मला आतून पक्के माहित होते की अतृप्त आत्मे , शनी महाराज वगैरे मला त्रास देत नाहीयेत तर माझे विचार आणि वर्तन माझ्या अधःपतनास जवाबदार होते , मात्र हे मला उघडपणे मान्य करणे कठीण जात होते . माझा दिवसातील जास्तीत जास्त वेळ गांजा पिणे , वाचन आणि मित्रांबरोबर टिवल्याबावल्या करण्यात जात असे, त्याच काळात ‘ श्रीमद्भगवद्गीता ‘ जशी आहे तशी वाचनात आली , गीतेतील प्रत्येक श्लोकाचा सुलभ मराठी भाषेतील अर्थ त्यात दिलेला होता , कुरुक्षेत्रावर लढाईसाठी सज्ज असलेल्या अर्जुनाला समोर शत्रू सैन्यामध्ये आपले गुरु , पितामह , करोडो सैन्य दिसल्यावर आपल्या हातून यांचा उत्पात होणार या कल्पनेने अनेक प्रश्न पडले व त्याची द्विधा मनस्थिती झाली इतका प्रचंड संहार करून मी नेमके काय साध्य करणार आहे ? हा युद्धाचा अट्टाहास कितपत योग्य आहे ? त्यापेक्षा सरळ युद्धविराम का देऊ नये ? अनेक प्रश्नांनी व्याकुळ आणि विषादग्रस्त झालेल्या अर्जुनाचे आणि मग त्याच्या एकेक प्रश्नाचे निराकरण करून त्याला युद्धास प्रेरित करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने त्याला केलेल्या उपदेशाचे वर्णन वाचणे हा एक अतिशय दिव्य अनुभव होता .
खरेतर इतका सुंदर ग्रंथ नक्कीच जर अर्थ नीट समजून घेऊन वाचला असता तर मला खूप फायदा झाला असता पण त्या वयात प्रगल्भ बुद्धी नसल्याने मी सर्व ग्रंथाचा एकंदरीत अर्थ असा काढला की जीवन म्हणजे माया , मिथ्या आहे , सारे काही सोडून अटळ मृत्यू ला सामोरे जायचे आहे , धन , सत्ता , अधिकार , नातीगोती , सर्व काही व्यर्थ आहे . आणि जर हे सर्व काही मिथ्या आहे तर मग ते मिळवण्याचा प्रयत्न तरी का करावा ? असा सोपा निष्कर्ष मी काढला माझ्या त्यावेळच्या मनस्थितीला साजेशा असा हा निष्कर्ष होता …
त्यामुळे मी आभ्यास , करियर , सगळे व्यर्थ आहे असा समज करून घेतला व जे सर्व सोडून जायचे आहे ते मिळवायचेच कशाला ? गांजा ओढल्यावर तर हा विरक्तीचा भाव अधिकच गहिरा होत असे , जसे जसे सिगरेट , गांजा , सिनेमा अश्या गोष्टींमध्ये जास्त पैसा खर्च होऊ लागला तसेतसे घरात माझे वेगवेगळ्या खोट्या कारणांनी पैसे मागण्याचे प्रमाण वाढले , मध्यमवर्गीय घरात असे रोज पैसे मिळणे शक्यच नव्हते , मग मी पैसे मिळवण्याचा मार्ग शोधू लागलो , नाशिकरोड रल्वे स्टेशन म्हणजे जणू आमचे आंगणच होते . द्राक्षांच्या सिझन मध्ये तेथून हजारो पेट्या द्राक्षे , कलकत्ता , दिल्ली , व देशाच्या इतर भागात पाठवली जात असत द्राक्षे हा नाशवंत माल असल्याने प्रवासी रेल्वे गाडीला शेवटी किवा पुढे जे दोन गुड्स चे डबे असे त्यात जास्तीत जास्त पेट्या पाठविल्या जाव्यात म्हणून व्यापारी वर्गाची चढाओढ असे रात्रीच्या वेळी अश्या एकूण चार लांब पल्ल्याच्या मुंबईहून येणाऱ्या गाड्यात या द्राक्ष्याच्या पेट्या चढवण्यासाठी हे व्यापारी हमाल नेमत असत , या हमालाचे काम म्हणजे गाडीचा गुड्स पार्सलचा डबा ज्या ठिकाणी येतो तेथे द्रक्ष्यांच्या पेट्या वाहून नेणे आणि गाडी आली की पटापट त्या पेट्या पार्सल च्या डब्यात चढवणे , एका गाडीचे त्यावेळी एका हमालाला ५ रुपये मिळत , ,,,त्यावेळी १९८२ साली माझा व्यसनांचा खर्च रोज सुमारे १५ रुपये होता हा खर्च काढण्यासाठी मी स्टेशनवर हमाली करण्यास जाऊ लागलो .
दिवसा नशा आणि रात्री नशेसाठी पैसे मिळावेत म्हणून हमाली असे सुरु झाले . एक पेटी ४ किलो वजनाची असे अश्या सुमारे चार ते पाच पेट्या एकावेळी हातात घेऊन गर्दीत धावपळ करून त्या पार्सलच्या डब्यात टाकणे, मग पुन्हा तेच असे गाडी स्टेशनात असे पर्यंत म्हणजे सुमारे ५ ते ७ मिनिटे चाले , हे काम तसे जिकीरीचेच होते , आमचा आठ दहा व्यसनी मित्रांचा समूह हे हमाली चे काम रात्रीच्या वेळी करू लागला त्यासाठी मी रात्री ११ ते सकाळी ४ या वेळात मी रेल्वे स्टेशन वर राहू लागलो .एकंदरीत रात्रभरात तीन ते चार गाड्या वर हमाली करत होतो .ज्या ठिकाणी माझे वडील चांगल्या हुद्यावर नोकरी करत होते तेथेच मी रात्री हमाली करत असे , सुरुवातीला मी हे घरी कळणार नाही याची काळजी घेतली , पण लवकरच ते घरी समजले वडील मला रागावले पण माझे उत्तर होते की तुम्ही मग मला जास्त पैसे का देत नाही ? आणि मी कष्टच करतोय ना ? चोऱ्या तर करत नाही … काय बोलणार यावर ते बिचारे ?
सुहास शिरवळकर यांचे ‘ दुनियादारी ‘ एक पुस्तक देखील त्या काळात वाचले होते ज्यात कॉलेज मधील मित्रांच्या टोळक्याच्या गमतीजमती , व्यथा , प्रेमप्रकरणे , आणि शेवटी शिक्षण संपल्यावर एकमेकांपासून दूर जाणे असे सगळे वर्णन होते हे पुस्तक देखील वाचून माझा विरक्तीचा भाव वाढत गेला होता , अर्थात त्यात पुस्तकाचा दोष नाही तर माझा दृष्टीकोन दोषी होता …
( बाकी पुढील भागात )
— तुषार पांडुरंग नातू
(कुतुहल, मित्रांचा आग्रह किंवा तात्पुरती मॊजमस्ती उसना आनंद म्हणून आयुष्यात प्रवेश केलेले दारु व इतर मादक पदार्थांचे व्यसन कसे आयुष्य उध्वस्त करते याचा मागोवा या सदरात घेतलेला आहे..)
Leave a Reply