(कुतुहल, मित्रांचा आग्रह किंवा तात्पुरती मॊजमस्ती उसना आनंद म्हणून आयुष्यात प्रवेश केलेले दारु व इतर मादक पदार्थांचे व्यसन कसे आयुष्य उध्वस्त करते याचा मागोवा या सदरात घेतलेला आहे..)
एकीकडे आम्ही गांजा आणि चरस ओढत होतो तरी नेहमी नशा करताना आमच्या चर्चा मात्र देशहिताच्या व्हायच्या व भ्रष्टाचार , काळाबाजार , जातीयवाद असे विषय आमच्या चर्चेत असत . आमच्या या ‘ गंजडी ‘ समूहात सर्व जातीधर्माची मुले होती आणि आमचा वयाने मोठा असणारा मित्र विलास हा जेव्हा जेव्हा आम्हाला भेटत असे तेव्हा तो नेहमी आम्हाला चार चांगल्या गोष्टी सांगत असे विलास चे लग्न झाले होते व तो ‘ आर्टिलरी सेंटर ‘ मध्ये लिपिक पदावर नोकरी ला होता मात्र त्याचा मुळचा पिंड नोकरीचा नव्हताच , तो नेहमी देशात क्रांती झाली पाहिजे , सगळे भ्रष्टाचारी , लबाड राजकारणी संपले पाहिजेत असे बोलायचा त्याच्या मते आमचा समूह खूप चांगल्या मुलांचा होता पण फक्त ही मुले दारु ..गांजा पिऊन वाया जात आहेत असे त्याला वाटे . आम्ही स्थापन केलेल्या ‘ शीतल ग्रुप ‘ या सामाजिक कार्य करण्यासाठी असणाऱ्या समूहाचे देखील त्याला खूप कौतुक होते . एकदा अशीच चर्चा सुरु असताना आपण एखादी गुप्त संघटना सुरु केली पाहिजे व अतिशय जहाल अशी ही संघटना असली पाहिजे आपण गुप्त पणे काम करून भ्रष्टाचारी , दोन नंबर चे काम करणारे लोक , मटक्याचा अड्डा चालवणारे , लबाड राजकारणी या प्रकारच्या लोकांना धाकात ठेऊन त्यांना वठणी वर आणले पाहिजे किवा संधी मिळाली तर यांचा खातमा केला पाहिजे असा विचार चर्चेत पुढे आला , प्रत्येकालाच काहीतरी करून दाखवायचे होते , सगळ्या जगाला हादरा बसेल असे काहीतरी . झाले ठरले लगेच विलास देखील होताच चर्चेत..तो आमचा या गुप्त संघटनेचा ‘ बॉस ‘ असणार होता . मग संघटनेचे नाव काय ठेवायचे या वरून जरा चर्चा झाली आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या धर्तीवर काम करणारी आमची संघटना असणार होती म्हणून तिचे नाव ‘ आझाद सेना ‘ असे ठरले .
‘ आजाद सेना ‘ हे आमच्यासाठी एक स्फुरण होते , आमची सगळ्यांनी त्याच दिवशी दुर्गा बागेत आम्ही जेथे गांजा पीत होतो तेथेच एकमेकांच्या हातात हात देऊन गुप्ततेची शपथ घेतली . ( आता ही माहिती तुम्हाला सांगून मी गुप्ततेची शपथ मोडत आहे ) , गुप्त क्रांतिकारी संघटना म्हंटली म्हणजे आपल्याकडे शस्त्रे हवीत असे प्रत्येकालाच वाटले पण त्या वेळी म्हणजे सुमारे १९८३-८४ मध्ये पिस्तुल मिळवणे आजच्या इतके सोपे नव्हते , विलासचे मुंबईला काही मित्र होते तो त्यांच्या कडून एखादे पिस्तुल मिळवू शकेल असे त्याने सांगितले , इतर शस्त्रे म्हणून मग आम्ही गुप्ती , तलवार , त्यावेळी ब्रुसली ने प्रसिद्ध केलेला नॉन चाकू , हाताच्या चार बोटात अडकवून समोरच्याला माराचायची पितळी फाईट , एक बटन चाकू अश्या प्रकारची शस्त्रे गोळा करण्यास सुरवात केली होती आम्ही सगळे ‘ आझाद सेनेच्या ‘ कल्पनेने भारलो गेलो होतो .
मी एका जाड साखळीला एका टोकाला एक सुमारे १ इंच व्यासाचा लोखंडी गोळा वेल्ड करून घेतला होता आणि नॉनचाकू सारखा तो फिरवायला देखील शिकलो होतो . हा गोळा मी पँट च्या बाहेर ठेवून बाकीची चेन आत सोडून देत असे . व जसा ब्रुसली लढण्याच्या वेळी अचानक त्याचा शर्टात लपवलेला नॉनचाकू जसा बाहेर काढतो तसे मी तो गोळा अचानक बाहेर काढण्याचा देखील सराव गुपचूप करत असे . त्या वेळी ‘ लावारीस ‘ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झालेला होता त्यात अमिताभ बच्चन ते चामड्याचे गुढघ्या पर्यंत घातलेले बुट आम्हाला खूप आवडले होते , शस्त्रे लपवण्यासाठी हे बुट छान होते , मात्र हे बुट खूप महाग होते सुमारे १००० हजार रुपयांना मिळत त्यावेळी, पण आपल्या कडे हे बुट असावेतच असे आम्हाला वाटे , मग आम्हाला एका बुट चोरणाऱ्या टोळीचा शोध लागला. नाशिकरोड ला ‘ मुक्तिधाम ‘ येथे खूप श्रीमंत लोक दर्शनाला येत असत , तेथे पूर्वी जरी चपला बुट ठेवण्यासाठी स्टँड होता तरीही काही लोक ‘ मुक्तीधामच्या पायरीवर चपला बुट ठेवत असत तेथून संधी साधून हे लोक चांगल्या नव्या चपला व बुट चोरत असत तर या टोळीकडून आम्ही मिळतील ते अगदी स्वस्तात म्हणजे १०० ते १५० रु. पर्यंत चोरीचे लावारीस छाप बुट देखील मिळवले होते . फक्त ‘ आझाद सेनेच्या ‘ कारवाई च्या वेळीच ते बुट घालयचे असे ठरले होते .
विलास ने आर्टिलरी सेंटर मधून कशा कोणजाणे चार पाच सल्फ्युरिक अँसिड असलेल्या सुमारे ८ इंच लांबीच्या काचेच्या बंद ट्युब्ज मिळवल्या होत्या , वेळप्रसंगी त्या ट्युब्ज समोरच्या शत्रू च्या तोंडावर फोडता येणार होत्या .अशी सगळी जय्यत तयारी सृरू होती आमची , तसेच आम्ही भले गांजा पिऊन का होईना दुपारी चार वाजता सिन्नर फाटा येथील पालिकेच्या व्यायाम शाळेत देखील जात असू तेथे सूर्य नमस्कार , डंबेल्स , मुदगल .. उंच उड्या मारणे , हवेत पळत येऊन उलटी उडी मारणे असे प्रकार शिकत होतो , गांजाच्या तारेत मजा यायची व्यायाम करायला .एकंदरीत ‘ आझाद सेनेचे ‘ सैनिक चांगले तयार होत होते .
( बाकी पुढील भागात ..)
— तुषार पांडुरंग नातू
Leave a Reply