नवीन लेखन...

नारायण टिनपट्या

नारायण टिनपट्या

लहानपणी माझा आजा म्हणजे माझा बा सांगायचा .

नंतर आई सांगायची ,नारायण टिनपट्याबद्दल .टिनपट्या ‘ या विचित्र नावानं उत्सुकता वाढवली होती . शालेय जीवन …कॉलेजमुळे हा विषय मागे पडला .जरा मोठा झालॊ . नोकरीतून सुट्टीच्या काळात शेगाव बु ,म्हणजे माझ्या गावी गेलो की आई नातवंडाना कथा सांगायच्या वेळी ……आम्ही तिला टिनपट्याबद्दल सांगायला आग्रह करायचो .

अजून अजून ऐकायला मजा येते .

………

१९३०- ३५ च्या काळात नारायण टिनपट्या नावाचं व्यक्तिमत्त्व चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा इथे होऊन गेलं .

नारायण टिनपट्या हे खरं त्याचं नांव नव्हतंच . नारायणराव पेटकर असं त्याचं नांव होतं . टिनपटापासून डब्बे बनवण्याच्या त्याच्या धंद्यापासून त्याला हे नांव पडलं . लोखंडी घमेल्याला बूड बसवण्याचं तो काम करायचा .

नारायण पेटकर अस्पृश्यतेविरोधी लढणार बंडखोर व्यक्तिमत्व होतं. अस्पृश्याची दाढी करायला न्हावी तयार नसत. नारायणरावांनी एक सभा घेऊन सर्वासमक्ष आपल्या हातांनी आपली दाढी केली.” घरासमोरील कचरा आपण साफ करतो मग आपल्या तोंडावरचा कचरा साफ करायला काय हरकत आहे” असं स्वतःचं मत मांडत ती सभा जिंकली.

गणपती फक्त सवर्णांच्या घरी बसवले जात . त्याच्या उत्सवात भाग घेण्याचं ही स्वातंत्र अस्पृश्यांना नव्हतं . नारायणरावांनी याविरोधी बंद उभारण्याचंठरवलं. त्यांनी वरोड्याला आपल्या घरी गणपती बसवला. पुजाअर्चा, आरत्या होऊ लागल्या. यामुळं सनातनी लोकांच्या पोटात दुखू लागलं. ते हाणामारीच्या धमक्या देऊ लागले. देव बाटवला, धर्म बुडवला वगैरे वगैरे. नारायणराव डगमगले नाहीत. ते चांद्याच्या डी.सी. साहेबांना भेटायला गेले. डी.सी.साहेब एक इंग्रज माणूस होता. मोडक्या तोडक्या इंग्रजी भाषेत नारायणरावांनी त्यांची कैफियत मांडली. इंग्रजांचं भलं व्हावं यासाठीच तर मी नवस करतो.नवसाप्रमाणे गणपती बसवतो तर मलाच धमक्या देतात इ.इ. मला पोलिसाच संरक्षण हवं.,असं त्यानं सांगितलं. त्या अधिकाऱ्याने त्याची दखल घेतली. काही शस्त्रधारी पोलीस वरोड्याला पाठवून दिले.

गणपती विसर्जनाला नारायणरावाचा गणपती पोलिसांच्या पहाऱ्यात सर्वात पुढे सरकत होता . त्यावेळी बाकी सवर्णलोक केवळ बघण्याशिवाय काहीही करू शकले नाही .

नारायणराव पंढरपूरला मंदिरात जात . बाकी देवळातही जात . ओळकीच्या सुवर्णाला ‘राम राम ‘ घालून त्याची चांगली जिरवत.अशा बंडखोरीमुळे कधी कधी त्यांना मार मिळायचा . पण का त्यांचेवर हल्ला करणारे पांगले न जर का एकटा कुणी भेटलाच तर त्याला बेदम मार ते द्यायचे .

” म्हार हाव” असं सांगितल्यावर वरोऱ्याच्या रेल्वेस्टेशन वरील पोतदार नावाच्या हॉटेलमालकाने स्पेशल फुटक्या कपातून त्यांना चहा दिला. कालांतराने त्याच हॉटेलमालकाने सन्मानाने चांगल्या कपातून चहा दिला….कारण नारायणराव मलिमखान नावानं मुसलमान बनून गेले होते. हिंदू म्हणून तिरस्कार व धर्म बदलताच मान .

ढोंगीपणावर ते त्याच्या पद्धतीने मार्ग शोधायचे.

नारायणराव घरगुती वाईट चालरितीविरुद्धही भांडत असत. नारायणरावांनी सासूला वठणीवर आणलं..ती कथा आजही चवीने सांगितल्या जाते,ऐकल्या जाते..शेगाव-वरोरा भागात.

ती कथा अशी ————–

नारायणरावांची पुतणी..तिला तिची सासू फार त्रास द्यायची.सासुरवास करायची.

कोण खरं ,कोण खोटं तपासण्यासाठी नारायणराव पुतणीच्या गावी गेले . रात्रभर घराजवळच्या झाडावर लपून बसले . पुतणीच्या घरचा गोंधळ ऐकला . सासू खाष्ट असल्याचे त्यांनी ओळखले होते .सासूला धडा शिकवण्याचं ठरवले .

दुसऱ्या दिवशी त्यांनी सासूला साडीचोळी करण्याच्या बहाण्याने आपल्या गावी बोलावले .पत्नीला पाहुणचार म्हणून पुरणपोळी करायला सांगितलं .पत्नीला समजावून सांगितलं , की जेवण वाढताना माझ्या ताटात तूप आणि सासूच्या ताटात तेल वाढायचं . मी रागावलो की दिवा मालवायचा .

सूचनेप्रमाणे पती – पत्नी नाटक वठवू लागले .

बायकोने त्यांना तूप आणि सासूला तेल वाढलं ..

नारायणराव संतापले , ” माझ्या ताटात तूप अन तिच्या ताटात तेल काहून वाहाढलं वं ? थे सांग पहलं ?” असं ओरडत ते ताडकन उठले .बायकोला मारायला धावले . ठरल्याप्रमाणे बायकोने दिवा विझवला होता . कोपऱ्यातील काठी नारायणरावांनी घेतली . बायकोला मारायचे नाटक केले . नवरा -बायकोच्या भांडणात सासू मध्ये पडल्या . अंधारात नारायणरावांनी सासूला झोडपणं सुरु केलं .

सासू म्हणायची . ” नारायण . मी होय गा”

नारायण म्हणायचे, ” तू दूर होय वो बाई”

सासू म्हणायची ,” नारायण..मी होय गा”

नारायणरावाचं ,” तू दूर होय वो बाई”

मी होय गा

तू दूर होय वो बाई

असे संवाद सुरूच होते व नारायणरावाचे सासूला झोडपणे चालूच होते .

बायकोला हसू आवरत नव्हते .

ती तोंडावर हात ठेवून मजा ऐकत होती ..बघत होती .

दुसरे दिवशी सासू तिच्या गावाला रवाना .

रात्रीचं काहीही कुणाला न सांगता .

पण व्हायचा तो परिणाम झाला …सासूवर .

त्यानंतर सासूने नारायणरावाच्या पुतणीला कधी सासुरवास केला नाही .

असा अफलातून व्यक्तिमत्व आईच्या तोंडून ऐकायला मजाच येते अजूनही .

अशा व्यक्तिमत्वाची ओळख आम्हाला तर लहानपणापासून आहेच .

ते चांद्या- वरोरा -शेगाव बुजरूक पुरतं न राहता सर्वाना कळावं …

यासाठी हा लेखनप्रपंच …

Avatar
About श्रीकांत पेटकर 43 Articles
श्रीकांत बापुराव पेटकर हे कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहेत. त्‍यांना लेखनाची आवड असून त्‍यांची 'आणि मी बौद्ध झालो' या अनुवादित पुस्‍तकासोबत कल्‍याण, शांबरीका खरोलिका, बेहोशीतच जगणं असतं,कविता मनातल्या , चांगुलपणा अवती भवती अशी एकूण आठ पुस्‍तके प्रकाशित झाली आहेत.इंद्रधनुष्य हा कथासंग्रह . पेटकर यांनी सामाजिक जाणिवेतून माहिती अधिकाराचा वापर, नागरिकांना वीज बचतीचे महत्‍त्‍व पटवून देणे, परिसरातील विधायक काम करणा-या व्‍यक्‍तींना प्रकाशात आणणे असे विविध पातळ्यांवर प्रयत्‍न केले आहेत. पेटकरांनी चित्रकलेचा छंद जोपासला असून त्‍यांच्‍या चित्रांची आतापर्यंत दोन प्रदर्शन आयोजित करण्‍यात आली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..