(कुतुहल, मित्रांचा आग्रह किंवा तात्पुरती मॊजमस्ती उसना आनंद म्हणून आयुष्यात प्रवेश केलेले दारु व इतर मादक पदार्थांचे व्यसन कसे आयुष्य उध्वस्त करते याचा मागोवा या सदरात घेतलेला आहे..)
आझाद सेनेची पहिली मिशन कशी असली पाहिजे या वर आमच्या रोज चर्चा होत असत , शहरातील काही लबाड राजकारणी , दोन नंबरचे काम करणाऱ्या लोकांची यादी तयार करून त्यांना धमकीची पत्रे पाठवावीत असा एक मुद्दा समोर आला , म्हणजे अश्या लोकांना तुमचे सगळे धंदे आम्हाला माहित आहेत आणि आपण हे सगळे सोडून जर नीट वागले नाहीत तर होणारे परिणाम भोगायला तयार राहा असे पत्र या लोकांच्या पत्यावर पोस्ट करायचे . पण जर त्यांनी पत्राकडे दुर्लक्ष केले तर नक्की काय करायचे त्या बाबतीत या बाबत एकमत होईना कोणी म्हणे डायरेक्ट खातमा करायचा , तर कोणी म्हणे की आपण त्यांनी पत्राला दाद दिली नाही तर अश्या लोकांचे पुरावे गोळा करून पोलिसात तक्रार द्यायची ..वगैरे . एकमत होण्याबाबत जरा अडचणच होई ..
एक मात्र खरे की आपण काहीतरी भव्य करणार या कल्पनेनेचे आम्हाला खूप समाधान मिळत असे , विलास ( आमचा बॉस ) आम्हाला रोज भेटत नसे मात्र आम्ही नेहमी जमून चर्चा करून विलास भेटला की त्याला योजना सांगत असू, या सर्व काळातच एकदा गोसावी वाडी या विभागातील आमच्या नेहमीच्या गांजा विकत घेण्याच्या अड्ड्यावर एकदा त्या अड्डेवाल्या माणसाने एक नवीन नशा आलीय गर्द नावाची आणि त्याने खूप मस्त नशा येते असे सांगितले ,,आमच्या सगळ्या मित्रांमध्ये सगळ्यात जास्त प्रयोगशील आणि कुतूहल असणारा मी होतो . झाले मी ते गर्द खरेदी केले त्या वेळी फक्त ५ रुपयांना एक छोटी बाटली मिळत असे ..
होमिओपॅथि च्या गोळ्यांची छोटीशी बाटली असते तश्या छोट्या लाल झाकणाच्या बाटलीत हे गर्द मिळे , फिकट पिवळसर तपकिरी रंगाची ही पावडर सुरुवातीला मी अड्ड्यावर एका सोबत चीलीमितून टाकून ओढली गांजाची चिलीम भरून त्या वर माचीस च्या काडीच्या चमच्याने अगदी अर्धी चिमूट पावडर त्यात टाकून चिलीमिचा दम मारला आणि काही मिनिटातच माझे अंग शिथिल झाले ,मन शून्य होऊ लागले , सगळ्या काळज्या चिंता व्यर्थ वाटू लागल्या . खूप मस्त अनुभव होता मात्र तोंडात वेगळीच कडवट चव जाणवू लागली , थोडेसे मळमळल्या सारखे झाले .
सर्व मित्रांमध्ये सुरुवातीपासूनच मी जरा जास्त करणाऱ्यांपैकी होतो म्हणजे एखादी गोष्ट आवडली की सतत ती गोष्ट करण्याचा माझा प्रयत्न असे ,शिवाय माझ्या डोक्यात अनेक प्रकारचे गहन प्रश्न नेहमी फेर धरून असत म्हणूनच की काय रात्री सहजा सहजी मला झोप लागत नव्हती , आधी दारू, मग गांजा , मग भांगेच्या गोळ्या , नंतर अफुच्या गोळ्या असे माझे व्यसन वाढत चालले होते , तरी रात्री मी शांत झोपू शकत नसे मला आठवते अगदी पहाटे तीन पर्यंत मी जागा राही मग जेमतेम झोप लागे , अर्थात माझ्या सततच्या अस्वस्थते मुळे तसेच , व्यक्तिगत आयुष्यात प्रेम प्रकरणातील अपयश मी फारच मनाला लावून घेतले होते व त्यामुळे जीवनाबद्दल वैफल्यग्रस्त होतो . मात्र तारुण्यातील जोम , उत्साह , काहीतरी करून दाखवण्याची किवा स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची उर्मी आणि अंतर्मनाच्या पातळीवरील वैफल्य असे विचित्र मिश्रण झाले होते माझ्या व्यक्तिमत्वाचे !
मी जेव्हा माझ्या इतर मित्रांना गर्द बाबत सांगितले तेव्हा आधी सर्व मला रागावले हे भलतेच नको करूस हे गर्द फार भयंकर आहे असे त्यांनी ऐकले होते , जर मटनाच्या छोट्या तुकड्यावर गर्द ची पावडर टाकली तर तो तुकडा पाच मिनिटात विरघळून जातो असे ऐकिवात होते आपल्या शरीरातील मास असेच गळून जात राहील तेव्हा हे करू नको असे मला बजावले मित्रांनी पण मी असे सहजा सहजी ऐकणाऱ्या मुलांपैकी नव्हतोच लहानपणापासून .
( बाकी पुढील भागात )
— तुषार पांडुरंग नातू
Leave a Reply