(कुतुहल, मित्रांचा आग्रह किंवा तात्पुरती मॊजमस्ती उसना आनंद म्हणून आयुष्यात प्रवेश केलेले दारु व इतर मादक पदार्थांचे व्यसन कसे आयुष्य उध्वस्त करते याचा मागोवा या सदरात घेतलेला आहे..)
एका मोठ्या पातेल्यात आम्ही बनवलेली थंडाई ठेवली होती , मग कोणीतरी सांगितले त्यात जर तांब्याचे नाणे टाकले तर अधिक जास्त नशा येते , लगेच तांब्याचे नाणे कुठे मिळेल याचा शोध सुरु झाला , एकाने त्याच्या आजीच्या जवळ असे तांब्याचे नाणे ठेवले होते ते आणले ( मला वाटते या नाण्यालाच खडकू असे म्हणतात ) एकदाची थंडाई तयार झाली आणि मग एकमेकाला आग्रह करून प्यायला लावणे पण सुरु झाले .सर्वांचे एकदोन ग्लास झाल्यावर मग पुन्हा गांजाची चिलीम झाली . अजूनही पातेले अर्धे भरलेलेच होते मग आमचे जे मित्र कोणतीही नशा करत नव्हते त्यांना आग्रह करणे सुरु झाले आमचा हा उद्योग तेथील एकदोन सराईत दारुड्यांना कळला तर ते देखील फुकट नशा मिळतेय म्हंटल्यावर आमच्यात सामील झाले .
पाहता पाहता सकाळचे १२ वाजले . मग टूम निघाली की आता शंकराच्या मंदिरात दर्शनाला जायचे , सिन्नर फाट्यापासून जवळच चेहडी नाका होता आणि त्याच्या थोडे पुढे शेतातून गेले की मग दारणा आणि वालदेवी या दोन नद्यांचा संगम होतो त्या संगमावर एक छोटेसे शंकराचे मंदिर होते , तसेच तेथेच मंदिराच्या मागे एका बाबांचा मठ होता , आम्ही कधी कधी त्या मठात बाबांसोबत गांजा प्यायला जात असू .
मला त्या वेळी त्या बाबांचे जीवन खूप आवडायचे , म्हणजे काय की त्या मठात ते एका सतरंजीवर नेहमी बसून असत , गांजा पिवून डोळे नेहमी तारवटलेले , दिवसातून बाबांचे १५ ते २० भक्त तरी वेगवेगळ्या वेळी येत असत आणि येताना सोबत बाबांसाठी गांजा आणि खायला काहीतरी आणत , आले की आधी ते भक्त बाबांच्या पाया पाडत , बाबा ‘ भोले ‘ असे म्हणून त्यांना आशार्वाद देत , आणि मग गांजा साफ करून चिलीम बनली की ती सन्मानाने म्हणजे आपण जसे प्रसाद घेताना एका हाताला दुसरा हात लावतो आणि पुढे करतो तशी चिलीम आधी बाबांच्या कडे दिली जायची ,
एकजण तितक्याच सन्मानाने गुंडी जाळून ( गुंडी म्हणजे बोटभर काथ्याच्या दोरीची छोटीशी गुंडाळी करून ती पेटवून बनलेली धगधगती गुंडाळी ) ती गुंडी त्या चिलिमित भरली जायची आणि मग बाबा एकदा आकाश्या कसे बघून काहीतरी पुटपुटत असत व मग भोले sssssss, महादेव असा जोरात पुकारा करून दम मारत असत . एकंदरीत कसली चिंता नाही वर लोक पाया पडायला येणार , सोबत गांजा , चहाचे समान , खायच्या वस्तू , बाबांच्या गरजेचे इतर सामान देखील आणणार आणि वर जाताना बाबांच्या पुढे पाच – दहा रुपयांची नीट देखील ठेवणार . मजाच होती बाबांची , त्या काळी बाबांचा मला खूप हेवा वाटे .
भर उन्हात आमची गुंगलेली टोळी संगमाकडे निघाली होती , वाटेत एकमेकांची थट्टा , मस्करी देखील सुरु होती, आमच्या सोबत आयुष्यात पहिल्यांदाच आमच्या आग्रहाने थंडाई प्यायलेले दोन जण देखील होते , गांजा , भांग असे मादक पदार्थ सेवन केले की माणूस खूप हसतो , म्हणजे त्याला छोट्या छोट्या गोष्टींची गम्मत वाटते आणि एकदा तो हसू लागला की सतत वेगवेगळ्या गोष्टींवरून हसत राहतो , तसे असे हसत खेळत आम्ही एकदाचे १ वा संगमावर पोचलो . तेथे त्या दिवशी महाशिवरात्र असल्याने आसपासच्या भक्तांची जरा गर्दीच होती एरवी कधी स्त्रिया तेथे येत नसत पण त्या दिवशी लहान मुले , स्त्रिया आणि बाप्ये यांची जरा जास्तच गर्दी होती , ती गर्दी पाहून आमचे हसणे एकदम बंद झाले , सगळे जण एकदम गुपचूप चालू लागले आता मंदारीत जाऊन दर्शन घेईपर्यंत जरा गंभीर राहणे भाग होते , भामट्यासारखे आम्ही एक एक करून मंदारीत जाऊन दर्शन घेतले , आणि लगेच मंदिरा मागील शेतात जेथे आम्हाला कोणी पाहणार नाही अश्या ठिकाणी एका आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसलो .
तेथे एकांतात गेल्यावर पुन्हा हसणे , गप्पा आणि चिलीम सुरु झाली . एव्हाना आमच्या सोबत आलेली ती दोन नवखी मुले पूर्ण गुंगली होती , बाकीचे आम्ही सराईत मात्र मस्त मजा करत होतो तितक्यात एक म्हणाला चला आपण गाण्याच्या भेंड्या खेळू , आणि मग दोन गट करून भेंड्या सुरु झाल्या पाहता पाहता अर्धा १ तास उलटून गेला . त्या दोन नवीन मुलांपैकी एकाने मला जरा मळमळ होतेय अशीताक्रार केली पण आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले होते . समोरच्या पार्टीवर आता ‘ त ‘ हे अक्षर आले होते आणि त्यांना काही केल्या ‘त ‘ वरून गाणे आठवत नव्हते आम्ही भेंडी चढवण्यासाठी अंक मोजण्यास सुरवात केली होती १ ते १० मोजून होई पर्यंत जर गाणे आठवले नाही तर भेंडी होणार होती मी अंक मोजत होतो ७ पर्यंत मोजून झाले आणि तितक्यात त्यांच्या गटातील त्या मळमळ होते आहे अशी तक्रार करणाऱ्या मुलाने भडभडून जोरात उलटी केली , तो इतक्या जोरात आणि फोर्से ने ओकला की आमच्या अंगावर देखील काही शिंतोडे उडाले . व त्याच वेळी नेमके त्या पार्टीतील विवेक वाघमारे नावाच्या एका गमत्या मुलाला ‘ त ‘ चे गाणे आठवले ” तोहफ …तोहफा …तोहफा ..लाया लाया लाया ..मेरे मेरे मेरे दिलपे छाया छाया छाया ” !
तो उलटीचा गंभीर प्रसंग होता , मात्र त्याचे असे ओकणे पाहून विवेकला गाणे आठवणे आणि त्या गाण्याचा अर्थ हा सगळा इतका मजेशीर योगायोग होता की सगळे त्या मुलावर चिडण्याऐवजी एकदम हसू लागले .
( बाकी पुढील भागात क्रमश .. )
— तुषार पांडुरंग नातू
Leave a Reply