नर्मदालयाच्या “भारती ठाकूर” ( प्रव्राजिका विशुद्धानंदा) यांच्याशी संपर्क होण्याचा पहिला क्षण आला २०१६ साली. माझ्या भुसावळच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये या संस्थेची आणि भारतीताई ठाकूर यांची त्रोटक माहिती त्यांत होती. मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि काही राशी पाठविली. तत्पर उत्तर आणि पावती मेलवर आली.
नाशिकच्या गोदा तीरावरील भारती ताई आता नर्मदेच्या तीरावर असतात. मागील महिन्यात जितेंद्र जोशींचा “गोदावरी” पाहिला आणि काल अचानक भारती ताईंच्या दोन पुस्तकांमधून “नर्मदा ” भेटली.( नव्या वर्षाच्या पुढील आठवड्यात माझ्या “तापी” नदीच्या भेटीला भुसावळला जातोय. या नदी त्रयाची माझी हॅटट्रीक होतेय).
” आतल्या” नर्मदेला उरी सांभाळत भारती ताईंनी परिक्रमेची अंतर्यात्रा केली आणि आज माझे ते पुस्तक वाचून झाले. २०१६ पासून नर्मदालय बघण्याची /त्याला भेट देण्याची आस लागलीय. दरम्यान भारती ताईंनी संन्यास घेतल्याचे अरुणा ढेरे यांच्या चेहेरे-पुस्तिकेवरून कळाले.
परवा ४ डिसेंबरलाच पुण्यात “गोष्ट नर्मदालयाची” नामक भारती ताई लिखित पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यांना भेटण्याची आणि पुस्तक घेण्याची संधी तेव्हाही हुकली कारण नेमक्या त्याचदिवशी माझ्या पत्नीच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन होते.
पण माझी इच्छा तीव्र असावी बहुधा, कारण आमच्या डी एस के विश्व मध्ये वर्षाखेरीचा आनंद मेळावा भरतो, तिथे अनपेक्षितपणे नर्मदालयाचा स्टॉल दिसला.
शेवटी “जिनको मिलना हैं, वो मिलके रहते हैं !”
स्टॉलवरील त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुहास्य वदनाने बोलावलंय नर्मदालयात !
मुखपृष्ठावर संधिप्रकाशाकडे झुकलेला केशरी-भगवा सन्यस्त नर्मदेचा प्रवाह, कोणी अज्ञात नावाडी चालवतोय एक नौका – नौकेत कोणीही नाही पण तिच्यावर मावळतीच्या सूर्यबिंबाचे वाहात येणारे मृदू किरण (तिचा मार्ग प्रशस्त करणारे) बस्स एवढेच ! आजवर जगन्नाथ कुंटे यांच्या “नर्मदे हर हर ” मधून वाहिलेल्या नर्मदेचे अंतरंग पाहिले होते.
पण या अंतर्यात्रेत भारती ताईंनी मंदिरांचे ऋतुचक्र विशद केलंय, एका ज्येष्ठराज वटवृक्षाची (” जा,तप कर आणि शोध स्वतःच ब्रह्म म्हणजे काय ” या थाटाची) दटावणी- ” तूच शोध ना माझा देह निष्पर्ण होताना काय वाटत असेल मला या प्रश्नाचे उत्तर”, विस्थापितांच्या अश्रुंसाठी धरण बांधण्याची कल्पना, असंख्य श्लोक आणि त्यांचे लोकसंग्रहातील प्रतिबिंब असे विलक्षण अनुभव नमूद केलेले आहेत .
त्यांच्या आतली नर्मदा म्हणजे एका किनाऱ्यावर भारती ताई आणि दुसऱ्या किनाऱ्यावरील साक्षीभावाने सतत त्यांना टोचत राहणारी सदसदविवेकबुद्धी यांच्यामधला जिवंत प्रवाह.
” अध्यात्म म्हणजे माणुसकी “,
“साधना म्हणजे मनुष्य आणि ईश्वर यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी मानवाने केलेली वाटचाल”
असं बरंच सोप्पं तत्वज्ञान या पुस्तकात मला मिळत गेलं.
नदी खऱ्या अर्थाने संगोपन करीत असते,म्हणून तिला “नदी” म्हटल्यावर चिडलेला आदिवासी “मैय्या” कहो असं भारतीताईंना सुनावतो. २००५-२००६ च्या दरम्यान केलेली ही पैदल प्रदक्षिणा, म्हणून त्यांत महाकाय सरदार सरोवर आणि तदानुषंगिक सगळे संदर्भ भेटतात.माणुसकीचे संदर्भ पावलोपावली भेटतातच पण क्वचित दडलेल्या,”खऱ्या” माणसांचे दर्शनही घडते.
रायपूरला असताना माझ्या सहकाऱ्यांसमवेत “अमरकंटक ” येथील नर्मदेचा उगम मी पाहिला आहे पण मला व्यक्तिशः नर्मदा परिक्रमा करावी असे वाटत नाही. बसने नाही आणि कोणाबरोबरही नाही. एकट्याने बघू, कधी जमलीच तर ! तोवर हे पुस्तक आहेच की नर्मदास्नानाची अनुभूती देणारे !
आता “गोष्ट नर्मदालयाची” वाचायला घेईन.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply