असंच एक देखणं हिलस्टेशन म्हणून महाराष्ट्रातल्या माथेरानला नावाजलं जातं. माथेरानचा अर्थही ‘डोंगरमाथ्यावरील जंगल’ असाच आहे. या हिलस्टेशनचा शोध ‘चौक’ या गावातून एका ब्रिटिश अधिकाऱ्याला लागला. नेरळकडून माथेरानकडे जाण्यासाठी अनेक वर्षे घोडे व पायवाटेचा मार्ग होता. नंतर अनेक वर्षांनी नेरळ माथेरान रेल्वे बांधली गेली. या रेल्वेबांधणीचा इतिहासही मोठा मनोरंजक आहे. सन १९००च्या सुमारास या रेल्वेबांधणीची कल्पना एका एतद्देशियाच्या मनात आली. त्याचे नाव अब्दुल हुसेन. सर आदमजी पीरभॉय या यशस्वी उद्योजकाचे ते चिरंजीव. माथेरानचं वर्णन ऐकून त्यांचं कुतूहल जागं झालं..दोघे बापलेक मुंबईहून लोकलनं थेट नेरळला उतरले, परंतु त्यांना वर माथेरानला जाण्यास ना बग्गी होती ना घोडा होता! काहीच न मिळाल्याने हिरमुसले होऊन ते दोघे नेरळहून थेट मुंबईत परतले. या एका घटनेमुळे नेरळ-माथेरान रेल्वेमार्गाची आखणी सुरू झाली. या परतीच्या प्रवासात अब्दुल्लांनी मनात निश्चय केला, की ते पुढच्या वेळी ‘स्वत: बांधलेल्या रेल्वे मार्गाने’ माथेरानला पोहोचतील आणि मग खरोखर भगीरथ प्रयत्नांनी ‘माथेरान रेल्वे प्रकल्प’ साकारला गेला. या प्रकल्पाला प्रत्यक्ष प्रारंभ व्हायला १९०४ साल उजाडलं. प्रथम वडलांच्या मागे लागून त्यांनी १० लाख रुपयांचं भांडवल उभारलं. हळूहळू सर्व थरांतून पैसे जमा होऊ लागले. अतिशय घनदाट जंगल, वेडेवाकडे डोंगरकडे आणि अवघड असलेल्या दऱ्या यांतून मार्ग काढणं फार मुश्कील काम होतं. अशा वेळी नुकताच कलका-सिमला रेल्वे मार्ग बांधून झाला होता. त्याचा अनुभव गाठीला असलेल्या रावसाहेब हरिचंद्र यांना बोलावून घेण्यात आलं. अब्दुल्ल हुसेन स्वत: जातीने नेरळमध्ये वास्तव्यास गेले व हे सर्व काम त्यांनी स्वत:च्या देखरेखीखाली सुरू केलं. मार्गात सापांची अनेक बिळं होती. अंधश्रद्धेमुळे कामगार सापांना मारण्यास तयारही होत नसत. अखेर साप मारण्याकरता एका सापामागे एक रुपया बक्षिसी देण्यास सुरुवात झाली आणि मार्ग सापमुक्त झाला. ब्रिटिश सरकारनं पुणे-मुंबई येथून सैन्याची मदत पाठवली. कामानं वेग घेतला. या रेल्वेमार्गाचं स्वप्न पाहणारे, अब्दुल हुसेन हे स्वत:च या छोट्या मार्गावर चालणारी छोटी इंजिनं आयात करण्याकरता जर्मनीला गेले. डब्यांची बांधणी भारतातच झाली आणि हा स्वप्नवत मार्ग तयार झाला. गाडी सज्ज झाली, पण एक अडथळा यानंतरही समोर उभा, ठाकलाच. उभ्या कड्याच्या बाजूनं जाणाऱ्या गाडीवर भुताटकीचा प्रयोग होईल या भीतीपोटी कोणी प्रवासी तयार होत नव्हते. शेवटी इंजिनमध्ये ड्रायव्हरसोबत स्वतः अब्दुल हुसेन बसले आणि लोकांची भीती त्यांनी दूर केली. सर्व कामगार रुळांच्या दोन्ही बाजूला उभे राहून गाडीचं संरक्षण करत होते. पहिल्याच प्रवासात अब्दुल यांच्या अंगातील कोट फाटला, परंतु तसाच प्रवास करीत ते माथेरानला उतरले. मार्गावरील कामगारांना त्यांनी प्रेमापोटी आपल्या खिशातील सर्व नाणी वाटली. गंमत अशी, की पैसा आदमजींचा (वडलांचा), मेहनत अब्दुल्लांची (मुलाची) व लाभ मात्र पर्यटकांना मिळाला. या मार्गाच्या उद्घाटनाचं साल होतं १९०७ आणि महिना होता मार्च.
हा प्रवास करताना, वॉटर पाईप व जुम्मापट्टी स्टेशनांजवळ स्वागताला उभी असलेली माकडांची फौज, करवंदं-जांभळांचे वाटे पानातील द्रोणात घेऊन खिडकीशी लटकून चालत्या गाडीत शिरणारी आसपासच्या खेड्यांतील मुलं-मुली, त्यांच्या चेहऱ्यांवरचे निरागस भाव, हे चित्र मनावर खोलवर कोरलं जातं. माथेरान जवळ येऊ लागतं, तसे दोन्ही बाजूंनी तांबड्या मातीचे रस्ते, घोडेवाले, माणसांनी ओढल्या जाणाऱ्या रिक्षा, हिरवी गर्द झाडी, हिल स्टेशनचा जाणवणारा थंडगार वारा, हे वातावरणच मोहित करत सामोरं येतं. त्यात इंजिनाची दीर्घकाळ वाजणारी शिटी सुरू झाली, म्हणजे माथेरान स्टेशन जवळ आल्याची खूण पटते. अडीच तासांचा प्रवास कसा संपतो ते कळतच नाही.
श्रीमंत लोकांसाठी स्पेशल रेल्वे मोटारकोच लावण्याचा मान प्रारंभकाळात या गाडीला मिळाला होता. मुंबईहून शुक्रवारी पुण्याकडे जाणारी डेक्कन क्वीन व सोमवारी पुण्याहून मुंबईकडे येणारी डेक्कन क्वीन नेरळला थांबत असे, कारण बडे रईस लोक त्या काळात शनिवार-रविवारी माथेरानला जाऊन आपल्या बंगल्यावर आराम करीत असत.
पावसाळ्यात हा मार्ग बंद असे, पण हळूहळू या मार्गावर अनेक दरडी कोसळल्याने वीस-पंचवीस वर्षांपूर्वी हा मार्ग पूर्णपणे बंद पडला व पुढे तर तो कायमचाच बंद पडण्याची शक्यता वाटू लागली. रेल्वेला हा मार्ग चालू ठेवण्याचा खर्च परवडत नव्हता, मात्र ‘जागतिक वारसा’ यादीमध्ये ‘माथेरान टॉय ट्रेन’चं नाव झळकलं, चक्रं वेगात फिरली आणि आता नेरळ ते माथेरान गाडीचा मानाचा प्रवास पुन्हा सुरू झाला आहे…
नॅरोगेज ट्रेनचं विश्वच निराळं आहे आणि ते एकदा अनुभवलं, की पुन:पुन्हा साद घालणारं आहे.
-डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply