नवीन लेखन...

नारायण भंडारीचं काय झालं ? – भाग २

निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला होता .

जाहीर प्रचार सभा . रॅलीज . कॉर्नर मिटिंग्ज . चाय पे चर्चा . डोअर टू डोअर कॅम्पेनिंग . पेड इंटरव्ह्यूज . न्यूज चॅनल्सवरची चर्चासत्रे . बॅनर्स . पत्रकबाजी . धर्मस्थळातून होणारी आवाहने आणि धमक्या . पैशांचा महापूर . व्हेज आणि नॉनव्हेज जेवणावळी . खास पांढरा तांबडासुद्धा . देशीपासून ब्रँडेड पर्यंतचा दारूचा अखंड वाहणारा पूर . धुरळा उडवीत जाणाऱ्या सर्व प्रकारच्या फोर व्हीलर्स . त्यातल्या काही गाड्यात चलनी नोटांची बंडले असलेली पोती . महागड्या गाड्यात नोटांचे बॉक्सेस . वर्कोहोलिक आणि अल्कोहोलिक तरुण कार्यकर्त्यांसाठी खास पब्ज , डिस्कोथेक , क्लब्ज आणि डान्सबार . जे जे लागेल ते यथेच्छ मिळण्याची सुविधा .

जरी त्या राज्यातील निवडणूक असली तरी अखेर जगातील मोठ्या लोकशाहीचा महायज्ञ होता तो .
त्यामुळे त्या इतमामात तो साजरा होण्याची काळजी घ्यायलाच हवी होती .

पण नारायण भंडारी बावचळला होता .
अस्वस्थ झाला होता .
पायाला चाक बांधल्यासारखा तो फिरत होता .
पहात होता . सगळं अनुभवत होता .
वाचत होता . आणि असंख्य प्रश्नांचे मोहळ उराशी घेऊन धावत होता .

प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं जिंकण्याचे दावे करीत होते . अगदी गॅरंटी देऊन .
आणि न्यूज चॅनल्सवर , निवडणूक अंदाज सुद्धा सगळ्याच पक्षांना जिंकण्याची संधी दाखवत होते .

नारायण पाहत होता . फिरत होता . जनमताचा अंदाज घेत होता .

त्याच्या लक्षात येत होतं .
एका पक्षाच्या बाजूने सायलेंटली जनमत झुकत चाललं होतं .
जसजसं इलेक्शन जवळ येऊ लागलं होतं तसतसं सायलेंट जनमताचं रूपांतर लाटेत आणि नंतर महालाटेत होऊ लागलं होतं .
तो पक्ष सत्तेत होता .
आणि त्या पक्षाच्या कार्यपद्धतीमुळं जनता पुन्हा एकदा संधी देऊ पहात होती .

एका चर्चासत्रादरम्यान खास सर्वसामान्यांचा बाईट म्हणून त्यानं हे मत जाहीरपणे व्यक्त केलं होतं .

आणि ते त्याचं मत हीट झालं होतं .
सत्ताधारी पक्षानं , जाहिरातीत , सोशल मिडीयात आणि सर्वत्र ते मत व्हायरल करायला सुरुवात केली होती .

आता मात्र निवडणूक अंदाज बदलायला लागले होते . पूर्वीच्या सत्ताधारी पक्षालाच पाशवी बहुमत मिळणार हे सगळेच छातीठोकपणे सांगत होते .

आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकायला सुरुवात झाली होती .

निवडणूक आठ दिवसांवर आली होती .
चित्र एव्हाना स्पष्ट होऊ लागलं होतं .
पण ‘ ते ‘ शांत होते .
स्वस्थचित्त होते .
‘ त्यांच्या ‘ पक्षाचे उमेदवार , कार्यकर्ते खचून गेले होते . हताश झाले होते .
नारायण भंडारीच्या नावानं बोटं मोडत होते . त्याला संपवण्याची भाषा करीत होते .
पराभवानंतर होणाऱ्या कोट्यवधींच्या कर्जाच्या डोंगराच्या भीतीनं उमेदवार आत्ताच गाळात रुतल्यागत झाले होते .

पण ‘ ते ‘ शांत होते .

कानगोष्ट करावी तसे ते हळूच बोलून गेले ;
” पत्रकारांबरोबर बोललो नाही बऱ्याच दिवसात .”

क्षणार्धात ही बातमी सगळीकडे गेली आणि पंधराव्या मिनिटाला प्रेसची गर्दी त्यांच्या बंगल्यासमोर जमा झाली .’ ते ‘ हसतमुखानं बाहेर आले . पत्रकारांनी विचारलेल्या राज्याच्या , देशाच्या , जगातील घडामोडींच्या प्रश्नांवर मतं व्यक्त केली . काही संदिग्ध . काही निःसंदिग्ध . अर्धा तास झाल्यावर ते पाठी वळले बंगल्यात जाण्यासाठी .
आणि त्यांच्या नेहमीच्या पत्रकारानं एक प्रश्न विचारला .
” सध्याची त्सुनामी बघता आपल्या पक्षाची अवस्था दारुण होणार आहे , निवडणुकीत पराभवाचे संकेत मिळत आहेत , याबद्दल आपण काही बोलला नाहीत . ”

ते पाठी वळले .
त्या पत्रकाराकडे वळून म्हणाले ,
” निवडणुकीत हारजीत होत असते , त्याचं काही वाटत नाही मला .”
क्षणभर पॉज घेऊन ते म्हणाले ,
” मला माझ्या पक्षाची चिंता वाटत नाही . मला चिंता आहे ती सर्वसामान्य जनतेची . येत्या काही दिवसात कांदा आणि साखर महाग होण्याची चिन्हे मला स्पष्ट दिसत आहेत , त्यामुळे सर्वसामान्य जनता महागाईच्या खाईत लोटली जाणार आहे , त्यातून जनतेला कसा दिलासा द्यावा याचा विचार मी करतोय .”
एकच वाक्य उच्चारून ते बंगल्यात गेले .

आणि ब्रेकिंग न्यूज फ्लॅश होऊ लागली .
बाईट्स कोसळू लागले .
सोशल मिडीयावर घमासान युद्ध सुरू झालं .

घाऊक किरकोळ व्यापाऱ्यांना , अडत्याना , साखर कारखानदारांना योग्य तो मेसेज गेला .

पुढच्या आठ दिवसात साखर , कांदा , कडधान्ये , तांदूळ आणि जीवनावश्यक गोष्टी बाजारातून गायब झाल्या .
जिथे त्या उपलब्ध होत होत्या तिथे कमालीचा काळाबाजार सुरू झाला होता .

आठ दिवसात जनता महागाईनं त्रस्त झाली .
आणि सत्ताधारी पक्षाच्या तोंडाला फेस येऊ लागला .

आठ दिवसांनी इलेक्शन पार पडलं .
नेहमीपेक्षा जास्त व्होटिंग झालं होतं .

तिसऱ्या दिवशी निकाल जाहीर होऊ लागले .
सत्ताधारी पक्ष कुठल्याकुठे फेकला गेला होता .

आणि ‘ ते ‘ शांतपणानं संभाव्य मंत्रिमंडळाची यादी बनवू लागले होते .

नारायण भंडारी डोक्यावरचे केस उपटत होता .
मनगट चावत होता .

– मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या दिवशी सकाळी पासून साखर , कांदा , कडधान्ये , जीवनावश्यक गोष्टी स्वस्त आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ लागल्या होत्या .

( क्रमशः )
( पूर्णतः काल्पनिक . यातील घटना प्रसंगाचा वास्तवाशी कोणताही संबंध नाही . तसा तो आढळला तर तो योगायोग समजावा .)

— डॉ. श्रीकृष्ण जोशी

ही सोमि सिरीज ( सोशल मिडिया सिरीज ) नावासह सर्वत्र पाठवायला हरकत नाही .

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 118 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..