(कुतुहल, मित्रांचा आग्रह किंवा तात्पुरती मॊजमस्ती उसना आनंद म्हणून आयुष्यात प्रवेश केलेले दारु व इतर मादक पदार्थांचे व्यसन कसे आयुष्य उध्वस्त करते याचा मागोवा या सदरात घेतलेला आहे..)
( सर्व वाचकांसाठी एक सूचना देणे राहून गेले आहे ती पुढील प्रमाणे – मी माझ्या हट्टी , जिद्दी , बंडखोर , मनमानी करण्याच्या, सर्व काही झटपट मिळाले पाहिजे अश्या प्रकारच्या वृत्तीमुळे आणि आयुष्य म्हणजे नुसती मौज मजा असा गैरसमज करून घेतल्यामुळे सहजगत्या व्यसनाच्या जाळ्यात अडकलो होतो व नंतर व्यसनामुळे जे शारीरिक , मानसिक आर्थिक , कौटुंबिक , सामाजिक आणि नैतिक अधःपतन कसे होते याचे तसेच नंतर त्यातून बाहेर पाडण्यासाठी , पुन्हा सावरण्यासाठी जे काही केले व आजचा जो काही सुज्ञ पणा आहे तो कसा मिळाला याचे वर्णन या लेखमालेत करीत आहे …
मला वेळोवेळी असंख्य लोकांनी मदत केली म्हणून आज मी जिवंत आहे व त्या सर्वांचा मी ऋणी आहे , या लेखमालेत जरी काही गमतीशीर घटना असतील तरी त्यामागे एक अपराधाचीपणाचा सल देखील मनात आहे . कृपया तरुण आणि प्रयोगशील वाचकांनी मी केलेले प्रयोग आपल्या आयुष्यात करू नयेत ही विनंती कारण सर्वांनाच यातून पुन्हा बाहेर पडणे जमेलच याची खात्री देता येत नाही . माझ्या जीवनाची ऐन उमेदीची जी सुमारे २५ वर्षे मी वाया घालवली त्यातून इतरांनी काहीतरी धडा घ्यावा या उद्देशाने ही लेखमाला लिहीत आहे , माझ्या कृत्यांचे समर्थन , किवा उद्दात्तीकरण करण्याचा माझा हेतू नाही तसे कोणाला वाटत असेल तर त्यांनी आपला दृष्टीकोन बदलावा . आपल्या आयुष्याची खाजगी पाने इतरांसमोर उलगडण्याचा हा उद्योग मी केवळ त्यातून इतरांना लाभ व्हावा याच सदहेतुने करीत आहे . )
रागारागाने मी आतल्या खोलीत जाऊन दार आतून लावून घेतले , मोठ्या भावाने ,मला ‘ ती जिवंत राहून काही फायदा नाही , त्यापेक्षा मरत का नाहीस , गाडीखाली जाऊन जीव दे ‘ असे म्हंटल्या मुळे माझा अहंकार प्रचंड दुखावला गेला होता व आता मोठ्या भावाला काहीतरी धडा शिकवला पाहिजे असे मला वाटत होते . त्याने केलेल्या अपमानाचा बदला आपल्याला त्रास न होता कसा घेता येईल असा विचार मनात होता . ( व्यसनी माणसाची बुद्धीमत्ता ही व्यसनाच्या काळात तो नेमकी नकारात्मक गोष्टींसाठी वापरतो ) आणि मला समोर कप्प्यात वडिलांनी ढेकुण मारण्यासाठी आणलेली बेगॉनची बाटली दिसली ताबडतोब माझ्या मनात योजना तयार झाली … मी ती बाटली उघडून त्यातील बेगॉन माझ्या कपड्यावर शिंपडले त्यामुळे कपड्यांना व माझ्या अंगाला बेगॉनचा वास येऊ लागला मग ती रिकामी बाटली हातात घेऊन दार उघडले …
मी आत काय करतोय या भीतीने भाऊ दाराबाहेरच उभा होता आता त्यालाही आपण काहीतरी भलतेच बोलून गेलोय याची जाणीव झाली असावी , बाहेर येऊन लगेच मी म्हणालो ‘ बघ मी मरावे से वाटतेय ना तुला ? आता तुझी इच्छा पूर्ण होईल , मी बेगॉन प्यायलो आहे . आणि आता बाहेर जातोय ‘ म्हणत .मी घराचे दार उघडून बाहेर पडलो . भाऊ घाबरून ‘ अरे थांब थांब , आपण डॉक्टरांकडे जाऊ ‘ म्हणत होता , पण त्याला हिसडा मारून मी निघून गेलो , तो बिचारा साधा सरळ असल्यामुळे काय करावे हे त्याला सुचत नव्हते वर घाबरला देखील होता , बाहेर पडून मी सरळ गांजाच्या अड्ड्याकडे गेलो . आणि तेथील मित्रांमध्ये जाऊन गांजा ओढत बसलो , गांजाचे एक बरे असते दारू आणि इतर मादक पदार्थांच्या तुलनेत स्वस्त असल्याने सहज प्यायला मिळते ..
साधारण: सायंकाळचे ७ वाजेपर्यंत मी अड्ड्यावर टाईम पास केला . जवळचे गर्द दुपारीच संपले होते त्यामुळे थोडा त्रास होऊ लागला होता , गांजा ओढून मी गर्द ची कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न करत होतो पण ते शक्य नव्हते जेव्हा गर्द चे विड्रॉवल्स असतात तेव्हा तो त्रास गर्द घेतले तरच थांबतो . रात्री ८ वाजता रेल्वे स्टेशन वर माझा एक गर्दुल्ला मित्र भेटला त्याने मला माझा त्रास कमी होण्याइतपत गर्द पाजले . इकडे घरी आई वडील आल्यावर भावाने सगळा प्रकार त्यांना सांगितला होता आणि वडील व भाऊ माझा सगळीकडे शोध घेण्याचा प्रयत्न करत होते , ते मला शोधतील हे माहित असल्याने मी मुद्दाम माझ्या नेहमीच्या मित्रांकडे किवा नेहमीच्या अड्यावर गेलो नव्हतो . सगळे उद्योग करून झाल्यावर मग मी शेवटी रात्री १० ला घरी आलो , पहातो तर आईचे रडून रडून डोळे लाल झालेले , वडील हताश पणे खुर्चीवर बसले होते व भाऊ अपराधी मुद्रेने मन खाली घालून उभा होता …
मी घरात शिरल्याबरोबर आईने मला जवळ घेतले व ‘ कुठे गेला होतास , चल आपण डॉक्टर कडे जाऊ , अरे मोठ्या भावाचे इतके काय मनावर घेतलेस ? ‘ असे म्हणू लागली मी काय बोलतो या कडे सर्वांचे लक्ष होते मला वनपीस जिवंत घरी आलेला पाहून त्यांच्या जीवात जीव आल्याचे मला जाणवले होते पण अजून माझा भावावरील राग कमी झाला नव्हता . मी काही न बोलता नुसते ‘ ऊ , ऊ ‘ असे केले यावर आईला शंका आली व म्हणाली ‘ तू बोलत का नाहीस ? त्यावर मी जीभ बाहेर काढून मला बोलता येत नाहीय असा इशारा केला . झाले आईने पुन्हा रडायला सुरवात केली वडिलांना म्हणाली ‘ अहो ! याची वाचा गेली की काय ? आणि भावाला रागावू लागली , आता झाले का तुझे समाधान , तुला हेच पाहिजे होते ना , इतका छान बोलणारा माझा सोन्यासारखा मुलगा मुका झाला हो ” भाऊ काहीतरी बोलायचे म्हणून ‘ अग , पण आई , मी जरा रागात तसे म्हंटले , मला खरेच तसे व्हावे असे वाटले नव्हते ” त्यावर ‘ चूप बस नालायक , एक शब्द बोलू नकोस , त्याचे आईवडील आहेत अजून जिवंत त्याला पोसायला , तुझ्या कमाई चे खात नाही तो ” वगैरे म्हणून त्याच्यावर डाफरली ….मी मुकेपणाचे सोंग चांगले वठवत होतो , मनातल्या मनात भावाचा आईने केलेला पाणउतारा पाहून समाधान मिळत होते..
( अर्थात ही माझी विकृती होती , हे आता समजतेय )
( बाकी पुढील भागात )
— तुषार पांडुरंग नातू
Leave a Reply