आमची गांजा ओढणारी टीम आता वाढत चालली होती , दारूचा पटकन तोंडाला वास येतो मात्र गांजाचे तसे होत नाही , फक्त पिताना गांजाच्या धुराचा वास दरवळतो आणि अनुभवी किवा जाणकार लोकांनाच गांजा , चरस वगैरे च्या धुराचा वास कळतो , एकदा गांजा ओढून झाला की तोंडाला दारू सारखा भपकारा येत नाही त्यामुळे आम्ही दारू चे सेवन क्वचित आणि गांजा मात्र नियमित ओढत असू , दारू चढल्यावर बहुतेक वेळा भांडणे , शिवीगाळ , फालतू बडबड असे प्रकार घडतात पण गांजा चे मात्र तसे नाही बहुधा गांजा ओढणारे शांत राहतात भांडणे वगैरे प्रकार त्यांना मानवत नाहीत .
उलट ते गांजाच्या तारेत अगदी विश्वकल्याणाचे देखील विचार करू शकतात व बारीक सारीक गोष्टींची गम्मत वाटून भरपूर हसतात देखील . आम्हाला गांजाच्या सेवनाने त्यावेळी जास्त मजा येत असे व ही मजा इतर मित्रांना देखील मिळावी या हेतूने आम्ही आमच्या मित्रांना देखील ‘ अरे खूप मजा येते , एकदा ओढून तर बघ ‘ असा आग्रह करून आमच्यात सामील करून घेत असू , त्यांना आमच्यासारखे बिघडवणे हा विचार अजिबात त्यामागे नव्हता तर त्यांना आमच्या सारखी मजा यावी हा प्रामाणिक हेतू असे , अर्थात आम्ही स्वतः देखील खड्ड्यात चाललो होतो आणि त्यानाही सोबत नेत होतो हे फार उशिरा समजले .
अश्या प्रकारे सिन्नर फाटा , विष्णू नगर , आणि नाशिकरोड च्या बिटको कॉलेज मधील काही मुले असा आमचा चांगला १५ ते २० जणांचा ग्रुप तयार झालेला होता . नाशिक रोडला ‘ मुक्तिधाम ‘ समोर एक छोटे ‘ दुर्गा गार्डन ‘ आहे . दुर्गा देवीचे मंदिर आहे तेथे आणि मग बागेत मस्त हिरवळ आहे , तसेच ‘वसंत व्याख्यान माले साठी ‘ तेथे एक छान छोटेसे म्हणजे १५ बाय २० चे स्टेज बनवलेले आहे , या बागेत सहसा फारशी गर्दी नसे दोनचार रिकामटेकडे , आणि आमच्यासारखे व्यसनी यांची मात्र बरीच वर्दळ होती आम्ही दुपारी आणि सायंकाळी तेथे स्टेज वर बसून मस्त गांजा ओढत असू . एकदा का चिलीमीचे दोन तीन दम मारून झाले की मग वेगवेगळ्या विषयांवर मोठी मोठी चर्चा होत असे ज्यात देशभक्ती ,जातीयवाद, धर्मवाद पासून ते राजकारण , इतिहास , समाजकारण , सिनेमा असे सगळे विषय असत व अगदी मोठ्या तत्ववेत्त्याच्या आविर्भावात आम्ही चर्चेतून काही निष्कर्ष देखील काढीत असू त्याचे आम्हाला खूप छान वाटे ,
एकीकडे आपण सगळे गांजा ओढून काहीतरी चूक करत आहोत ही भावना सगळ्यांच्या मनात होतीच पण अश्या मोठ्या चर्चा करून उलट आम्ही किती चांगला विचार करतो असे वाटून त्यातच आम्ही धन्यता मानत असू . त्यावेळी खलिस्तान , इराण- इराक युद्ध ,भ्रष्टाचार , अश्या त्यावेळच्या सगळ्या गंभीर समस्यांवर आम्ही चर्चेतून उपाय शोधले आहेत . अर्थात ते उपाय त्या चर्चेनंतर सगळे जण विसरून जात होतो .
एकाने कल्पना काढली की आपण सर्वानी काहीतरी सामाजिक कार्य देखील केले पाहिजे आणि ठरले ‘ शीतल ‘ ग्रुप या नावाने आम्ही एक समूह सुरु केला रजिस्ट्रेशन वगैरे केले नाही पण समूह सुरु झाला ‘ शीतल ‘ म्हणजे थंड , विसावा देणारे , शांत असा या समूहाचा अर्थ होता तसेच नाशिकरोड ला गांजा ओढून झाल्यावर एका होटेल मध्ये आम्ही चहा पाणी घेत होतो त्या हॉटेलचे नाव देखील ‘ शितल ‘ होते म्हणून हे नाव ठरले .शीतल ग्रुप तर्फे आमची पहिली मोहीम ठरली ती ‘ स्वच्छता मोहीम ‘ शहरातील लोकांना स्वच्छतेचे महत्व कळावे शहरातील रस्ते स्वच्छ ठेवावेत असे लोकांना वाटले पाहिजे व त्यासाठी एकदा आपण शीतल ग्रुप च्या सदस्यांनी रस्ते झाडून काढावेत अशी योजना तयार झाली , ८ दिवसांवरच गांधी जयंती होती व आमच्या स्वच्छता मोहिमेची सुरवात करायला हा अतिशय योग्य दिवस होता . आम्ही योजना तयार केली आणि ठरले २ ऑक्टो ला पहाटे ५ वा . सर्वानी सोबत एक खराटा किवा झाडू घेऊन देवळाली गाव च्या सुरवातीला असलेल्या म. गांधी यांच्या पुतळ्या जवळ जमायचे आणि तेथून पुतळ्याला हार घालून झाडू मारण्यास सुरवात करायची ते रेल्वे स्टेशन जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि तेथून पुढे बिटको चौकाच्या अलीकडे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पर्यंत चा रस्ता झाडून स्वच्छ करायचा .
आम्ही उत्साहाने कामाला लागलो योजना पक्की झाली त्यावेळी दोनच स्थानिक वर्तमान पत्रे होती ‘ गावकरी ‘ आणि ‘ देशदूत ‘ त्यात बातमी तयार करून पाठवली . आदल्या दिवशी रात्रीच आम्ही , सकाळी कामाला जास्त उर्जा मिळावी म्हणून गांजा घेऊन ठेवला होता (त्याकाळी नाशिक मध्ये ( १९ ८२ ) जरा बरी थंडी असे ऑक्टोबर मध्ये देखील )
पहाटे ४ वाजता आधी आम्ही काहीजण जमलो आधी चिलीम ओढून झाली आणि मग तेथून सगळे गांधी पुतळ्याकडे कुच केले .सगळ्यांच्या हातात झाडू अथवा खराटे होते आणि डोक्यात गांजाची नशा !
( बाकी पुढील भागात )
— तुषार पांडुरंग नातू
(कुतुहल, मित्रांचा आग्रह किंवा तात्पुरती मॊजमस्ती उसना आनंद म्हणून आयुष्यात प्रवेश केलेले दारु व इतर मादक पदार्थांचे व्यसन कसे आयुष्य उध्वस्त करते याचा मागोवा या सदरात घेतलेला आहे..)
Leave a Reply