(कुतुहल, मित्रांचा आग्रह किंवा तात्पुरती मॊजमस्ती उसना आनंद म्हणून आयुष्यात प्रवेश केलेले दारु व इतर मादक पदार्थांचे व्यसन कसे आयुष्य उध्वस्त करते याचा मागोवा या सदरात घेतलेला आहे..)
माझ्या लाडक्या जँकी कुत्र्याला देखील मी हळू हळू गांजा च्या धुराची सवय लावत होतो , अर्थात त्यामागे माझा फक्त कुतूहल हाच हेतू होता त्याला त्रास देणे हा हेतू कधीच नव्हता तरीही ते अतिशय निंद्य कृत्य होते हे मान्य करायला मला संकोच वाटत नाहीय एका नशेबाज व्यक्तीच्या डोक्यात काय येऊ शकेल हे सांगता येत नाही याचाच हा नमुना आहे . गांजाचे शारीरिक दुष्परिणाम फारसे वेगाने किवा गंभीर होत नाहीत मात्र त्याचा माणसाच्या मेंदूवर खूप भयानक परिणाम होऊ शकतो , गांजा पिऊन पुढे वेड लागलेले अनेक जण मला माहित आहेत . जँकी च्या बाबतीत माझे प्रयोग फक्त गांजा वरच थांबले नाहीत तर पुढे मी ब्राऊन शुगर ओढायला सुरवात केल्यावर जँकी ला ब्राऊन शुगर चा धूर देखील दिला होता व त्यातून भयंकर गंभीर प्रकरण उदभवले होते .
झाले असे की अधून मधून म्हणजे आठवड्यातून एक दोन वेळा मी जँकी ला माझ्या बरोबर संडासात नेऊन त्याच्या तोंडात गांजाचा धूर सोडत असे , नंतर जेव्हा मी ब्राऊन शुगर ओढायला लागलो तेव्हा देखील मला तो प्रयोग पुन्हा जँकी वर करावा असे वाटले व मी ब्राऊन शुगर चा तोंडातील धूर जँकी च्या तोंडात सोडला आता त्याला माझ्या अश्या वागण्याची सवय झाली होती त्या मुळे त्याला फारसे आश्चर्य वाटले नसावे किवा त्याने अविश्वास देखील दर्शवला नाही , ब्राऊन शुगर ही अफू वर रासायनिक प्रक्रिया करून तयार केलेली पावडर असल्याने त्यातील अफू चे गुणधर्म अफुच्या साधारण पाचपट जास्त परिणाम कारक असतात एक प्रकारे अफूचा अर्कच असते ही पावडर याचे व्यसन अतिशय वेगाने लागते व हे व्यसन मिळाले नाही तर दारू व गांजाच्या पेक्ष्या खूप जास्ती शारीरिक त्रास होतात ( विथड्रॉवल्स ) मी पूर्णपणे ब्राऊन शुगर च्या आहारी गेल्यावर माझी भूक मंदावली होती , वजन कमी होत चालले होते , तसेच आता ब्राऊन शुगर साठी लागणारे पैसे जमवणे देखील कठीण होत चालले होते त्यामुळे घरात चोऱ्या करणे , बाहेर उधारी करणे , ओळखीच्या लोकांकडे उसने पैसे मागणे असे प्रकार सुरु झाले होते .
जँकी ला देखील मी जेव्हा चार पाच वेळा ब्राऊन शुगर चा धूर दिला तेव्हा त्याला देखील त्याचे व्यसन लागल्याचे मला जाणवू लागले होते कारण मी संडासात गेलो की तो बाहेरून माझ्यावर भुंकणे सुरु करत असे म्हणजे त्याचा अर्थ असा की त्याला देखील मी आत घ्यावे . माझ्या कडे जेव्हा जास्त पैसे असत व पुरेशी ब्राऊन शुगर असे तेव्हा मी त्याला आत घेऊन ब्राऊन शुगर चा धूर त्याच्या तोंडात सोडत असे , मात्र जेव्हा माझ्या कडे कमी ब्राऊन शुगर असे व माझा मुड ठीक नसे तेव्हा मी त्याच्या भुंकण्या कसे दुर्लक्ष करीत असे . मला हे जाणवत होते की माझ्या प्रमाणेच जँकी ला देखील ब्राऊन शुगर मिळाली नाही तर शारीरिक त्रास होत असावा व म्हणून तो जिवाच्या आकांताने बाहेरून भुंकून मला देखील दे अशी विनंती करत असावा पण जँकी त्या बाबतीत सर्वस्वी माझ्यावर अवलंबून असल्याने त्याचा नाईलाज होता म्हणजे मी जर कृपा केली तरच त्याला ब्राऊन शुगरचा धूर मिळत असे . सुरवातीला गांजामुळे वाढलेली जँकी ची भूक नंतर ब्राऊन शुगर मुळे मंदावली होती व तो जरा सुस्त होत चालला होता हे स्पष्ट बदल मी मनात नोंद केले होते .
माझा मोठा भाऊ नुकताच त्याचे पुण्याचे अभियांत्रिकी चे शिक्षण पूर्ण करून पुन्हा घरी आला होता , त्याला बाहेरून माझे सगळे प्रताप समजले होते व तो एकदोन वेळा माझ्याशी माझ्या व्यसनाबाबत बोलला देखील होता पण मी त्याला उडवून लावले होते . माझा मोठा भाऊ स्वभावाने शांत , सालस प्रवृत्तीचा आहे त्यामुळे त्याला माझे वागणे पटत नव्हते तरी तो माझ्याशी भांडण वगैरे करीत नसे शिवाय मी किती बंडखोर आहे व बाहेर कोणकोणत्या प्रकारच्या लोकांमध्ये वावरतो हे त्याला माहित होते , माझा रागीट स्वभाव , हाणामारीला तत्पर असणे या गोष्टींमुळे तो शक्यतो माझ्या बाबतीत बोलणे टाळत असे . एकदा सकाळ पासून मला जरा पैश्यांची चणचण होती त्यामुळे मी वैतागात होतो , सकाळी आईला कुठेतरी समारंभाला बाहेर जायचे होते म्हणून ती लवकर घराबाहेर पडली होती , तिच्या कडून जाताना पैसे घेतले होते पण ते माझ्या व्यसनासाठी पुरेसे नव्हते , मी साधारणतः सकाळी ९ घराबाहेर पडलो होतो अड्ड्यावर गेल्यावर समजले की आदल्या दिवशी पोलिसांची रेड पडली होती आणि त्यामुळे ब्राऊन शुगर मिळणे बंद होते .
हे एकून माझे हातपायच गळाले , तेथे अड्ड्यावर माझ्या सारखे बरेच गर्दुल्ले घोळक्याने उभे होते , एका ठिकाणी मिळत नाही म्हंटल्यावर मग दुसरीकडे कोठे मिळते का याची एकमेकांना विचारणा होत होती एकाने सांगितले की नाशिक शहरात भद्रकाली मध्ये माल ( ब्राऊन शुगर ) मिळतो आहे . ज्यांच्या कडे जास्त पैसे होते ते ताबडतोब बस आणि रिक्षा करून भद्रकाली कडे रवाना झाले , माझ्या कडे जेमतेम पैसे असल्याने माझी अडचण होती नाशिक ‘ भद्रकाली ‘ ला बसने जाणे येणे आणि ब्राऊन शुगर खरेदी करणे या साठी पुरेसे पैसे नव्हते फार तर एका वेळचे म्हणजे जाण्याचे किवा येण्याचे पैसे होते , शेवटी येताना पायी येऊ असा निर्धार करून बसने भद्रकाली ला गेलो तेथे ब्राऊन शुगर मिळण्यासाठी बराच वेळ लागला इकडे विड्रॉवल्स मुळे माझा जीव कासावीस झाला होता , शेवटी एकदाची पुडी मिळाली व मी तेथेच आडोश्याला तीनचार दम मारून आधी मला होणारा त्रास थांबविला व मग घरी यायला निघालो भद्रकाली ते नाशिक रोड रेल्वे क्वार्टर्स हे अंतर सुमारे ९ किलोमीटर असावे येताना भाड्यासाठी पैसे नव्हते म्हणून भर उन्हात मी पायी येण्यास निघालो ..
सुमारे अडीच तास पायी चालून मी घरी आलो घरात मोठा भाऊ होता फक्त , वडील कामावर गेले होते तर आई मैत्रिणी कडे गेलीली …दुपारचे ३ वाजले होते मी घरात आल्याबरोबर सरळ संडासात शिरलो व उरलेली ब्राऊन शुगर ओढण्यास सुरवात केली , मी घरात आल्याबरोबर जँकी माझ्या मागे पुढे घोटाळू लागला होता पण त्याच्या कडे मी सरळ दुर्लक्ष केले होते , मी संडासात गेल्यावर त्याने भुंकणे सुरु केले याचा अर्थ ‘ मला पण हवे ‘ हा होता हे आता मला माहित झाले होते . त्या दिवशी मी सकाळ पासून पनवती लागल्यासारखा फिरलो होतो , वर पैश्यांची अडचण त्यामुळे डोके फिरले होतेच , मी जँकीच्या भुंकण्या कडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत होतो पण ते काही जमेना जेमतेम माझ्यापुरती ब्राऊन शुगर असताना मी जँकी ला त्यात सहभागी करून घेणे शक्यच नव्हते . एकीकडे त्यांच्या भुंकण्यामुळे माझे लक्ष पिण्यात नीट लागत नव्हते व मला जँकीचा राग येऊ लागला होता …
शेवटी मी वैतागून बाहेर आलो आणि त्याच्या पेकाटात दोन लाथा घातल्या त्याला हे अनपेक्षित होते तो मोठ्याने विव्हळू लागला तितक्यात माझा मोठा भाऊ तेथे आला त्याने मी जँकी ला मारलेले पहिले व मला तो रागावू लागला ‘ का मारतोस त्या गरीब जीवाला ? कसला राग काढतो आहेस त्यांच्यावर वगैरे बोलू लागला ” मी मुजोर होतोच सुरवातीपासूनच मी देखील ”माझा कुत्रा आहे तो , मी आणला आहे त्याचे हवे ते करीन , तू कोण मध्ये बोलणारा म्हणून भावाशी वाद करु लागलो ” शेवटी वैतागून भाऊ म्हणाला ‘”किती त्रास देशील सर्वाना ? तू सर्व लाजलज्जा सोडली आहेस , इतका निर्लज्ज मुलगा मी कधी पहिला नाही , एखादा असता तर आपल्या मुळे इतका त्रास होतोय घरच्यांना म्हणून सरळ जीव तिला असता रेल्वे खाली , तसाही तुझा जगुन काही फायदा नाही ” असे त्याने म्हणताच माझे डोके फिरले थांब मला मर म्हणतोस ना बघ आता मरतोच मी , असे म्हणून मी रागाने दुसऱ्या खोलीत जाऊन दार आतून लावून घेतले …
( बाकी पुढील भागात )
— तुषार पांडुरंग नातू
Leave a Reply