नवीन लेखन...

नरसोबावाडीला श्रीगुरुंचे वरप्रदान

श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराज राजाधिराज असल्याने त्याचे आगमन व काही काळ वास्तव्य येथे होणार या कल्पनेनेच इ.स. १०३४ मध्ये प.प. श्रीरामचंद्र योगी हे या कृष्णा पंचगंगा संगमावर श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज वास्तव्य करण्याआधी ४०० वर्षे येऊन वास्तव्य करु लागले. ज्यांच्या आगमनाच्या वार्तेनेच भूमी शेकडो वर्षे पावन झाली आहे.

श्रीरामचंद्रयोगी योगाभ्यासामध्ये अत्यंत निष्णात व आपण स्वत: पावन होऊ अशा भावनेने कित्येक वर्षे सतत ध्यानस्थ बसून स्वत:चे जीवन स्वामींच्या सहवासाने सार्थक मानणारे श्रीरामचंद्रयोगी यावच्चन्द्रदिवाकरौ येथे वास्तव्य करुन राहतात. त्यांची जीवंत समाधी येथे प्रथमच आहे. त्यांची पूजा अर्चा पुजारीमंडळी नित्य करतात. परिवार देवतेमध्ये किंवा सनकादिक म्हणून त्याला अग्रस्थान लाभले आहे त्यांची पूजा प्रथम होते. शंकराची पिंडी व शाळूकीच्या स्वरूपांत त्यांचे स्मारक या ठिकाणी आहे. उन्हाळ्यात त्या पिंडीवर दहीभाताची (बुत्ती) पूजा बांधून शांतता निर्माण करुन मंडळी त्या योगे आपापले मनोरथ पूर्ण करुन घेतात.

श्रीनारायणस्वामी महाराज श्री. प.पू. या नावाने नरसिंहसरस्वती महाराजांचे पट्ट शिष्य होऊन गेले. त्यांनी पूर्वाश्रमी काशीस जावून सहा शास्त्रांचा गाढ अभ्यास केला. बारा वर्षांनंतर गुरुंच्या आज्ञेने कोणाशीही वाद करणार नाही, असा गंगेत उदक सोडून संकल्प केला आणि परत कोल्हापुरास येऊन श्रीदत्तदर्शनास वाडीस आगमन केले. अत्यंत विरक्ती व दत्तभक्तीने प्रेरित होऊन ईश्वरनिष्ठ झाल्यामुळे श्रीनृसिंह सरस्वतींनीं त्यांना आपलेसे केले. कृष्णा-पंचगंगा संगमावर त्यांना नेले व तीन दिवस संगमात अवगाहन करून तेथे त्यांना संन्यासदीक्षा दिली. तीन दिवसानंतर दंडधारी वेषातच ते गावात आले असता लोकांना त्यांच्या आश्रमाबद्दल शंका येऊ लागल्याने पुजारी मंडळींना साक्षात् महाराजांनी दृष्टांत देऊन सांगितले. त्यावर सर्व लोकांना नारायणस्वामींचे महत्व कळले व त्या दिवसापासून ते सर्व त्यांना आदराने वागवू लागले. त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली अशा तऱ्हेने श्रीदत्त महाराजांचे एकनिष्ठ व उत्तम शिष्य म्हणून श्रीनारायणस्वामींना श्रीनृसिंह वाडीमध्ये मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. याच नारायण स्वामींच्या मंदिरात उत्सवमूर्तीचे कायमचे वास्तव्य असते. यांचा समाधीकाल इ.स.१८०५ आहे.

श्री कृष्णानंद स्वामी (काशीकर) – श्री.प.प. कृष्णानंद सरस्वतीस्वामी यांची समाधी श्रीमत् नारायणस्वामीच्या समाधीला लागूनच आहे. हे कृष्णानंद सरस्वती श्रीनारायण स्वामींचे शिष्य अत्यंत सात्विक ! ब्रह्मचर्याश्रमातूनच संन्यास दीक्षा आणि गुरुंच्या सान्निध्यात राहून श्रीदत्त व गुरुसेवा केली. गुरु शिष्य संवादात्मक ग्रंथ लिहून सामान्य लोकांना तत्त्वबोध व्हावा या उद्देशाने त्यांनी ‘अज्ञानतिमीर दीपक’ नांवाचा वेदान्त रहस्य प्रतिप्रादक असा एक ग्रंथ लिहिला.

श्रीगोपाळस्वामी परमपूज्य गोपाळस्वामी यांची समाधी कृष्णानंद सरस्वतीस्वामींच्या समाधीला लागून आहे. हे अवतारी पुरुष होऊन गेले. हे परमयोगी होते. यांच्या योगाभ्यासाबद्दल एक आख्यायिका येथे प्रसिद्ध आहे. एकदा बद्ध पद्मासन घालून समाधी लावून हे बसले असता देहभान विसरल्यामुळे सर्व व्यवहारच बंद पडले आणि त्यामुळे भक्त मंडळींना त्यांच्याशी संभाषिणादि कोणतेही व्यवहार करता येईनात. सर्व भक्त मंडळी अस्वस्थ झाली. शेवटी सर्वांनी महाराजांची प्रार्थना केली. मग त्यांचे समाधीतून उत्थान झाले. त्यावेळी सर्व भक्त मंडळींना आनंद झाला. अशा प्रकारे वारंवार त्यांची समाधी लागत असे.

पुढे त्यांनी आपले समाधीस्थान निश्चित करुन ते ठिकाण दगडांनी बांधून घेतले व गुहेच्या स्वरूपात आपले स्थान तयार केले. आता आपण कायम या ठिकाणी समाधी लावून बसणार असे सर्वांनी सांगून एके दिवशी सर्व पूजासंभार गोळा करुन इष्ट देवतेची पूजा करुन समाधी स्थित झाले व पूर्व सूचनेनुसार भक्तांनी त्यांच्यावर दगडांनी समाधी बांधली. त्यावर पिंपळाचे झाड लावण्यात आले. याला कांही वर्षे लोटली. पुढे ते झाड मोठे झाल्यावर त्याचे मूळ स्वामींच्या गळ्याला टोचू लागले. त्यावेळी पुजारी मंडळींना ती मुळी काढून टाकण्यासंबंधी दृष्टांत झाला. त्यावर सर्व पुजारी मंडळींनी त्यांची प्रार्थना करुन समाधीचे दगड काढले असता स्वामींची मूर्ती जशीच्या तशीच बसलेली सर्वांनी पाहिली. सर्व भक्त मंडळीची गर्दी झाली. झाडाची मुळी खरोखरच स्वामींच्या गळ्याला विळखा घालून उपद्रव देत होती असे आढळून आले. मुळीचा उपद्रव नाहीसा केल्यावर समाधीस्थान पूर्ववत् बंद करुन घेतले. त्यानंतर मात्र पुन्हा त्यासंबंधी कोणतेही प्रत्यंतर आले नाही. आत जाण्यास पूर्वेकडून द्वार होते. तेही बंद करण्यात आले. त्यानंतर आजपावेतो कोणत्याही प्रकारचा त्याचा संकेत किंवा संदेश आला नाही. अशी हकीकत परंपरागत प्राचीन लोकांच्या तोंडून ऐकली आहे.

श्रीमौनीस्वामीमहाराज श्रीमौनीस्वामीमहाराजांची समाधी श्रीगोपाळस्वामींच्या समाधी जवळ आहे. हे मौनीस्वामी जन्मजात नित्य शुद्ध, मुक्त व सप्तम भूमिकारूढ असे योगी होते. त्यांना देहभान नव्हते. कोठेही स्वैरसंचार देहभानच नसल्यामुळे लोकव्यवहाराची असंबद्ध असा होता. बोलण्या-चालण्यात सर्वत्र असंबद्धता नव्हती. कोठे बसतील तेथे बसून रहावे. शरीराकडे दुर्लक्ष. एखादे वेळी शरीराच एखादा भाग कोल्हीकुत्री कुरतडत असत. पण त्याचा प्रतिकारही केला जात नसे. बऱ्याच वेळा त्यांचे मौन चालू राही. पण थोडे दिवस बोलतही असत. बहुश: मौन हा त्यांचा स्थायी भाव होता.

हे स्वामी मूलत: सोलापूरचे होते. त्यांनी लहान वयातच आपले घर सोडून तीर्थयात्रा केली. कडुलिंबाचे पाने खाऊन त्यांनी दिवस काढले. त्यांनी पंचवीसाव्यावर्षी संन्यास घेतला व कित्येक वर्ष मौन पाळले. त्यामुळे त्यांना मौनीस्वामी असे म्हणत असत. यांच्या नेतृत्वाखाली रामभाऊ कवीश्वर यांचे महान यज्ञ निर्विघ्नपणे पूर्ण झाले. यांचे श्रीटेंबेस्वामींवर फार प्रेम होते. मंठामध्ये यांनी स्थापना केलेली उजव्या सोंडेची गणपती मूर्ती आहे.

श्रीब्रह्मानंदसरस्वती स्वामी श्रीब्रह्मानंदस्वामींची समाधी मौनीस्वामींच्या समाधी लागून आहे. या समाधीचे स्वरूप शंकराचे मोठे लिंग व साळुंखी त्यापुढे नंदी असे आहे. श्रीब्रह्मानंदसरस्वती या नांवाचे एक दंडी संन्यासी होऊन गेले. त्यांचे वास्तव्य येथे बरेच दिवस होते. सदाचारसंपन्न, कर्मठ व आदर्श संन्यासी म्हणून त्यांचे वर्णन करता येईल. सध्या | ब्रह्मानंदांचा मठ म्हणून प्रसिद्ध ठिकाण आहे. तेथे ते रहात असत. नित्य श्रीसेवा श्रीदत्तचरणावर पाणी घालणे. भजन पूजन व गुरुचरित्र वाचन इत्यादि सेवा करुन काल घालवित असत. नांवाप्रमाणे त्यांची ब्रह्मानंदी टाळी लागली होती. आनंदाचा खराखुरा भोक्ता श्रीब्रह्मानंद स्वामी होते. ईश्वर चिंतनाने व सगुण मूर्ती पूजनाने जे साध्य करायचे ते खऱ्या अर्थाने श्रीब्रह्मानंदांनी मिळविले होते. इतकेच नव्हे तर त्याचा त्यांच्या सहवासात जी माणसे आली त्यांना पण त्यांच्या ज्ञानाचा लाभ झाला.

श्रीगोविंदस्वामी हे मोठे अधिकारी पुरुष होते. ते आणि मौनीस्वामी समकालीन होते. ह्यांनाही श्री दत्ताचे सांगणे होत होते. हे ब्रह्मानंद मठाचे महाडीवर रहात होते.

वासुदेवशास्त्रींची ( हे टेंबे स्वामींच्या पूर्वाश्रमीचे नाव आहे.) नरसोबाचे वाडीस प्रथम कोणाशीच ओळख नव्हती. नेसलेला एक मळकट पंचा व एक पांघरलेला असा त्यांचा वेष पाहून हे ब्राह्मण तरी आहेत की नाहीत? असा तेथील पुजाऱ्यांना संशय आल्यामुळे त्यांना पादुकावर पाणी घालू दिले नाही. तेव्हा ते नुसते दर्शन घेऊन मुकाट्याने वर येऊ लागले.

इतक्यात श्री गोविंदस्वामींना प्रभूंचें सांगणे झाले की, पोथी वाचण्याचे सोडून मंडपात काय चालले ते पहा. त्या बिचाऱ्या लांबून आलेल्या ब्राह्मणाला पुजारी पाणी घालू देत नाहीत.’ हे सांगणे झाल्याबरोबर गोविंदस्वामी उठून खाली आले. वासुदेवशास्त्री खिन्न चित्ताने वर येत होते. त्यांना पाहताच श्री गोविंदस्वामी म्हणाले-‘शास्त्रीबुवा ! पादुकांवर पाणी घातले की नाही’ नंतर शास्त्रीबुवांनी घडलेली हकीकत सांगितली; तेव्हा श्री गोविंदस्वामींनी आपला दंड त्यांचे हातात देऊन त्यांचेसह स्वतः श्री गोविंदस्वामी देवाच्या मंडपात आले. नंतर शास्त्रीबुवांनी गुरु पादुकांना पाणी घातले. त्यावेळी त्यांना गुरुकृपेची अगाध लीला अनुभवून अत्यंत समाधान वाटले.

गोविंदस्वामींचा समाधीकाल जवळ आला. तेव्हा शास्त्रीबुवा वाडीतच होते. त्यांना त्यांनी दशोपनिषत् सांगून पूर्ण आशिर्वाद दिला. समाधीच्या आदल्या दिवशी शास्त्रीबुवांना उद्या गोविंदस्वामी देह सोडतील असा दृष्टांत झाला. तेव्हापासून बुवा त्यांच्या जवळच बसले. दुसऱ्या दिवशी गोविंदस्वामीचे निर्वाण झाले. त्यावेळी मौनी स्वामीसारख्या जीवनमुक्तनासह वाईट वाटले. नंतर यथाशास्त्र कृष्णेमध्ये स्वामींचा देह विसर्जन केले. शेवटी मौनीस्वामींचे आज्ञेप्रमाणे बुवा ह्यांचा हस्ते त्यांचा समाराधनविधी झाला.

श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबें स्वामी ) – श्री स्वामी महाराज पूर्वाश्रमीचे वासुदेव. त्यांच्या वडीलांचे नांव गणेश व मातोश्रींचे नांव रमाबाई. त्यांचे अत्रि गोत्र असल्याने त्यांची सर्वांशी मैत्री होती. शके १७७६ मध्ये श्रावण कृष्ण पंचमीस सायंकाळी पाचला सावंतवाडी प्रांतात माणगांवी त्यांचा जन्म झाला. मुलाची बुद्धि अति तीव्र असल्याने शाळेतील विषय तोंडपाठ करण्यास फार उशीर लागत नसे. वडील मातोश्री अत्यंत तपस्वी असल्याने मुलगापण सदाचरणी व तपस्वी होता. वयाच्या आठव्या वर्षी त्यांची मुंज झाली. विष्णुभट उकिरडवे यांच्याकडे वेदाध्ययन केले. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. वेदाध्ययन संपल्यावर शंभु शास्त्रींकडे संस्कृताचा अभ्यास केला व थोडे ज्योतिषशास्त्र साधले. शास्त्रांदिक वाचले. वेळेवर संध्यावंदन करण्याचे व्रत कधीही मोडले नाही. एकादशी कडकडीत उपोषण याप्रमाणे अंतर्बाह्य अत्यंत नियमपूर्वक आचरण व तेजस्वी अध्ययन यामुळे सर्वांची श्रद्धा वासुदेवावर बसली. विवाहोत्तर स्मार्ताग्निची उपासना चालू झाली व गायत्रीचे पुरश्चरणही केले. ज्योतिषाचे अभ्यासाने गावात काही लोकांना ज्योतिष सांगू लागल्याने व बऱ्याच लोकांना त्याचे ज्योतिष पटू लागल्यामुळे सर्वत्र त्यांची ख्याती होऊ लागली. पुढे स्वामींचे वडील वारले. त्यामुळे प्रपंचाचा सर्व भार वासुदेवावरच पडला. वासुदेवाच्या पत्नीचे व त्याच्या आईचे पटेना, पण पत्नीची बाजू त्यांनी कधीही घेतली नाही.

या घरगुती भांडणाने त्यांचे मन उद्विग्न होऊ लागले. मातोश्रींना वाईट वाटेल, म्हणून ते आपल्या पत्नीबरोबर कधी बोलतही नसत. शास्त्रीबुवा वाडीस आले. दत्तमहाराजांकडून शास्त्री बुवांना स्वप्नांत मंत्रोपदेश झाला. दत्तात्रेयांचे वास्तव्य सात वर्षे माणगांवास होणार असे सांगणे झाले म्हणून शास्त्रीबुवा वाडीतून माणगावास गेले. येथे विरक्तवृत्तीने देवळातच राहू लागले. त्या मूर्तीच्या आदेशानुसार शास्त्रीबुवा वागू लागले. कालांतराने पत्नी वारली. तिचा विधी झाल्यावर चौदाव्या दिवशी शास्त्रीबुवांनी संन्यास घेतला. त्याच रात्री गोविंद स्वामींच्यारूपात दत्तात्रेयांनी प्रणवाचा उपदेश करुन जप करण्यास सांगितले. महाराजांच्या आज्ञेने उज्जयिनीतील नारायणानंद सरस्वती स्वामींकडून वासुदेवानंद सरस्वतींनी दंड ग्रहण केला. पुढे प्रत्येक गोष्ट श्रीदत्त महाराजांच्या आज्ञेनुसार होऊ लागली. ह्याप्रमाणे एकूण चोवीस चातुर्मास केले. त्यातील पहिला चातुर्मास उज्जैनीस शके १८१३ मध्ये व शेवटचा चातुर्मास गरुडेश्वरास शके १८३५ मध्ये झाला. श्रीस्वामीमहाराज म्हणजे साक्षात् दत्तावतारच होते !

महान योगी गुळवणी महाराज हे श्री. प. पू. टेंबेस्वामींचे शिष्य महान योगी होते. ह्यांनी प्रदक्षिणा घालण्या करिता वाडीमध्ये मंडप बांधविला. ते प्रति गुरु द्वादशीला येथे येऊन रहात होते.

श्री. प. पू. गुळवणी महाराजांच्या मातोश्री उमाबाई येथे ह्या प्रदक्षिणा घालीत असता ओटीमध्ये त्यांच्या सकाळच्या प्रहरी चांदीच्या पादुका दत्त प्रभूंनी घातल्या. ते महाराजांच्या होते. या प्रकारचे पूजेत अनुभव किंवा दृष्टांत श्रीदत्तमहाराज या क्षेत्रात असंख्य लोकांना देत असतात. रोज नवे नवे श्रीगुरुचरित्र निर्माण होत असते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..