(कुतुहल, मित्रांचा आग्रह किंवा तात्पुरती मॊजमस्ती उसना आनंद म्हणून आयुष्यात प्रवेश केलेले दारु व इतर मादक पदार्थांचे व्यसन कसे आयुष्य उध्वस्त करते याचा मागोवा या सदरात घेतलेला आहे..)
पहाटे पहाटे गांजाचे दम लावून आमची गँग सफाई मोहिमेवर निघाली काही जणांच्या हातात झाडू होते , तर काहींनी खराटे आणले होते मात्र दोन जणांनी काहीच आणले नव्हते त्यांना विचारले तर म्हणाले घरचे झाडू , खराटे सकाळी घरी लागतात म्हणून नाही आणले , मात्र हे दोघेही एकदम झकपक कपडे घालून आले होते त्यापैकी एकाने नवा ‘सफारी ‘ आकाशी रंगाचा तर दुसऱ्याने झब्बा आणि पायजामा घातला होता क्रीम कलरचा , मला त्यांचे ते कपडे पाहून जरा नवल वाटले हे असे कपडे घालून हे कसले झाडू मारणार ? आणि झालेही तसेच आम्ही गांधी पुतळ्यापासून झाडू मारण्यास सुरवात केली आणि हे दोघे ‘ इथे झाडा , या बाजूने जास्त कचरा आहे ‘ वगैरे सांगत मार्ग दर्शन करू लागले , शेवटी मी वैतागून सफारी वाल्याच्या हातात माझा झाडू दिला तर त्याने तो फक्त २ मिनिटे हातात धरला व परत दिला . हे दोघे नेतागिरी करणाऱ्यांपैकी होते हे लक्ष्यात आले माझ्या . एव्हाना सकाळचे ६ वाजून गेले होते आणि सकाळी फिरायला जाणारे , तसेच रस्त्याने जाणारे येणारे लोक आम्हाला पाहून थबकत होते , आमचे दोघे नेता मित्र अगदी अदबीने लोकांना नमस्कार करून आमच्या कार्याची माहिती देत होते .
सुमारे ८ वाजेपर्यंत आम्ही रस्ता झाडत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोचलो , पुतळ्याच्या कुंपणाच्या आतील आणि बाहेरील परिसर स्वच्छ केला आणि आमचे काम थांबले , सर्व चांगलेच घामाघून झाले होते . तेथून लगेच सगळी मंडळी पुन्हा श्रमपरिहार म्हणून मग गांजाच्या अड्ड्यावर निघाली .सफारी आणि झब्बा वाले त्या दिवशी जरा जास्तच खुश होते हे जाणवले एकंदरीत त्या वेळी मला राजकारण वगैरे फारसे समजत नव्हते पण राजकारण म्हणजे नक्की काय ते या दोघांमुळे थोडेफार समजले . तेव्हापासून सफारी आणि झब्बा पायजमा घातलेले लोक दिसले की मला उगाचच ते देखील मुरलेले राजकारणी असावेत असे वाटत राहते .
आमच्या या मोहिमेची चांगलीच चर्चा झाली व त्यावेळी आम्हाला वाटेत भेटलेल्या कदम सरांनी ( सरस्वती क्लासेस चे संचालक ) मदत देखील करण्याचे आश्वासन दिले . त्यावेळी नाशिक रोड ला दहावी ची शिकवली ( क्लास ) घेण्यात सरस्वती क्लासेस चे मोठे नाव होते तर नाशिक ला ‘गायकवाड ‘ क्लासेस प्रसिद्ध होते . कदम सरांनी मदत करण्याचे आश्वासन दिल्यावर आम्ही लगेच दुसरी योजना आखली आम्ही बहुतेक जण ज्या ‘बिटको ‘ कॉलेज मध्ये होतो तेथे निबंध स्पर्धा घेण्याचे ठरले . गांजा पिऊन खूप चर्चा करून शेवटी निबंधासाठी दोन विषय निवडले १ ) आजच्या तरुणांचे कर्तव्य २) सामाजिक बांधिलकी…कॉलेज च्या नोटीस बोर्डवर तशी नोटीस लावली. प्रथम . द्वितीय आणि तृतीय क्रमांकांना बक्षिसे देण्याची जवाबदारी कदम सरांनी स्वीकारली त्यांनी त्यासाठी त्या काळी ५०० रुपये दिले .
स्पर्धेत एकूण २० निबंध आले त्यापैकी राम कुलकर्णी या आमच्या पेक्षा २ वर्ष सिनियर असलेल्या तरुणाला पहिले बक्षीस मिळाले. ( श्री . राम कुलकर्णी हे पुढे बिटको कॉलेज चे प्राचार्य झाल्याचे समजले ) त्या वेळचे प्राचार्य श्री . पंडित सर् यांच्या हस्ते बक्षीस समारंभ पार पडला आणि पुन्हा आमची टीम निघाली गांजा प्यायला
त्या दिवशी रविवार होता आणि सगळा कार्यक्रम आटोपून आम्हाला दुर्गा बागेत गांजा ओढायला जाईपर्यंत सुमारे १२ वाजले होते ( अर्थात सकाळी एक चिलीमिचा एक राउंड झाला होता ) आम्ही सगळे कार्यक्रम छान झाल्याच्या आनंदात मग्न होऊन चिलीम ओढत बसलो होतो , आमच्या समोर निबंधाची फाईल , बक्षिसांची नावे वगैरे कागदपत्रे पडली होती . तितक्यात अचानक तेथे रविवार म्हणून राउंड आलेल्या पोलिसांनी आम्हाला चारही बाजूनी घेरले . पळायला काही वावच नव्हता त्यावेळी आसाराम शिंदे नावाचे एक अतिशय कडक पोलीस अधिकारी होते नाशिक रोड पोलीस स्टेशनला त्या वेळी ते देखील होते तेथे .
आम्हाला सर्वाना रांगेत उभे करून आमची झडती घेतली गेली सोबत असलेल्या गांजाच्या पुड्या जप्त केल्या सगळ्यांचे कॉलेजचे ओळखपत्र पहिले त्यांनी मग सगळी कागदपत्रे पहिली आणि आसाराम शिंदे साहेब आम्हाला म्हणाले ‘ साल्यांनो , आजच्या तरुणाचे कर्तव्य ? हा विषय देता काय स्पर्धेला आणि तुम्ही बसले गांजा ओढत . हेच कर्तव्य आहे का तुमचे ?, चला तुम्हाला सगळ्यांना तुमच्या आईबापा समोर उभे करतो ” हे एकूण आमची तंतरली ‘ साहेब जाऊ द्या . आम्हाला माफ करा असे म्हणत आम्ही गयावया करू लागलो शेवटी प्रत्येकी एक एक दंडा पायावर मारून त्यांनी आम्हाला सोडले . या प्रसंगातून आम्ही एक शिकलो या पुढे गांजा ओढताना जास्त सावधगिरी बाळगली पाहिजे ( तेव्हा जर या पुढे गांजा ओढायचा नाही असा धडा घेतला असता तर अधिक चांगले झाले असते )
( बाकी पुढील भागात )
— तुषार पांडुरंग नातू
Leave a Reply