मीसुद्धा काळजीत होतो .
खूप दिवसात नारायण दिसला नव्हता .
अनेक जण विचारणा करीत होते .
त्यांना मी उत्तर देऊ शकत नव्हतो .
कारण नारायणाचा पत्ता मलाच मिळत नव्हता .
तो कुठे गायब झाला , काहीच कळत नव्हतं .
रोज बारकाईनं वर्तमानपत्रं चाळत होतो .
मराठी न्यूज चॅनल्स जाहिरातीसह पहात होतो .
खोटं कशाला सांगू , पण एकदा खाडीची दलदल सुद्धा बघून आलो .
पण त्याचा मागमूस लागत नव्हता .
आणि अचानक मला नारायण दिसला . चहाच्या टपरीवर कटींग मारत होता .
मी क्षणाचाही विचार न करता त्याचा हात पकडला आणि बाजूच्या बाकड्यावर बसायला घेऊन गेलो .
अन्य काही विचारायच्या आत तोच म्हणाला …
” मी कुठे होतो म्हणून विचारायचं असेल , तर आधीच सांगतो माझं डोकं पार कामातून गेलंय . शेतकरी आंदोलनाच्या इथं मी गेलो होतो आणि तिथे जे काही पाहिलं त्यानं माझं डोकं फिरलंय . अरे तुम्हाला काही कल्पना आहे , तिथे काय चाललंय ते ? तिथे रस्त्यालगत आणि जवळपास पक्की बांधकामं चालू आहेत , पावसाळ्यात आंदोलन सुरू ठेवण्यासाठी . अगदी राजरोसपणे , बेकायदेशीरपणे . नवं गाव वसवल्यागत चालू आहे . आणि कुणाचंही लक्ष नाहीय बहुधा . कुठल्याही पत्रकाराला , न्यूज चॅनल्सवरच्या वार्ताहराला दखल घ्यावीशी वाटत नाही . भविष्यात काय होईल याची कुणाला तमा नाही . अरे काय चाललंय काय . तिकडे सीमेवर भुयारं खणून राजरोसपणे अतिरेकी भारतात येण्याचा प्रयत्न करताहेत . आपलं लष्कर सावध आहे म्हणून आपण जिवंत आहोत , सुरक्षित आहोत . पण अतिरेक्यांना ही रस्त्यालगतची बांधकामं वरदान ठरू शकतात , हे कळत कसं नाही कुणाला ? आपण भारतवासीय कुठल्या बातम्या पाहतोय , ऐकतोय . लाज कशी वाटत नाही . एवढे कसे सगळे षंढ झालेत . की काहीतरी वाईट घडण्याची वाट पाहत आहात . अरे सुधरा रे , नाहीतर पश्चात्ताप करण्याची वेळ येईल . ते लष्कर , ते पोलीस कुठे कुठे पुरे पडतील ?आपलं काही कर्तव्य आहे की नाही ? ”
तो प्रचंड संतापानं बोलत होता .
मी त्याच्याकडे बघत राहिलो .
आणि डोळ्यासमोर न्यूज चॅनल्सचे पडदे आले ..
कोरोना , परदेशातील बातम्या , व्हायरल व्हिडिओचा तपास , राजकारण , क्षुल्लक गोष्टींवरच्या चर्चा या व्यतिरिक्त भारतीयांना दुसरं जीवन नसावं असं सगळं चित्रण माथी मारलं जात होतं आणि देशापुढचा धोका जनतेसमोर येऊ दिला जात नव्हता .
नारायणाचं बरोबर होतं .
मी त्याला काही विचारण्यासाठी तोंड उघडलं.
आणि गप्प बसलो .
मला विचारात गुंतवून नारायण पुन्हा नाहीसा झाला होता …
मी डोक्याला हात लावला आणि तोंडावर मास्क लावून शांतपणे घरी आलो …
मित्रांनो ,
मास्क लावा .
सामाजिक अंतर ठेवा .
हात सतत धूत राहा .
लस अवश्य घ्या .
नारायणासारखा देशहिताचा विचार करा .
( क्रमशः )
( पूर्णतः काल्पनिक .)
— डॉ. श्रीकृष्ण जोशी
ही सोमि सिरीज ( सोशल मिडिया सिरीज ) नावासह सर्वत्र पाठवायला हरकत नाही.
Leave a Reply