खोबरं हा मालवणी जेवणातला महत्वाचा घटक … अविभाज्यच… पण अगदि टिपीकल मालवणी तऱ्हा सांगतो… खोबऱ्याच्या. आणि नारळ बागायतदारांच्या…
तस बघायला गेलं तर .. नारळाच्या बागा दोन-तिन प्रकारच्या… एक नदिकाठची.. मळ्यातली…
दुसरी भरडी दगडगोट्याच्या जमिनीतली, तिसरी भरडी..पण डोंगरातल आपवणी पाण्यावरची.. झोळकातली….
यामध्ये साधारण.. बामण , भंडारी आणि वैश्य हे समाज साधारण चविने खाणारे.. म्हणजे बागायतदार…
आता या प्रत्तेक तऱ्हेच्या माडाच्या झाडाचे खोबरे वेगळ्या चविचे… वेगऴ्या टेक्सचर चे.. त्यात ताजे नारळ, कोटार, कुत्रेकोटार., वांझ… हे प्रकार आगळेच.
साधारण माश्याच सार, पिठी, पालेभाजी,गुळचून यासाठी मळ्यातला नारऴ वापरला जातो. तर मटण, भाजणीच्या आमटीसाठी भरडी नारळ… करंजीच्या साठ्यासाठी खास घुडघूडी…
त्यात कढीसाठी काही स्पेशल माडाचे नारळ … आणि तो बदलला तर कढीची चव बदलते… मग जेवणावर एखादी मालवणी शिवी हमखास….
आता शहाळं कुठल्या माडाचं खायचं त्याचही खास तंत्र.. प्रत्तेक झाडाची चव वेगळी… त्यात तांबड्या माडाची स्पेशल…पण मालक समोर असेल तर तोच सांगणार..आता सिंगापुरी माड झालेत पण शाहाळ्यासाठी ते मस्तच. कुठल्यापेंडीची किती शाहाळी काढायची… नारळ सुद्धा झाडाखालून मालक सांगेल तेच काढायचे…. एक सुंदर तंत्र… शास्त्र. पिढीजात चालत आलेले… त्याच्यात म्हाल पेंड…. आणि धारेची पेंड… हे खासच….
आवयेल… खास मालवणी तेल तांबडया माडाच्या खोबऱ्याच्या रसापासुन तयार केलेले. घरगुती…. पण त्याची क्रूती पण विस्म्रूतीत गेलीय….
तेलासाठी घुडघुडी बारीक करून उन्हात वाळवत घातल्यावर अचुक पुर्ण सुकलेले पण मऊ गोड आणि खाण्यास योग्य अशी कातळी जो ऊचलतो .. तो मात्र खरा दर्दी….
आणि ज्याच्या घरात 2. 4 लिटर खराब खोबर्याचं तेल निघतो तो खरा बागायतदार…
यातही… फक्त नारऴाचा आकार त्यातलं पाणी, रंग.आणि किशी बघून आतल्या खोबर्याविषयी अचुक सांगणारे ज्योतिषी ही याच कुऴातले….
तर असं हे खोबरं पुराण विस्तारभयास्तव आटोपते घेतोय…
बापूर्झा
डॉ. बापू भोगटे….
Leave a Reply