(कुतुहल, मित्रांचा आग्रह किंवा तात्पुरती मॊजमस्ती उसना आनंद म्हणून आयुष्यात प्रवेश केलेले दारु व इतर मादक पदार्थांचे व्यसन कसे आयुष्य उध्वस्त करते याचा मागोवा या सदरात घेतलेला आहे..)
१२ वी ला असताना पंचवटी कॉलेज मध्ये स्नेहसंमेलनाच्या वेळी आपण एखादी एकांकिका बसवावी असे आमच्या मनात आले अर्थात या पूर्वी अभिनयाचा काही अनुभव नव्हता परंतु आमच्या पेक्षा वयाने मोठे असेलेल जे आमचे विलास पाटील , रतन पगारे , यशवंत .. वगैरे मित्र होते ( अर्थात हे मित्र आमच्या सारखे व्यसनी नव्हते ) त्यांनी आम्हाला या प्रकरणी मदत करायचे ठरवले , मग रतन पगारे ने ‘ ईश्वर मृतात्म्यास शांती देवो ‘ नावाची एक एकांकिका खूप विनोदी आहे आणि ती तुम्ही बसवा असे सुचविले आम्हाला त्यातील काहीच काळात नसल्याने रतननेच आम्हाला एकांकिका बसवून देण्याची जवाबदारी स्वीकारली मग आधी लेखकाला भेटणे त्याची रॉयल्टी वैगरे द्यावी लागते या गोष्टी समजल्या फक्त ५१ रुपये इतकी रॉयल्टी देऊन लेखकाची परवानगी काढली त्या एकांकिकेत एकून सहा पात्रे होती इंद्र , चित्रगुप्त , नारद , एक अभिनेता , यमराज , आणि सेवक त्यापैकी नारदाची प्रमुख भूमिका होती …
आमच्या सर्व मित्रांची अभिनयाची परीक्षा घेऊन रतनने नारदाच्या भूमिके साठी माझी निवड केली , इंद्र म्हणून भारत खैरनार , चित्रगुप्त -भीमा डावरे , अभिनेता -अनिल पगारे , यमराज – थॉमस चांदेकर , सेवक -प्रकाश जाधव अशी आमची टीम होती. या पैकी गांजा ओढणारे आम्ही चार जण होतो तर दोघे मात्र कोणतेही व्यसन करत नव्हते , मग नाटकाच्या तालमी सुरु झाल्या ..रतनने आम्हा सर्वाना आधी आमच्या भूमिकेचे महत्व , आमची बोलण्याची पद्धत , हावभाव , हातवारे या बाबत मार्गदर्शन केले , सुरवातीला तर खूप अवघडल्या सारखे होई , बोलताना हातवारे कसे करावेत ते समजत नसे ,तसेच जेव्हा दुसरा अभिनेता बोलतो तेव्हा आपल्या ऐकताना आपल्या चेहऱ्यावरचे भाव कसे बदलावेत , हात कसे ठेवावेत वगैरे गोंधळ होत होता , त्यात आम्ही तिघे कधी कधी जर रिहर्सल च्या वेळी गांजा पिऊन असलो तर मग धम्मालच असायची आम्हाला इतरांच्या अभिनयाचे हसू यायचे किवा गम्मत वाटायची मग सगळेच हसायला लागत , अश्या वेळी रतन खूप चिडे नंतर त्याला कळले हे लोक गांजा पिऊन तालमीला येतात , तेव्हा त्याने एक दोन वेळा रागावून हे बंद करा नाहीतर मी मदत करणार नाही अशीही धमकी दिली परंतु आम्ही पुन्हा त्याची माफी मागून त्याला पटवत होतो ..
त्या वेळी माझे वडील पक्षघाताने आजारी होते म्हणून ते भायखळा येथील रेल्वेच्या हॉस्पिटल मध्ये दाखल होते तर आई त्यांच्या जवळ , आणि मोठा भाऊ पुण्याला शिकायला होता , त्यामुळे माझे घर मोकळेच होते आम्हाला तालमी करायला आणि बाकी मौज मस्ती करायला . शेवटी एकदाचे नाटक बसले सगळ्यांचे पाठांतर चांगलेच होते मात्र काही वेळा संवाद मागे पुढे होत अश्या वेळी पडद्यामागून संवाद म्हंटले जातात व त्याला प्राँम्पटिंग म्हणतात हे देखील तेव्हाच समजले . मी आधुनिक नारदाची भूमिका साकारणार होतो , जीन्सची पँन्ट , वर उघडा , गळ्यात जानवे , आणि तंबो-या ऐवजी गिटार असा माझा वेश होता , तर बाकीचे मात्र पारंपारिक वेशभूषा करणार होते . आम्ही सर्वानी वर्गणी काढून वेशभूषा वगैरेचा , तसेच मेकअप चा खर्च करणार होतो नाटका साठी लागणाऱ्या साधनांना प्राँपर्टी , व कपड्यांना ड्रेपरी असे म्हणतात हे देखील समजले तसेच नाटकात अभिनय न करणारे परंतु इतर मदत करणाऱ्या लोकांना बँकस्टेज कलाकार असे म्हणतात ही माहिती मिळाली , आमच्या नाटकातील बँकस्टेज कलाकार आमच्या सारखेच आमचे गांजा ओढणारे मित्र होते …एकंदरीत सगळीच धमाल होती..
शेवटी एकदाचा प्रयोगाचा दिवस उजाडला , आदल्या दिवशी रंगीत तालीम झाली होती ( म्हणजे वेशभूषा करून ) . आधी आम्ही सगळे गांजाच्या अड्ड्यावर गेलो तेथे दम मारून ताजेतवाने झालो आणि मग प्रत्यक्ष नाटकाला सुरवात झाली . नाटकात हशा घेणारे खूप संवाद माझ्या तोंडी होते व माझे पाठांतर देखील चांगले होते तसेच अधूनमधून मला ‘ नारायण , नारायण ‘ असे म्हणायचे होते मी ते जरा इंग्रजी पद्धतीने म्हणत असे त्याला देखील लोक हसत होते . कोणीही कुठेही न चुकता प्रयोग पार पडला एकदाचा , मग पुन्हा आमची टोळी अड्ड्यावर श्रम परिहार करायला गेली . आमच्या एकांकिकेला बक्षिस मिळाले होते तर मला अभिनयाचे बक्षिस मिळाले . नंतर आम्ही ही एकांकिका आमच्या विष्णू नगरच्या गणेश उत्सवात देखील सादर केली तसेच सिन्नर फाट्याच्या मुलांचा ‘ त्रिमूर्ती ‘ संगीत मेळा होता त्यात देखील आमची एकांकिका एक दोन वेळा सादर केली . मी चांगला अभिनय करतो हे समजल्यावरून मग मला कामगार क्रीडा मंडळाच्या एका ‘ उकिरडा ‘ नावाच्या दलित नाट्यात देखील छोटासा रोल मिळाला . हे ‘ उकिरडा ‘ नाटक राज्यनाट्य स्पर्धेत तिसरे आले होते ..
( बाकी पुढील भागात )
— तुषार पांडुरंग नातू
Leave a Reply