(कुतुहल, मित्रांचा आग्रह किंवा तात्पुरती मॊजमस्ती उसना आनंद म्हणून आयुष्यात प्रवेश केलेले दारु व इतर मादक पदार्थांचे व्यसन कसे आयुष्य उध्वस्त करते याचा मागोवा या सदरात घेतलेला आहे..)
रेल्वे स्टेशनवर द्राक्ष पेट्यांची हमाली करण्याचे काम आता नियमित झाले होते वर्षातून साधारण ५ महिने हे काम असते , रात्रभर रेल्वे स्टेशन वर भटकणे , गाडीची वेळ आली की द्रक्ष्यांचा पेट्या पार्सल विभागातून काढून त्या पेट्या रेल्वे स्टेशन वर असलेल्या सामान वाहून नेण्याच्या चार चाकी लोखंडी गाड्यावर लादणे आणि मग गाडीचा पार्सल चा डबा ज्या ठिकाणी येतो तेथे त्या पेट्या नेऊन ठेवणे व गाडी आली की ५ मिनिटात धावपळ करून त्या पेट्या पार्सल च्या डब्यात चढवणे असे काम असे , गांजा च्या तारेत आम्ही हे काम सहज पणे करीत असू . स्टेशन वरील गर्दीत ती पेट्या लादलेली गाडी ओढण्यास सुरवातीला लाज वाटली पण मग कोणी आपल्याकडे पहाते आहे की काय ? कोणां ओळखीच्या लोकांना कळले तर वगैरे भीती नष्ट झाली .
एका वेळी साधारणतः २०० पेट्या गाडीवर लादून गाडा ओढणे मजेचे काम होते . चार किलो द्राक्ष असलेली ती लाकडी पेटी छोट्या ठोकून बनवलेली असे ( सध्या पुठ्यांनी बनलेल्या पेट्या आल्यात )गाडी आली की एका वेळी सुमारे चार ते पाच पेट्या हातात घेऊन पळापळ करावी लागे , यात अनेकदा हातावर त्या ओरखडे उठत , कधी ठेच लागे , पण गाडी गेल्यानंतर मिळणाऱ्या पैश्यांकडे सारे लक्ष असे , गाडी जेमतेम ५ मिनिटे स्टेशन वर थांबल्यावर पेट्या चढवताना धावपळीत एखादी पेटी हातून निसटून प्लँटफॉर्म आणि गाडीच्या मधल्या मोकळ्या जागेतून खाली ट्रँक वर पडत असे रोज एकंदरीत सर्व हमाली करणाऱ्यांच्या हातून अश्या सुमारे दोन तीन तरी पेट्या खाली पडत असत मग गाडी गेली की त्या पेट्या वर काढून जर फुटल्या नसतील तर पुन्हा पुढच्या गाडीत चढवल्या जात असत ,
मात्र कधी कधी खाली पडलेली पेटी जर रेल्वे रुळावर पडली तर गाडीचे चाक त्यावरून जाई व पेटी फुटे , मग ती द्राक्षे व्यापारी आम्हाला देऊन टाकत असे ..अश्या या खाली पडलेल्या द्राक्ष पेट्याच्या बाबतीत आमच्यातील एकाने आयडिया काढली , गाडी थांबलेली असतानाच जर पलीकडच्या बाजूने कोणीतरी गाडीखाली जाऊन त्या पेट्या पळवल्या तर ? कल्पना चांगली होती आम्ही उचलून धरली. हे कलकत्ता , बिहार , उत्तरप्रदेश येथून द्राक्ष व्यापाराकरिता येणारे व्यापारी म्हणजे आमचे मालक , कधी कधी हे मालक लोक गाडीत समाधानकारक माल चढवला नाही तर रागवत असत , शिव्या देत , तर कधी पैसे कमी देत , कधी कधी आज पैसे नाहीत उद्या देतो म्हणून आम्हाला वाटेला लावत , तसेच जेव्हा ते आमच्या समोर हजारो रुपये मोजत तेव्हा तर त्यांची आम्हाला असूया देखील वाटे एकंदरीत त्यांच्या बद्दल सुप्त राग मनात होताच शिवाय चोरलेल्या पेट्या विकून आम्हाला वेगळे पैसे मिळू शकत होते .
मग आम्ही तो प्रकार सुरु केला पलीकडच्या बाजूला आम्ही आमचा एक साथीदार उभा करत असू आणि गाडी आली की धावपळ करताना खाली पडलेली पेटी तो साथीदार गाडीखाली शिरून काढून घेई , रोज अश्या दोन तीन तरी पेट्या मिळत , अर्थात हे काम खूप रिस्की होते कारण गाडीखाली शिरताना गाडी सुरु होण्याची भीती असे तसे झाले तर मुडदा पडणार..तसेच पलीकडील बाजूच्या प्लँटफॉर्म वरील लोकांना हा प्रकार दिसत असे , त्यांच्या पैकी कोणी बोंब केली तर डाव अंगाशी येणार हे पक्के , पण बहुधा पाहणारे लोक काही बोलत नसत कारण त्यांना हा गाडीखाली शिरणारा मुलगा नेमके काय करणार याची कल्पना नसे व जेव्हा त्यांना द्रक्ष्याची पेटी घेऊन गाडीखालुन बाहेर पडणारा मुलगा दिसे तेव्हा नेमके काय घडले हे समजेपर्यंत तो मुलगा पसार होत असे . रोज मुलगा बदलला जाई , पुढे पुढे तर आम्ही मुद्दाम चूक झाली असे दाखवून पेट्या खाली पाडत असू , तेव्हढीच जास्त कमाई होई ,माझ्यावरही तीन चार वेळागाडी खाली शिरण्याची पाळी आली होती .
एकदा दुसऱ्या दिवशी महाशिवरात्र होती , भगवान शंकर म्हणजे आम्हा गांजा ओढणाऱ्या लोकांचे दैवत होते , चिलीमिचा दम मारताना देखील ‘ भोले ….” किवा ‘ बम भोले ..” असा मोठ्याने पुकारा करत दम मारला जाई . आम्ही सर्वानी महाशिवरात्रीला भांगेचे दुध ( घोटा , थंडाई ) बनवण्याचे ठरवले त्यात द्राक्ष टाकली तर जास्त नशा येईल असा आमचा समज होता कारण द्राक्ष्यांपासून दारू बनते म्हणजे द्रक्ष्यांच्या रसामुळे आपली थंडाई जास्त परिणाम कारक बनेल हे उघड होते , त्या दिवशी आम्ही एकूण १५ पेट्या खाली पाडल्या म्हणजे आमच्या कडे ६० किलो द्राक्षे जमली , मग पहाटे एका मित्राच्या रुमवर जाऊन त्या सगळ्या पेट्या उघडल्या आणि तो साठ किलो द्राक्षांचा ढीग समोर ठेऊन गांजा ओढत आणि द्राक्षे खात बसलो मग सकाळी सर्वानी वर्गणी काढून १२ लिटर दुध , ५० भांगेच्या गोळ्या ( नाशिक मध्ये भांगेच्या होळीला बंटा म्हणतात ) साखर आणि सुमारे १० किलो द्राक्ष्यांचा रस त्यात टाकून थंडाई बनवली .
( बाकी पुढील भागात क्रमश .. )
— तुषार पांडुरंग नातू
Leave a Reply