मी रोजच स्वारगेटहून चालत आॅफिसवर येतो. येताना रस्त्यावरील दिसणाऱ्या जाहिराती वाचण्याची माझी जुनी सवय आहे. एका बसथांब्यावरील जाहिरातीत लिहिलं होतं, ‘खऱ्या व्यक्तीशीच लग्न करा.. आयुष्याच्या जोडीदाराची निवड आमच्या स्टोअरमधून करा..’ एका अत्याधुनिक वधू-वर संस्थेची ती जाहिरात होती.. ‘सुयोग्य’ शब्दाऐवजी त्यांनी ‘खरा’ शब्द वापरला होता.. वधू-वरांच्या नोंदींतून ऐवजी त्यांनी, वधू-वरांचं एखाद्या वस्तूंप्रमाणे ‘स्टोअर’ केलं होतं…
काळ किती बदलून गेला आहे.. हे ती जाहिरात वाचून मला प्रकर्षाने जाणवलं.. ज्याच्याशी आपल्याला लग्न करायचं आहे तो ‘खरा’ आहे की, ‘खोटा’ हे पहाण्याची आता वेळ येऊन ठेपलेली आहे. कारण आपण घेतलेल्या निर्णयामध्ये फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पूर्वी मुला-मुलीच्या आई वडीलांऐवजी त्यांचे काका, मामा किंवा आजोबाच वधू-वर संशोधन करायचे. त्यांच्या निर्णयाला सर्वांची संमती ही गृहीत धरलेली असायची. त्यावेळी मुला-मुलीपेक्षा त्यांचं घराणं, कुळ पाहिलं जायचं. नातीगोती पाहिली जायची. विशी-पंचविशीतच लग्न होऊन जायची..
अलीकडे शिक्षण पूर्ण होऊन सेटल होईपर्यंत पंचविशी उलटून जाते. विभक्त कुटुंब पद्धती असल्याने लग्न जमविण्यासाठी वधू-वर संस्थांमध्ये नावं नोंदवली जातात. तिथे मिळणारी माहिती आणि प्रत्यक्ष परिस्थिती यात तफावत असू शकते. त्यासाठीच अशा जाहिरातीतून त्या संस्था आमच्याकडील स्थळं ही ‘खरी’ असल्याची जाहिरात करतात..
गेल्याच आठवड्यात एक मित्र कोरोनाच्या लाटेमुळे, दोन वर्षांनंतर भेटला. त्याला सहज विचारलं, ‘लग्नाचे लाडू कधी देणार?’ त्यानं जे उत्तर दिलं, ते ऐकून मलाही वाईट वाटलं.
वयाची तिशी गाठायला आलेला तो मित्र, आजच्या लग्नाच्या शर्यतीत खूपच मागे राहिला होता.. कारण चलती होती, ती ‘आयटी’वाल्यांसारख्या मोठ्या गलेलठ्ठ पगारवाल्यांचीच! सर्वसाधारण मुलींनाही आज, पन्नास हजार ते एक लाख रुपये पगार मिळविणाऱ्याची अपेक्षा आहे. त्यापेक्षा कमी पगार असणाऱ्या मुलांना, त्यांच्याकडून सरळ नकारच मिळतो.
याला कारण आहे, हल्लीची चंगळवाद संस्कृती.. मराठी-हिंदी मालिकांमधून रोज बावीस मिनिटांचे स्वप्निल व आभासी, श्रीमंती वातावरण दाखवले जाते. या मुलींना ते ‘नकली विश्व’च खरे वाटते व तसा मुलगा मिळेपर्यंत त्या चांगल्यांना नकार देत, थांबून राहतात..
आता या मित्राला तूर्तास जरी पगार कमी असला तरी नंतर तो वाढू शकतो किंवा त्याला उत्पन्नाच्या इतर वाटा मिळू शकतात, यावर कोणीही विश्वास ठेवू इच्छित नाही. पगाराशिवाय त्याच्या इतर चांगल्या गुणांकडे साफ दुर्लक्ष केले जाते, याचा खेद वाटतो.
आत्ताचं जीवन हे, ‘रेडी टू कुक’ झालंय. कुणालाही स्वतःहून हातपाय हलवण्याची इच्छा नाही. कष्ट, तडजोड, संघर्ष, संकटं कशाला म्हणतात हे देखील माहीत नाही. अवास्तव अपेक्षा ठेवल्याने शेवटी त्यांच्या पदरी नैराश्यच पडतं.
आज ना उद्या माझ्या या ‘नारायण’ मित्राला चांगली ‘लक्ष्मी’ जोडीदार म्हणून मिळेलच. मात्र त्याची व्यथा ऐकून, यापुढील ‘सत्य’ नारायणांवर, लक्ष्मी कितपत प्रसन्न होतील ही शंका वाटू लागली आहे…
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१७-१-२२.
Leave a Reply