इयत्ता आठवी पासूनच अभ्यासाकडे दुर्लक्ष करत गेलो होतो , त्यामुळे दहावीत जेमतेम ५० टक्के मार्क्स मिळालेले . कॉलेजला तर आभ्यासाच्या बाबतीत आनंदी आनंदच होता , मित्र , सिनेमा , आणि व्यसने अश्या उनाडक्या जोरात सुरु राहिल्या. सर्व जण म्हणत की ११ वी ची परीक्षा बोर्डाची नाही त्यामुळे सगळ्यांनाच पास करतात , मी देखील त्याच भ्रमात होतो , ट्यूटोरीयल्स वैगरे भानगडीत पडलोच नाही , वर्षातील ९० टक्के दिवस हे थियेटर मध्ये घालवलेले , आणि चक्क नापास झालो ते देखील ११ वी त …एकूण सहाशे पैकी फक्त २५ मार्क ..म्हणजे प्रत्येक विषयात जेमतेम ५ मार्क …वडिलांना हा धक्काच होता, ते मला घेऊन आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे गेले त्या वेळी श्रीमती सुनंदा लेले या प्राचार्य होत्या आमच्या नाशिक मधील ‘ पुरुषोत्तम इंग्लिश ‘ स्कूलच्या , वडिलांनी आमच्या सर्व प्रतापांची माहिती घेतली खूप चिडले होते माझ्या वर तरी मुलाच्या भविष्याच्या काळजीने त्यांनी लेले मॅडम ना मला पास करून घेण्याची विनंती केली , उगाच वर्ष वाया जाईल असा युक्तिवाद केला मात्र लेले मॅडम ने ठाम नकार दिला व सांगितले की याला तुम्ही पाठीशी घालू नका याला याच्या कर्माचे फळ मिळू दे…
त्या वेळी त्यांचा खूप राग आला होता पण इलाज नव्हता शेवटी वर्ष वाया गेलेच .
पुढे दुसऱ्या महाविद्यालयात ११ वी ला पुन्हा प्रवेश घेतला , मात्र मागील प्रसंगातून फारसा शिकलो नाही फक्त पास होण्यापुरता आभ्यास करून ११ वी झालो , व्यसने वाढली होती , १२ वी चे वर्ष म्हणून सगळे कानीकपाळी ओरडत राहिले पण पहिले पाढे पंचावन्न , बाबुभाईशी ओळख झाल्या नंतर सैलानी बाबांचा फोटो खिशात ठेऊन काहीही केले तरी ‘सैलानी बाबा ‘ वाचवतील हा एक समज बळावला होता . १२ वी ला देखील वर्षभर उनाडक्या केल्या आभ्यासात नाही मात्र सांस्कृतिक बाबतीत प्राविण्य मिळवले , कविता . अभिनय , संगीत यात मला १२ च्या स्नेह संमेलनात बक्षीसे देखील मिळाली ..त्या वर्षी वडिलांच्या आजारपणामुळे ते ‘ भायखळा येथे रेल्वे च्या दवाखान्यात दाखल होते , भाऊ शिक्षणासाठी पुण्याला आणि आई वडिलांची शुश्रूषा करण्यासाठी वडिलांजवळ होती , घर माझ्या ताब्यात , मजाच मजा होती , सतत मित्र जमवून व्यसने करणे , मौज मजा करणे हेच एकमेव काम …
आम्ही नापास होणार १२ वीला हे भविष्य शेंबडे पोर सुद्धा सांगू शकले असते पण पहिला पेपर जरा बरा गेला कारण मराठीचा होता , पुढच्या सगळ्या पेपर्स ची बोंबच होती , दुसऱ्या दिवशी आम्ही बाबूभाई कडे जाऊन काहीतरी आयडिया करायचे ठरवले नेमके त्या दिवशी मला एका ठिकाणी महत्वाचे काम होते म्हणून , मी जाऊ शकलो नाही आणि बाबू भाई कडे मात्र माझे दोन्ही मित्र गेले आणि बाबू भाई ने त्यांना मंत्र लिहिलेल्या चिठ्ठ्या दिल्या व सांगितले की या चिठ्ठ्या खिश्यात ठेवून तुम्ही कॉपी जरी केलीत तरी पकडले जाणार नाही , माझे मित्र खुशीत होते . मी जाऊ न शकल्यामुळे माझ्या कडे ती जादूची चिठ्ठी नव्हती ,मित्र त्या दिवशी रात्री खुशीत होते तर माझा जळफळाट होत होता ते मस्त गांजा पिवून झोपी गेले मी मात्र इर्षेने रात्रभर जागून इंग्रजीच्या पेपरचा आभ्यास केला …कारण माझ्या जवळ सैलानी बाबांचा मंत्र असलेली चिट्ठी नव्हती , दुसऱ्याच दिवशी कॉपी करताना माझा मित्र पकडला गेला , मी मात्र चिठ्ठी नसल्याने कॉपी च्या भानगडीत नव्हतो , तिसरा मित्र नंतरच्या पेपर ला पकडला गेला . मी रोज रात्रभर जागून आभ्यास करत गेलो आणि त्या वर्षी माझे दोन्ही मित्र नापास झाले १२ वी ला , आणि मी पास झालो . आमच्या अनेक मित्रांना बरीच वर्षे मी नेमका काय चत्मकार करून पास झालो या बाबत शंका होती .
( बाकी पुढील भागात )
— तुषार पांडुरंग नातू
(कुतुहल, मित्रांचा आग्रह किंवा तात्पुरती मॊजमस्ती उसना आनंद म्हणून आयुष्यात प्रवेश केलेले दारु व इतर मादक पदार्थांचे व्यसन कसे आयुष्य उध्वस्त करते याचा मागोवा या सदरात घेतलेला आहे..)
Leave a Reply