माझे हातचलाखीने चाललेले प्लांचेट चे प्रयोग कधी यशस्वी होत तर कधी अयशस्वी मात्र त्यामुळे माझा मान वाढला होता मित्रांमध्ये हे नक्की , आता तर मी फक्त गेलेल्या नातलागांचेच नाही तर इतर सुप्रसिद्ध आणि थोर व्यक्तींचे आत्मे देखील बोलावू लागलो होतो . त्याच काळात व्यक्तिगत पातळीवर मी अत्यंत अवस्थ असायचो , अनेक अनुत्तरीत प्रश्न नेहमीच मनात गोधळ घालत असत , प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेण्याचे कुतूहल , चंचल मन , काहीतरी वेगळे किवा साहसी कृत्य करण्याची उर्मी , आणि स्वतच्या इच्छेने जगण्याचा हट्टी स्वभाव या स्वभावातील विशेषता मुळे मनाविरुद्ध काही घडलेले सहन होत नसे , घरातील संस्कार , रुढी वगैरे तर केव्हाच झुगारून दिलेल्या . कुटुंबीय फक्त दिवसरात्र ‘अभ्यास.. आभ्यास ‘ असे टुमणे लावून होते साहजिकच घरात कमीत कमी वेळ थांबत असे फक्त जेवण आणि झोपणे इतकाच घरी सापडत असे ( थोडक्यात घर म्हणजे फुकटचे लॉजिंग व बोर्डिंग ) .
सिगारेट , दारू , गांजा , भांग अशी व्यसने देखील हळू हळू जीवनात स्थिरावत होती , एकंदरीत माझे हे असे बेताल वागणे पाहून आईने कोठून तरी एका प्रसिद्ध जोतिष्या बद्दल माहिती काढली आणि माझी पत्रिका त्याला नेऊन दाखवली , माझे वागणे कसे हाताबाहेर होत आहे याचे यथासांग वर्णन केले असावे तिने , कारण नंतर मला कळले की जोतिषी एकदम गंभीर झाला होता आणि त्याने निष्कर्ष काढला की याने प्लांचेट करून बोलावलेले आत्मे योग्य ठिकाणी परत गेलेले नाहीत व ते सतत याच्या भोवती असतात , याला अवस्थ करतात , तसेच याच्या राशीत ‘ शनी ‘ आला आहे तेव्हा तो शनी याच्यावर काही ना काही गंडांतर आणत राहणार नेहमीच , तेव्हा याने दर शनिवारी ‘ शनी ‘ ला उपास करावा , शनी महात्म्याचे वाचन करावे , शनीला तेल व रुईची माळ घालावी असे केले तर सगळे नीट होईल तसेच आत्म्याच्या शांतीसाठी त्र्यंबकेश्वर येथे जाऊन ‘ त्रिपिंडी , नारायण नागबली , व कालसर्पयोग ‘ अशी पूजा करावी . आई जोतीष्याकडून आल्यावर हे सगळे वडिलांना सांगताना मी गुपचूप ऐकले तसेच आई पुढे हे देखील म्हणाली जे घडते आहे त्यात तुषार चा फारसा दोष नाही तर शनी महाराज आणि हे आत्मे सगळा गोंधळ घालत आहेत ..
हे ऐकून मला हायसे वाटले , त्यानंतर मी काही चूक केली आणि घरी रागावू लागले की मी त्राग्याने म्हणू लागलो की यात माझा काही दोष नाहीय हे तुम्हाला माहित असून मला का रागावता ? म्हणजे ‘ मी ‘ अगदी गरीब , ‘ बिच्चारा ‘होतो व जे काही विपरीत घडते आहे त्यात माझा काही दोष नाही ही भावना अत्यंत सुखावणारी होती . मला वाटते प्रत्येकाला आपल्या चुकांचे खापर फोडण्यासाठी काहीतरी कारण लागतेच व मला ते कारण आयतेच मिळाले होते . ‘ त्रंबकेश्वर ‘ चा आईचा प्रस्ताव मी धुडकावून लावला कारण मलाही ही भीती वाटत होती की जर खरेच आत्मे शांत झाले तर मग मला नीट वागावे लागेल . ‘ शनी ‘ चे मात्र आईने जास्तच मनावर घेतले होते , तिने बाजारात जाऊन एक शनी महात्म्याची पोथी आणली व दर शनिवारी मला वाचण्यास सांगितले , तसेच ‘शनी ‘ मंदिरात जाऊन तेल , माळ वगैरे साग्रसंगीत विधी करावेत असा आग्रह केला आणि त्या बदल्यात मी तिच्या कडून अनेकदा पैसे उकळले….
बिचारी वडिलांपासून लपवून मला पैसे देत होती आणि मी तिच्या मायेचा , प्रेमाचा गैरफायदा घेत होतो . ‘ शनी ‘ महाराजांची पोथी वाचताना एक गोष्ट जाणवली हे महायश खूप उग्र , कोपिष्ट , ताकदवान आहेत , अगदी इंद्र , विक्रमादित्य , सूर्य , यानाही शनीने सोडलेले नाही असे त्या कथेत होते , शनी च्या कोपाला सर्व देवता घाबरत असत असे वर्णन त्या पोथीत होते , ते वाचून मला जरा रागच आला त्यांचा , उगाच कोणाच्या तरी राशीत जाऊन बसायचे आणि त्याला पिडायचे हे बरे नव्हे , पोथी वाचताना ‘ शनी ‘ महाराजांबद्दल आदर कमी आणि रागाची भावना जास्त असे . उपास केले पण अनेकदा ते मोडले देखील , तेल , माळ विधी दर शनिवारी करतच होतो असे नाही पण त्या नावाखाली आईकडून पैसे उकळत होतो .
(बाकी पुढील भागात)
— तुषार पांडुरंग नातू
(कुतुहल, मित्रांचा आग्रह किंवा तात्पुरती मॊजमस्ती उसना आनंद म्हणून आयुष्यात प्रवेश केलेले दारु व इतर मादक पदार्थांचे व्यसन कसे आयुष्य उध्वस्त करते याचा मागोवा या सदरात घेतलेला आहे..)
Leave a Reply