(कुतुहल, मित्रांचा आग्रह किंवा तात्पुरती मॊजमस्ती उसना आनंद म्हणून आयुष्यात प्रवेश केलेले दारु व इतर मादक पदार्थांचे व्यसन कसे आयुष्य उध्वस्त करते याचा मागोवा या सदरात घेतलेला आहे..)
मी हळू हळू माझ्या मित्रांच्या नकळत ब्राऊन शुगर ओढू लागलो होतो , सगळे एकत्र असताना गांजा , चरस आणि मग सगळ्यांना शुभरात्री करून झाले की मी घरी येताना सोबत ब्राऊन शुगर ची ती छोटीशी लाल झाकणाची बाटली घरी आणून सिगरेट मध्ये गांजा भरून त्यात थोडीशी पावडर टाकून ओढत असे . मला आठवते एरवी आम्ही गांजा चिलीमितून ओढत असू व त्या वेळी अनेकदा मातीची चिलीम नीट सांभाळावी लागे नाहीतर फुटून जात असे म्हणून मी सायकलच्या पायडलला असलेल्या स्टीलच्या नळी ची एक कायम टिकेल अशी चिलीम बनवली होती ..
ती नळी मागच्या बाजूने ठोकून थोडी चपटी केली होती आणि त्यात एक खडा टाकला होता , ही चिलीम मात्र खूप गरम होत असे त्या मुळे जाड रुमालात धरून ओढावी लागे , एकीकडे व्यसनाची प्रचंड ओढ आणि दुसरीकडे देशभक्ती , समाजसेवा वगैरेच्या गप्पा आणि योजना असे दुहेरी जिवन जगत होतो मी .
आझाद सेनेची पहिली मिशन ठरली ती कॉलेज च्या निवडणुका निपक्षपातीपणे व्हाव्यात या साठी मुलांना जागृत करण्याची ..त्या वेळी नाशिक रोड कॉलेजला बहुधा युवक कॉंग्रेसचेच उमेदवार निवडून येत असत ..तसेच बहुजन युवा संघटना या संघटनेचा देखील कॉलेजच्या निवडणुकीत लक्षणीय सहभाग असे .. उमेदवारांना दम देणे …उमेदवार फोडणे ..निवडणुकीच्या दिवशी उमेदवार पळवणे वैगरे प्रकार चालत . त्या वेळी नाशिक रोडला दलित -सवर्ण अशी दंगलही एकदोन वेळा झाली होती त्यामुळे नेहमी कॉलेजच्या निवडणुकीत पुन्हा दलित -सवर्ण हा वाद उफाळून येई …
निवडणुकीत कोणतीही जात पात न पाहता मतदान करावे , जातीपेक्षा उमेदवाराच्या चारित्र्याला प्राधान्य द्यावे व हा दलित -सवर्ण वाद मिटावा या साठी प्रयत्न करण्याचे आम्ही ठरवले , विलास चे अक्षर खुपच सुंदर होते , तो चित्रे देखील छान काढी आम्ही आझाद सेनेतर्फे एक पत्रक कॉलेज मध्ये लावायचे ठरवले ज्यात एकतेचा आणि निवडणुकीत गैरप्रकार न करता निपक्षपाती पणे मतदान करावे असा संदेश दिला जाणार होता , आम्ही एका मोठ्या आकाराच्या कार्डबोर्ड वर जलरंगाचा वापर करून तो संदेश लिहायचे ठरवले , अर्थात विलासच त्याच्या सुंदर अक्षरात लिहिणार होता . पोस्टर च्या वर एका बाजूला ‘ जय भवानी ‘ आणि दुसऱ्या बाजूला ‘ जयभीम ‘ असे लिहून मग खाली , जात पात न पाहता मतदान करावे , उमेदवाराच्या चारित्र्याला प्राधान्य द्यावे , कोणताही गैरप्रकार करू नये वगैरे सूचना लिहिल्या , आणि जर कोणी असे प्रकार करताना आढळला तर त्याला आझाद सेना धडा शिकवेल अशी धमकी लिहून पोस्टर तयार केले गेले .
हे पोस्टर आम्ही मध्यरात्री जाऊन कॉलेज च्या प्रवेशद्वारावर लावले , आम्हाला तेथील पहारेकऱ्याने अडवू नये किवा ओळखू नये म्हणून खूप सावधपणे हा कारभार उरकावा लागला . दुसऱ्या दिवशी आम्हाला मुलांच्या काय प्रतिक्रिया येतात हे जाणून घेण्याबाबत खूप उत्सुकता होती . सकाळी कॉलेज सुरु झाल्यावर प्रवेश द्वारावरील ते लक्षवेधी पोस्टर पाहून मुले चर्चा करत होती , ‘ आझाद सेना ‘ म्हणजे नक्की कोण याचे अंदाज बांधले जात होते , आमचा संशय येण्याची सुतराम शक्यता नव्हती . त्या दिवशी सगळ्या कॉलेज मध्ये त्या पोस्टरचा विषय रंगला हे आमच्या करिता समाधानकारक होते चला आझाद सेनेची पहिली मिशन सुखरूप पार पडली या समाधानात त्या दिवशी रात्री मस्त पार्टी झाली आमची !
दुसरी मिशन म्हणून नाशिक रोडला होटेल ‘ वास्को ‘ च्या समोरच्या झोपडपट्टीत एक मटक्याचा मोठा अड्डा होता , गोरगरीब मटका खेळून बरबाद होतात हे आम्ही पाहातच होतो तेव्हा हा मटक्याचा अड्डा बंद पडला पाहिजे असे वाटत होते , हा अड्डा म्हणजे लाकडी फळ्यांनी बनवलेला होता तो जाळणे सहज शक्य होते . आम्ही रात्री साधारण ३ च्या सुमारास जाऊन रॉकेल टाकून तो अड्डा जाळायचे ठरवले , अडचण अशी होती की त्या अड्ड्यावर रात्री एक जण झोपत असे तो नोकर माणूस होता , तसेच दारूचा व्यसनी देखील होता त्याला काही इजा न होता हे काम उरकले पाहिजे असे आम्हाला वाटे कारण तो बिचारा गरीब नोकर होता . त्याला काहीतरी कारणाने बाहेर बोलवावे आणि मग दुसऱ्या बाजूने रॉकेल टाकून अड्डा पेटवायचा असे ठरले शेवटी ..
( बाकी पुढील भागात )
— तुषार पांडुरंग नातू
Leave a Reply