(कुतुहल, मित्रांचा आग्रह किंवा तात्पुरती मॊजमस्ती उसना आनंद म्हणून आयुष्यात प्रवेश केलेले दारु व इतर मादक पदार्थांचे व्यसन कसे आयुष्य उध्वस्त करते याचा मागोवा या सदरात घेतलेला आहे..)
बिटको कॉलेजच्या दुसऱ्या वर्षी म्हणजे कॉलेजच्या समूहगीताचा समूह प्रमुख पदवीधर होऊन नाशिक शहरात एन.बी .टी लॉ कॉलेजला पदव्युत्तर शिक्षणासाठी गेला आणि मग अनुभवी म्हणून आपोआप समूह प्रमुखाचे पद माझ्याकडे आले . मी अतिआत्मविश्वासाच्या जोरावर यावेळी स्वतच गाणे लिहायचे, त्याला चाल देखील स्वतःच लावायची असे ठरवले होते , त्यानुसार माझ्या आवडीचा ग्रंथ श्रीमदभगवत गीतेवर आधारित संदेश तरुणांना देईल असे गाणे लिहायचे ठरवले मग दिवसरात्र तेच डोक्यात घोळत होते परीक्षकांवर आपल्या समूह्गीताचे इम्प्रेशन कसे पडेल ? पाहिजे मग कल्पना सुचली गाण्याच्या आधी गीतेतील एखादा श्लोक सर्व समूहाने म्हणायचा आणि नंतर लगेच जोडून गाणे म्हणायला सुरवात करायची त्या प्रमाणे मग कर्मयोगावर आधारित सुप्रसिद्ध ‘ कर्मण्येवाधिकारस्ते …. ‘ हा श्लोक निवडला . त्यावेळी अर्थात श्लोकातील संस्कृत शब्दांचा उच्चार नेमका कसा करायचा हे माहित नव्हते पण कसेतरी जमवले . ते गीत आता पूर्ण आठवत नाही पण जे आठवते ते सांगतोय गीताचे शीर्षक होते ‘ जागृत हो रे पार्था ‘ आधी श्लोक आणि मग गाणे पुढील प्रमाणे होते ‘ कर्मफलांचा मोह त्यागुनी , कर्तव्याचा ध्यास घेउनी , आत्म्याच्या तव मुक्तीसाठी जागृत हो रे पार्था ‘ असे धृवपद होते …
पहिले कडवे आता आठवत नाहीय पण एकंदरीत गाण्यात तरुणांसाठी खूप छान असा शांती , नीती आणि कर्तव्य पालनाचा संदेश होता . ( एकीकडे खूप भव्य दिव्य असे विचार आणि आचरण मात्र शून्य असे विचित्र मिश्रण झाले होते माझ्या व्यक्तीमत्वात थोडक्यात ‘ लोका संगे ब्रह्मज्ञान ‘ अशी अवस्था होती ) समूह प्रमुख असल्याने आपोआपच समूहातील गायकांची निवड करणे देखील माझ्याच हाती होते एकंदरीतच मला मानाचे स्थान होते काही वशिले देखील लावले गेले मात्र मी खरोखर अलिप्त राहून , जे खरोखर चांगले गातात त्यांनाच समूहात निवडले चार मुली आणि माझ्यासहित सहा मुले असा दहा जणांचा समूह तयार केला आणि मग रोज गाण्याचा सराव सुरु झाला . एव्हाना मी ब्राऊन शुगर च्या आहारी गेलो होते ते मला समजले तो प्रसंग असा की एकदा रात्री ब्राऊन शुगर घेण्यास पैसे नव्हते म्हणून नुसताच गांजा ओढून मी झोपलो आणि काही केल्या मला झोप येईना , सर्व हातापायांची एकदम आग होऊ लागली , त्वचेच्या खालून काहीतरी गरम वाहत आहे असे वाटू लागले , अंगावर काटे येत होते ,मध्येच थंडी वाजे लगेच पुन्हा अंग गरम होई , सारख्या शिंका येत होत्या , दर ५ मिनिटाला जांभई येऊन डोळ्यातून खूप पाणी येऊ लागले , मळमळ होऊन दोन वेळा उलटी झाली , पोटात ओढल्यासारखे वाटत होते तीन वेळा पातळ जुलाब झाले असा नखशिखांन्त त्रास होत होता रात्रभर मी बिछान्यावर तळमळत होतो. ( त्यावेळी ‘ विड्रॉवल्स ‘ किवा ‘ विरह लक्षणे ‘ म्हणजे व्यसनाची मानसिक आणि शारीरिक गुलामी झाल्या नंतर व्यसन न केल्यावर होणारा त्रास कसा असतो ते कळले मला . या त्रासाला ब्राऊन शुगर चे व्यसनी ‘ टर्की ‘ असे म्हणतात हे देखील नंतर समजले )
दुसऱ्या दिवशी कसाबसा सकाळी उठून कॉलेजला गेलो सारखी कोरडया खोकल्याची उबळ येत होती युवक महोत्सवाची तारीख जवळ होती म्हणून गाण्याची रिहर्सल घेणे भाग होते त्या दिवशी मी स्वतः न गाता फक्त समूहाकडून गाणे म्हणून घेतले . नंतर एका मित्राकडून पैसे उसने घेऊन आधी अड्ड्यावर गेलो आणि ब्राऊन शुगर घेतली सिगरेट मध्ये भरून पहिला झुरका मारला आणि काय आश्चर्य एकदम शांत वाटू लागले , शिंका बंद झाल्या , नाकातून पाणी गळणे थांबले , मळमळणे , पोट ओढल्यासारखे वाटणे , खोकला सारे त्रास एकदम गायब झाले .
( बाकी पुढील भागात )
— तुषार पांडुरंग नातू
Leave a Reply