नवीन लेखन...

नर्मदाष्टक – मराठी अर्थासहित

असे म्हटले जाते की, भारतातील तीन महत्त्वाच्या नद्यांपैकी, गंगा नदी मोक्षदायिनी, यमुना प्रेमाची  अनुभूती देणारी, तर नर्मदा ही वैराग्यदायिनी आहे.  नर्म म्हणजे सुख. नर्मदा म्हणजे सुखदायिनी. या खळाळत जाणार्‍या नर्मदेचे मोठे हृद्य वर्णन आद्य शंकराचायार्यांनी आपल्या नर्मदाष्टकात केले आहे.

हे स्तोत्र पंचचामर (गण- ज र ज र ज ग) वृत्तात रचले आहे.

 सबिन्दु-सिन्धु-सुस्खलत्तरङ्ग-भङ्ग-रञ्जितं
द्विषत्सु पापजात-जातकारि-वारि-संयुतम् ।
कृतान्तदूत-कालभूत-भीतिहारि-वर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे।। १

मराठी-  जी खळाळत्या पाण्याच्या लाटांबरोबर पाण्याचे तुषार उडवत वेगाने वाहताना शोभायमान दिसते, पापातून ज्यांची इतरांचा रागराग करण्याची प्रवृत्ती जन्म घेते त्यांची पापे जिचे जल नष्ट करते, जी यमाचे दूत तसेच भूत-पिशाच्च यांचे भय दूर करणारे कवच प्रदान करते अशा देवी नर्मदे, तुझ्या चरणकमलांना मी वंदन करतो.

खळाळते तरंग, जोमदार थेंब शोभती
निमित्त आकसा कुकर्म त्यास वीचि क्षाळिती ।         (वीचि – लाट)
पिशाच्च भूत भीति दूर कट्ट देत साधते             (कट्ट – चिलखत)
तुझे पदारविंद वंदितो सदैव अमृते ॥ ०१             (अमृता – नर्मदा)


त्वदंबुलीनदीनमीनदिव्यसंप्रदायकम्
कलौ मलौघभारहारि सर्वतीर्थनायकम् ।
सुमत्स्य-कच्छ-नक्र-चक्र-चक्रवाकशर्मदे
त्वदीयपादपंकजं नमामि देवि नर्मदे ।। २

मराठी- तुझ्या जळात असलेले छोटे-मोठे जीव, मासे यांना स्वर्गीय अनुभूती देणार्‍या, कलियुगात पातकांचे ओझे हरण करणारे सर्वश्रेष्ठ तीर्थ असणार्‍या, जलचर प्राणी, कासवे, मगरी, चक्रवाकासारखे विविध पक्षी यांच्यासाठी आनंददायक अशा देवी नर्मदे, तुझ्या चरणकमलांना मी वंदन करतो.

जळात क्षुद्र जीव, दिव्य त्या प्रचीति देतसे
कलीयुगी कुकर्म नाश श्रेष्ठ तोय जे असे |
खगां नि मत्स्य, नक्र, कासवांस सौख्य लाभते
तुझे पदारविंद वंदितो सदैव अमृते ॥ ०२


महागभीरनीरपूरपापधूतभूतलं
ध्वनत्समस्तपातकारिदारितापदाचलम् ।
जगल्लये महाभये मृकंडुसूनुहर्म्यदे
त्वदीयपादपंकजं नमामि देवि नर्मदे ॥ ३

मराठी- तुझे अत्यंत खोल पात्र व पाण्याचा लोंढा या भूमीवरील पातके साफ करतो, प्रचंड आवाज करीत पापांचा शत्रू असलेला तो (लोंढा) संकटांच्या राशींचा चक्काचूर करतो, सर्व जग जिच्यात विलय पावते, जी सर्व जगाला पूर्ण अभय देते, जी मार्कण्डेय ऋषींना विशाल निवासस्थान देते, अशा देवी नर्मदे, तुझ्या चरणकमलांना मी वंदन करतो.

अतीव खोल, तोय-लोट भूमि-पाप धूत ते
अरिष्ट पर्वतास पाप-शत्रु-धून फोडिते ।              (धून – आवाज)
विनाश काळ आसरा, नि भार्गवास धाम दे          (भार्गव- भृगूच्या कुळातील- मार्कण्डेय)
तुझे पदारविंद वंदितो सदैव नर्मदे ॥ ०३

टीप- भाविकांची अशी श्रद्धा आहे की, मार्कण्डेय ऋषी हे नर्मदा-परिक्रमेचे आद्य प्रवर्तक असून, त्यांनी सुमारे सात हजार वर्षापूर्वी सर्वात प्रथम नर्मदा परिक्रमा केली. नुसती नर्मदाच नव्हे, तर तिच्या उभय तटांवर तिला येऊन मिळणाऱ्या सर्व नद्यांचे धारा-प्रवाह न ओलांडता प्रत्येकीच्या उगमाला वळसा घालून केलेल्या या महापरिक्रमेला त्यांना सुमारे ४५ वर्षे लागली ! मांडू व तेथील मंडपेश्वर महादेव मंदिर ऋषि मार्कण्डेयांची तपोभूमी राहिली आहे.


गतं तदैव मे भयं त्वदम्बुवीक्षितं यदा,
मृकण्डुसूनुशौनकासुरारिसेवितं सदा।
पुनर्भवाब्धिजन्मजं भवाब्धिदु:खवर्मदे
त्वदीयपादपंकजं नमामि देवि नर्मदे ॥ ४

मराठी- त्याचप्रमाणे मार्कण्डेय, शौनक आणि देवांनी जे नित्य सेवन केले ते तुझे जल बघताच माझी भीती नाहीशी झाली. या संसारसागरात पुनः झालेल्या जन्मामुळे होणार्‍या दुःखांपासून जी संरक्षण देते, अशा देवी नर्मदे, तुझ्या चरणकमलांना मी वंदन करतो. (येथे पहिल्या चरणात ‘मे भवं’ असा पाठभेद आढळतो. तो घेतल्यास माझा या जगताशी असलेला संग नाहीसा झाला असा अर्थ होईल.)


जलास भार्गव द्वया समेत देव सेविती
तया बघून वाटते न भीति या जगाप्रती ।
जगात जन्मता पुन्हा बले विरुद्ध कट्ट दे     (बला – संकट, कट्ट-चिलखत)
तुझे पदारविंद वंदितो सदैव नर्मदे ॥ ०४

टीप- मार्कण्डेय आणि शौनक दोघेही भृगू ऋषींचे वंशज असल्याने त्यांना उद्देशून ‘भार्गव द्वय’ असा शब्द उपयोजिला आहे.


अलक्ष्यलक्षकिन्नरामरासुरादि पूजितं,
सुलक्ष नीरतीर–धीरपक्षिलक्षकूजितं ।
वशिष्ठ-शिष्ट-पिप्पलादि-कर्दमादिशर्मदे
त्वदीयपादपंकजं नमामि देवि नर्मदे ॥ ५

मराठी- जल पूजणारे (पण) नजरेला न दिसणारे लक्षावधी यक्ष, किन्नर, गंधर्व, देव तसेच दैत्य यांनी पूजिलेले, तीरांवरील (वृक्षराजीतील) लक्षावधी स्वैर पाखरांनी किलबिलाट केलेले तुझे अत्यंत सुंदर पदकमल ! वशिष्ट, पिप्पलाद, कर्दम इत्यादि विद्वान ऋषींना आनंद देणार्‍या देवी नर्मदे, तुझ्या चरणकमलांना मी वंदन करतो.

अदृश्य लक्ष देव दैत्य किन्नरादि पूजिती
विहंग गायने सुरेल स्वैर तीर गुंजती ।
वशिष्ठ थोर पिप्पलाद कर्दमांस मोद दे
तुझे पदारविंद वंदितो सदैव नर्मदे ॥ ०५

टीप- पिप्पलाद हे उपनिषदांचे महान ऋषी आणि अथर्ववेदाचे पहिले संकलक होते. पिप्पलाद नावाची अथर्ववेदाची एक शाखा आहे. तसेच प्रश्नोपनिषदातही त्यांचा निर्देश आहे. ते एक महान विद्वान आणि धर्मशास्त्रज्ञ होते.

ब्रह्मदेवाच्या सावलीपासून उत्पन्न झालेले कर्दम ऋषी स्वायंभुव मनूचे जामात होते. त्यांनी ऋग्वेदातील अनेक ऋचा रचल्या असून, प्रख्यात श्रीसूक्ताच्या तीन रचनाकारांपैकी ते एक आहेत.


सनत्कुमार-नाचिकेत-कश्यपादिषट्पदैः
धृतं स्वकीयमानसेषु नारदादिषट्पदै: ।
रवीन्दु-रन्तिदेव-देवराज-कर्मशर्मदे
त्वदीयपादपंकजं नमामि देवि नर्मदे ॥ ६

मराठी- सनत्कुमार, नाचिकेत, कश्यप तसेच नारद इत्यादींनी भुंग्याप्रमाणे ज्या (पदकमला) ला आपल्या मनात स्थान दिले आहे, सूर्य, चंद्र, इन्द्र तसेच राजा रन्तिदेव यांचे कार्य जी सुखकारक बनवते, अशा देवी नर्मदे, तुझ्या चरणकमलांना मी वंदन करतो.

ख-चंद्र इन्द्र रन्तिदेव तू तयास मोद दे         (ख- सूर्य)
दनूपती सनत्कुमार नाचिकेत नारदे ।          (दनूपती – दक्षाचा जावई, कश्यप)
मनात ठेविली मधूप जेवि जी तुझी पदे
तुझे पदारविंद वंदितो सदैव नर्मदे ॥ ०६

टीप- सनत्कुमार हे ब्रह्मदेवाच्या चार पुत्रांपकी एक होते. श्रीमद् भागवतात त्यांचा उल्लेख विष्णूचा अवतार असा केला आहे.

वाजश्रवस् चा मुलगा नचिकेत त्याच्या यमाशी झलेल्या संवादाबद्दल प्रसिद्ध आहे. ही कथा व संवाद कठोपनिषदामध्ये येतात.

सप्तर्षींपैकी एक कश्यप ऋषी मरीचीचा पुत्र (ब्रह्मदेवाचा नातू) व दक्ष प्रजापतीचा जामात. भागवत पुराण आणि मार्कंडेय पुराणानुसार, कश्यप ऋषींना तेरा, तर मत्स्य पुराणानुसार नऊ पत्नी होत्या. एका परंपरेनुसार देव, दैत्य, दानव, यक्ष, गंधर्व, राक्षस, सर्प, हे सर्व प्राणी कश्यपापासून उत्पन्न झाले आहेत.

सम्राट ‘संकृति’ चा पुत्र असलेला भरतवंशीय सम्राट रन्तिदेव हा एक महापराक्रमी व अत्यंत दानशूर राजा होता. त्याची विस्तृत कथा श्रीमद्भागवत व महाभारताच्या द्रोण पर्वातील अभिमन्युवध पर्वात येते.


अलक्ष्यलक्ष्यलक्षपापलक्षसारसायुधं
ततस्तु जीव जन्तु-तन्तु-भुक्तिमुक्तिदायकम् ।

विरंचि-विष्णु-शंकरस्वकीयधामवर्मदे
त्वदीयपादपंकजं नमामि देवि नर्मदे ॥ ७
मराठी- दृश्य आणि अदृश्य स्वरूपातील लक्षावधी पातके नष्ट करणारे, लक्षावधी सारस पक्षी ज्यात विहार करतात, जे विविध प्राण्यांना आनंद व मोक्ष देते असे जल (असणार्‍या), ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या तुझ्या ठिकाणी असलेल्या अस्तित्त्वाने भक्तांना जी संरक्षण देते अशा देवी नर्मदे, तुझ्या चरणकमलांना मी वंदन करतो.

करी कुकर्म नाश, ना दिसो दिसोत जी, जले
किड्यांस देत मोक्ष मोद क्रौंच संग गुंतले ।
त्रिदेव राहती सवे, उपासकांस राखते
तुझे पदारविंद वंदितो सदैव अमृते ॥ ०७


अहोऽमृतं स्वनं श्रुतं महेशकेशजातटे
किरात-सूत-वाडवेषु पंडिते शठे नटे ।
दुरन्तपाप-तापहारि सर्वजन्तुशर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥ ८

मराठी- भगवान शंकराच्या जटेपासून उत्पन्न झालेल्या नर्मदेच्या किनारी मी अमृतासमान गोड ध्वनी (अमरत्त्वाचा ध्वनी) ऐकला. भिल्ल, सारथी, ब्राह्मण, विद्वान, गुंड-पुंड यांचे घोर पाप आणि त्रास नष्ट करणारी आणि सर्व प्राणिमात्रांना सुखकर होणारी, अशा देवी नर्मदे, तुझ्या चरणकमलांना मी वंदन करतो.

कचात मूळ शंभुच्या, तिरी सुधेसम ध्वनी
विदग्ध भिल्ल सारथी नि गुंड पुंड ब्राह्मणी ।
कुकर्म घोर त्रास नाश प्राणिमात्र सौख्य दे
तुझे पदारविंद वंदितो सदैव नर्मदे ॥ ०८

टीप- स्कंदपुराणातील कथेनुसार राजा पुरुरव्याने घोर तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न केले व सर्व जगताच्या पापनाशासाठी नर्मदेला पृथ्वीवर आणले.


इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा
पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गतिं कदा ।
सुलभ्य देहदुर्लभं महेशधामगौरवं
पुनर्भवा नरा न वै विलोकयन्ति रौरवम् ॥ ९

मराठी- हे नर्मदाष्टक जे (दररोज) तीन वेळा पठण करतात त्यांची कधीही वाईट अवस्था होत नाही. तसेच ते (मनुष्यप्राण्यांना) मिळण्यास अवघड अशा सन्मानाने सहज शिवलोकास जातात. त्यांना पुनर्जन्म नसतो किंवा रौरव नरकाकडे ते बघतही नाहीत.

त्रिकाळ नर्मदा स्तुती सदैव रोज जो म्हणे
तया कधी न दुर्दशा, कधीच ना असे उणे ।
निधीपदी ठिकाण लाभणे कठीण, लाभते            (निधी – शंकर)
बघे न रौरवाकडे, नि जन्ममृत्यु संपते ॥ ९

। इति नर्मदाष्टकम संपूर्णम् ।

*********************

धनंजय बोरकर (९८३३०७७०९१)

धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर 60 Articles
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..