेतीमालाला योग्य भाव मिळावा म्हणून देशात अन्नधान्य तुटवडा निर्माण करणे गरजेचे होते. कृत्रिम अन्नधान्य टंचाई निर्माण केली तर किमान पुढच्या हंगामात तरी शेतीमालाला चांगला हमीभाव देता येईल, या उदात्त विचारांनी सरकारने काही लाख टन धान्य सडवण्याचा निर्णय घेतला. केवळ या देशातील शेतकरी जगावा म्हणून सरकारला असे कृत्य करणे भाग पडले. ते फुकटात वाटले असते तर गोरगरीबांनी त्याची कुठलीच किंमत ठेवली नसती आणि धान्याचे भाव आणखी कोसळले असते. आता तुम्हीच विचार करा. शेतकरी म्हणजे जगाचा राजा. जगाला अन्न देणारा तो राजाच नाही का? लाख मरोत पण लाखांचा पोशिंदा न मरो, असे आपण का म्हणतो बरे? मुनिवर्य तुम्हीच सांगा. आमचे काय चुकले? ‘ आबांच्या या प्रश्‍नावर नारदमुनी निरुत्तर होतात. ‘आपण या दृष्टीने विचारच केला नव्हता की…!’ असे म्हणून डोके खाजवत नारदमुनी पुढच्या मुलाखतीसाठी रवाना होतात.

संघ कार्यालयात डोक्यावर काळी टोपी, अंगात अर्धी खाकी चड्डी आणि पांढरा बुशशर्ट अशा वेशात नागपुरकर गडकरी बसले आहेत. पक्षाध्यक्षपदाचे शिंके तुटले आणि या बोक्याचे फावले, असे मनातल्या मनात आळवत शेजारी गोपीनाथराव बसलेले असतात, दिल्लीतील महाराष्ट्र सदनात ! एका नाथाभाऊंना गडकरींनी दिल्लीत पाठवले तर खानदेशच्या नाथाभाऊंना विरोधी पक्षनेतेपद देऊन एका दगडात दोन पक्षी मारले. गडकरींच्या पोटात सध्या बरेच राजकारण शिजत असते, म्हणून त्यांची तनु अलीकडे अंमळ जादाच तुंदिल झाली आहे, अशी चर्चा तर स्वर्गातही नारदमुनींच्या कानावर आली होती. गडकरींना भुखंडांचे श्रीखंड हजम होत असेल का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात नारदमुनी गुंग झाले होते.

“यावे, यावे मुनिवर…!’ गडकरींनी नारदमुनींचे जोरदार स्वागत केले, तसे मुनिवर दचकले. गडकरी पुन्हा दिलखुलास हसले.

“मुनिवर, सत्ताधारी तुम्हाला ओळखण्यात कमी पडले तरी आम्ही कमी पडणार नाही. तसे सध्या रिकामेच असतो. रिकामे असले म्हणजे तुड्यास तुंबड्या लावणे सोपे जाते. त्यामुळे सगळ्यांवर नजर ठेवणे शक्‍य होते. आता उद्या आम्ही सत्तेवर आलो तर तुम्हाला ओळखू शकू याची खात्री मीही आत्ता देऊ शकणार नाही’, असे म्हणून गडकरी गडगडाटी हसले. या हास्याने संघ कार्यालयाची भिंत अंगावर तर येणार नाही ना, या विचारांनी मुनिवर अस्वस्थ झाले.

“बोला मुनिवर आगमनम किम प्रित्यर्थस? ‘ गडकरींनी उत्सुकतेने विचारले.

“आपलेच क्षेमकुशल विचारण्यासाठी ! खरे तर आपणास पक्षाचे अध्यक्षपद कसे मिळाले, याचा गुंता खुद्द ब्रह्मदेवालाही सोडवता आलेला नाही. पक्षाकडल्या सगळ्या मुलूखमैदानी तोरा थंडावल्या का, असा प्रश्न साऱ्यांना पडला आहे’, नारदमुनींनी आपल्याकडील एक कळ फिरवली.

“त्याचं काय आहे, पक्षाला एक सोबर चेहरा हवा होता. काही ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाला जहाल मुखवटा लावला होता. हा मुखवटा निघत नाही तोवर दिल्ली खूपच दूर राहील, याची जाणीव पक्षनेतृत्वाला झाली आणि नेतृत्ववान नागपुरकरांनी आदेश शिरसावंद्य मानला.’

‘म्हणजे आता पक्षाची ध्येयधोरणे बदलणार तर..?’ मुनींचा प्रश्‍न. त्याबरोबर गडकरींनी अंगावरचे झुरळ झटकल्यासारख्धा अवतार करत म्हटले, ‘छूया हो, पक्षाची ध्येयधोरणे कधी बदलतात होय? एक वेळ सूर्य पश्‍चिमेला उगवेल पण नमस्ते सदा वत्सले… ही आमची प्रार्थना कधीही बदलणार नाही.’

‘तुमच्या मातृसंस्थेला बालकांची शाळा म्हटले जाते ते का हो? ‘ मुनिवर्यांच्या या प्रश्नावर गडकरी चपापतात.

“कोण म्हणतं असं? अर्धी चड्डी काय केवळ बालकंच घालतात? पाचात्त्य देशात जाऊन पाहा, मुले-मुली, स्त्रिया-माणसे कमीत कमी कपड्यात आपली बुद्धिमत्ता आणि संस्कृती दाखवत असतात आणि कोणी तसं म्हटलं तरी आम्हाला फरक पडत नाही. ही बालकांची शाळाच अखेर पालकांना शिकवते की नाही? ‘ गडकरींनी तावातावाने विचारले. दुसऱ्याच क्षणाला खजिल झाले. कारण पालक म्हणून आपल्याकडेच चार बोटे येतात, हे त्यांना नंतर उमजते.

“ते लवासा प्रकरण नेमके काय आहे, ते मला जाणून घ्यायचे होते. म्हटलं चला गडकरींकडे; त्यांच्याकडे वरकडच्या गप्पांचा खजिनाच असतो.’

नारदपुनींच्या या उत्तरावर गडकरी मनापासून हसले आणि म्हणाले, ‘तसं पाहिलं तर तुमच्या प्रश्‍नाचे उत्तर सोपेही आहे आणि अवघडही ! सब भूमि गोपालकी आहे, हे तर तुम्हाला मान्य आहे ना? ‘ या गडकरींच्या प्रश्‍नावर नारदमुनी मान डोलावतात.

‘एका जगाची जमीन तर कुणी अन्यत्र हलवू शकत नाही. फक्त त्याचे कागदोपत्री व्यवहार केले जातात. म्हणजे ब्रह्मदेवाने सृष्टीची जी रचना केली त्यात ढवळाढवळ करण्याचे कुठलेही कारस्थान नेत्यांनी रचलेले नाही. केवळ जमिनीच्या मालकी हक्कावरून थोडासा वाद आहे. परंतु असा वाद तर घराघरात असतोच ना? ‘ गडकरींच्या या प्रश्‍नावर मुनिवरांची मान डोलते. गडकरी कुणाच्या बाजुने आणि का बोलतायंत याचा उलगडा नारदमुनींना झाला नाही. मात्र समोर न्यूज चॅनल्सवर नाथाभाऊ खडसेंची दमदार मुलाखत दाखवली जात होती. त्यात नाथाभाऊंनी लवासा प्रकरणी बारामतीकरांवर जोरदार हल्ला चढवला होता. सत्ताधारी आघाडीने लवासा प्रकरणी घोटाळा केल्याचा दावा नाथाभाऊ करत होते. ते पाहून गडकरींचा चेहरा काळा पडू लागला. एकाच पक्षाच्या दोन नेत्यांची भिन्न मते ऐकून नारदमुनींना गुदगुल्या झाल्या. तिकडे गोपीनाथांनीही नाथाभाऊंच्या बोलण्यास दुजोरा दिला आणि गडकरी खजिल होत गेले.

“तुम्हाला पाकिस्तानच्या संसदेतच पाठवायला हवे होते’, असे दिल्लीतील महाराष्ट्र-सदनाच्या दिशेने पाहात दातओठ खात गडकरी पुटपुटत असतानाच नारदमुनी त्यांची रजा घेतात. महाराष्ट्राचं राजकारण किती बदललंय, या विचाराने त्यांना हुंदका येतो. त्यासोबतच गोपीनाथांचे आता कसे होणार, या विचारांनी त्यांना हुंदकाही फुटतो.

टी-२० स्पर्धा रंगात आली आहे. दुसरीकडे दहशतवाद्यांचे हल्लेही थांबलेले नाहीत. आपले कृषिमंत्री मात्र पॅव्हेलियनमध्ये निवांतपणे टी-२० स्पर्धा पहात आहेत. मध्येच सेहवागच्या षटकारावर टाळ्याही वाजवत आहेत. देशात अन्नधान्य टंचाई निर्माण झाली, देशातले धान्य सडवले आणि परदेशातून नाठाळ सरकारने जादा दराने धान्य मागवले म्हणून केंद्र सरकारवर टीका होत असली तरी बारामतीकरांना त्याचे काय? त्यापेक्षा मैदानावरील चौकार-षटकार अधिक महत्वाचे ! शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केली तरी त्यात नेत्यांचा काय दोष? धान्य सडले म्हणून काय दोष देता? तुम्हाला केक मिळत नाही का? अगदीच काही नाही तर क्रिकेटचे वनडे, टी-२० सामने आहेतच की…! ते पहात असताना तहानभुकेची जाणीवच राहात नाही. जगातल्या निम्म्याहून अधिक उपाशी जनतेला क्रिकेटचे सामने दाखवायला हवेत. त्यांना भुकेची जाणीवच होणार नाही. सामान्य जनतेला कायम मृगजळ दाखवायची तयारी आम्हाला ठेवावीच लागते. क्रिकेट हे असेच मृगजळ नाही का? थोरले आबा विचार करत होते. तितक्यात नारदमुनी तेथे आले.

‘या या मुनिवर्य.. या.’ बारामतीकरांनी नारदमुनींचे तोंड भरून स्वागत केले. ‘कसे येणे केलेत? ‘मुनिवर्य स्थानापन्न होताच बारामतीकर थोरल्या आबांनी प्रश्‍न केला.

“तुमच्याकडे भूखंडांचे श्रीखंड किती उरलं असेल हो आता?’ मुनिवरांच्या प्रश्नाने थोरले आबा दचकतात. थेट अंगावर आलेला हा बाऊन्सर कसा बरे परतवावा? डक करून सोडून द्यावा की हुक करून सीमेपलीकडे धाडावा, या विचारात थोरले आबा क्षणभरच गढतात.

उरलेलं बरंचसं श्रीखंड चितळ्यांच्या सदाबहार स्टॉकमध्ये विक्रीसाठी दिले होते पण ते वास मारायला लागलं म्हणून त्यांनी मुळा-मुठेत त्याचं विसर्जन केले म्हणे ! नाही तुम्हाला हवं होतं हे आधी कळालं असतं तर दोन चार किलो काढून ठेवलं असतं हो, थोरले आबा चुकचुकत म्हणतात. हवं तर ब्रह्मदेवालाही पाठवलं असतं. चव छानच लागते त्याची. पचायला अंमळ जड जातं इतकंच ! लोक जेलसीने पाहतात, वाईटसाईट बोलतात. ते सारे श्रीखंडासोबत पचवायची तयारी ठेवावी लागते. ती असली म्हणजे अजीर्ण होत नाही आणि हवाबाण हरडेचीही गरज भासत नाही.’

‘हे श्रीखंड खाण्याचा फायदा काय? ‘ नारदमुनी कुतूहलाने विचारतात.

‘कसे हो तुम्ही मुनिवर्य? हे श्रीखंड खाल्ले की वजन वाढते. पुढच्या निवडणुका लढवण्याची सोय होते. आपल्या पुढील अनेक पिढ्या आपल्याला दुवा देत गुण्यागोविंदाने नांदू शकतात. शिवाय हे श्रीखंड खालहुं की राजकारणात रिकाम्या पोटाचं, अर्ध्या पोटाचं आणि भरल्या पोटाचं तत्वज्ञान इतरांना ऐकवण्याची पात्रता आपल्या अंगी येते.’ थोरल्या आबांचा खुलासा नारदमुनी कौतुकाने ऐकत होते. आता त्यांना मैदानात सुरू असलेल्या चेंडूफळी खेळाबाबत काही प्रश्‍न विचारावेसे वाटतात. ते खुणेनेच हा खेळाचा कोणता प्रकार आहे, असे थोरल्या बारामतीकरांना विचारतात. तसे आबा खुशीत येतात. हातात आयसीसीचे अध्यक्षपद असल्याने त्यांच्या खुशीची पातळी थोडी जास्तच असते. आबा तठ्ठीन होत सांगू लागतात. “हा भारतातील गोरगरिबांचा सर्वात श्रीमंत झालेला खेळ. आपल्या बीसीसीआयइतकी श्रीमंती जागतिक फुटबॉल संघटनेकडेही नाही.’

“पण हे दोन जण फळकूट घेऊन उभे आहेत आणि बाकीचे अकरा जण चेंडूपाठी धावतायत ते कशासाठी?’ नारदमुनींच्या या प्रश्‍नावर क्षणभर काय उत्तर द्यावे तेच बारामतीकरांना कळेना. अभिजात अज्ञानापुढे शहाणपणाचा पाडाव लागत नाही, हे सदवचन ठाऊक असल्याने थोरले आबा काही वेळानंतर बोलतात, ‘त्याचे काय आहे मुनिवर्य…ते लोक जितक्या जोरात चेंडूमागे धावतायत ना, आपल्या देशातील उपाशी जनता आपली भूक विसरून तल्लीनतेने टाळ्या वाजवत असते. सेहवागने ब्रेट लीला सिक्सर खेचली तर कांगारूंनाच मैदानाबाहेर फेकल्याचे मानसिक समाधान जनतेला मिळते. जनतेने आपले सुख आणि समाधान अशाच प्रकारच्या मैदानी आणि बैठ्या खेळांमधून शोधावे, असे आमचे प्रयत्न असतात. सामान्यांना राजकारण कळत नाही, पांढरपेशांना राजकारणाचा तिटकारा आहे. मग राजकीय पटावरील प्यादी हलवायला आमच्याशिवाय कोण उरतं? आमचं काम आम्हाला सोयीने आणि निश्‍चिंतपणे करता यावे म्हणून उर्वरीत जनतेने आपापल्या – उद्योगांमध्ये मग्न असलेले आम्हाला आवडते. जनता तशी मग्न रहावी, याची सोय आम्ही अक्कलहुशारीने करीत असतो. क्रिकेटची राजकीय सोयीसाठी केलेली निवड हा अस्मादिकांच्या दूरदृष्टीचा एक नमुना आहे’, अशी पुस्ती बारामतीकर मिस्किल हसत जोडतात.

फारसे काही कळाले नसले तरी बरेच काही उमजल्यासारखी मान डोलावत नारदमुनी थोरल्या आबांचा निरोप घेतात.

नारदमुनींचा पृथ्वीवरील अवधी संपुष्टात आला होता. दोनेक दिवसात स्वर्गलोकात प्रयाण करणे आवश्यक होते. नारदमुनी आता आपल्या अजेंड्यावरील शेवटची मुलाखत घेण्यासाठी ढाण्या वाघाच्या गुहेत शिरलेत. वाघोबा आता वयोमानानुसार थकल्याचे वर्तमान त्यांना स्वर्गातही कळाले होते. शिवाय आता गुहेतून परतणाऱ्यांची पावलेही दिसायला लागल्याचे त्यांच्या कानी आले होते. बहुरुप्यासारखा अवतार पाहन मुनिवर्यांना थोरल्या वाघोबांची भेट मिळाली नाही, हे
सांगणे न लगे. फक्त जाताजाता त्यांना मंद आवाजातली गुरगुर ऐकायला मिळाली, मी मुळमुळीत किंवा मिळमिळीत नाही! कोण असं म्हणतं..? व्हॉऽऽऽऽ

तितक्यात विष्णुकुंज इमारतीतून एक डरकाळी फुटल्याचे नारदपुनींचे तीक्षण कान हेरतात. ते लगोलग तिकडे वळतात. आपण नारदमुनी असल्याचे त्यांना सांगावेच लागत नाही. त्यांच्या स्वागतासाठी धाकले साहेब स्वत:च बाहेर धावले. त्यांनी नारदमुनींची षोडशोपचारे पुजा केली. औक्षण केले. मुनिवर्य प्रसन्न झाले. कल्याणमस्तु… नारदमुनींनी त्यांना आशीर्वाद दिला. फलाहार आटोपल्यावर धाकल्या साहेबांनी मुनिवर्यांना ‘काय सेवा करू? ‘ असे विनम्रतेने विचारले.

“पृथ्वीतलावरील प्राणीमात्रांचे, वृक्षवेलींचे संरक्षण, जतन करणे गरजेचे आहे. त्याकडे कोणाचेच लक्ष नाही. तुम्हीच हे शिवधनुष्य पेलावे, असे मला वाटते.’ नारदमुनींच्या या उत्तरावर धाकले साहेब विचारात पडतात. अखेर मान डोलावत ते होकार देतात. तितक्यात धाकल्या साहेबांचा एक सहकारी लगबगीने येतो आणि साहेबांच्या कानात काही तरी पुटपुटतो. धाकले साहेब मान डोलावत उठतात आणि सैन्याला मैदानात पाचारण करण्याचे आदेश देतात. सारे सैन्य जमते. प्रत्येकाला एकेक ठिकाणी मोर्चा सांभाळण्याचे आदेश सुटतात. बाळाभाऊ उगीचच इकडेतिकडे लगबगीने फिरत असतात. लाठ्या-काठ्या बाहेर निघतात. दगडांचा एळ ळंटेनर विष्णुकुंजसमोर येऊन उभा राहिल्याचे शुभवर्तमान धाकल्या साहेबांच्या कानी टाकले जाते. धाकले साहेब बाहेर जाऊन दगडांचा तपासतात. समाधानाने मानही डोलावतात. ‘धाकले साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है…’ अशा घोषणा देत सारे बाहेरही पडतात.

काही वेळातच मारा, झोडा, हाकला त्यांना उत्तरेत अशा घोषणा कानी येऊ लागतात. बसल्या जागी नारदमुनींना कळते की, कुठे तरी दगडफेक सुरू झाली आहे. काही ठिळाणी जाळपोळही सुरू झाली असल्याची शंकाही त्यांना येते. टायर जळाल्याचा वास त्यांना अस्वस्थ करू लागतो. नारदमुनी कुतूहलाने काय झाले म्हणून विचारतात. धाकल्या साहेबांचे एक सहकारी त्यांना हळूच कारण सांगतात, ‘रेल्वे भरतीत यु.पी.. बिहारींना जास्त कॉल्स गेलेत.
आपल्या मराठी युवकांवर हा अन्याय आहे. आणि धाकले साहेब अन्याय कधीच सहन करीत नाहीत, हे तुम्हालाही ठाऊकच आहे.’

‘मग तुम्ही काय करणार आहात? ‘

“आता आम्ही थेट परीक्षा केंद्रावर हलला चढवला आहेच पण भय्यांना उत्तरेत पळवून लावणार आहोत.’ नारदमुनींच्या या शंकेचे निरसन करताना धाकल्या साहेबांच्या त्या लष्करी (1) अधिकाऱ्याने विचित्र नजरेने पाहिले.

“पण मग पृथ्दीतलावरील प्राणीमात्रांच्या संरक्षणाचे काय?’ मुनिवर्य घाईघाईत विचारतात.

‘कुठली पृथ्वी? आधी महाराष्ट्र महत्वाचा. जय जय महाराष्ट्र माझा… गर्जा महाराष्ट्र माझा…’ असे गात गातच धाकल्या साहेबांचा सहकारी कार्यालयाच्या रंगमंचावरून एक्झिट घेतो. नारायण…
नारायण असे आळवत मुनिवर्य स्वर्गाच्या दिशेने रवाना होतात.

-किरण पाध्ये

अद्वैत सृजनवेध (दिवाळी २०१०)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..