(कुतुहल, मित्रांचा आग्रह किंवा तात्पुरती मॊजमस्ती उसना आनंद म्हणून आयुष्यात प्रवेश केलेले दारु व इतर मादक पदार्थांचे व्यसन कसे आयुष्य उध्वस्त करते याचा मागोवा या सदरात घेतलेला आहे..)
सटाणा युवक महोत्सवाची तयारी पूर्ण झाली , या वेळी कॉलेजच्या स्पर्धकांचे अंमळनेरचा वाईट अनुभव लक्षात घेऊन फारसे लाड न करण्याचे ठरवले असावे कॉलेज प्रशासनाने कारण त्यांनी स्पेशल बस न करता फक्त तिकिटाचे जाण्या येण्याचे पैसे आणि चहा , नाश्ता , जेवण यासाठी भत्ता दिला जाईल असे स्पष्ट केले गेले … दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वा पासून स्पर्धा सुरु होणार होत्या म्हणून मुली आणि बहुतेक स्पर्धकांनी पहाटे लवकर नाशिक हून सटाणा येथे जाण्याचे ठरवले. माझ्या बरोबर गांजा ओढणाऱ्या इतर तीन जणांना देखील मी एव्हाना ब्राऊन शुगर ची चव घ्यायला लावली होती ( एखादा व्यसनी आपल्या मित्रांना देखील आपल्याला नशेने जो आनंद मिळतो तो मिळावा म्हणून आग्रह करतो , त्यात जरी त्याचा हेतू कोणाला बिघडवण्याचा नसला तरी जे दुष्परिणाम व्हायचे ते होतातच ..माझे मित्र आधी मी ब्राऊन शुगर ओढतो म्हणून मला रागवत असत पण हळू हळू ते देखील कुतूहल आणि माझ्या अधूनमधून केल्या जाणाऱ्या आग्रहाला बळी पडून जमेल तेव्हा गांजा , दारू आणि आता ब्राऊन शुगर देखील ओढू लागले होते ) त्या पैकी दोन जण माझ्या बरोबरच कॉलेजला होते त्यांची वर्णी देखील मी समूह गीताचे मदतनीस म्हणून सटाण्याला जाणाऱ्या मुलांमध्ये लावली होती ..
तर आम्ही एकूण चार पाच जणांनी पहाटे बसने जाण्याऐवजी आदल्या दिवशी रात्रीच सटाण्याला जायचे ठरवले होते व त्यानुसार आम्ही तयारी करून गांजा , ब्राऊन शुगर असा पैसे असतील तेव्हढा साठा सोबत घेऊन नाशिक ला सी .बी .एस च्या स्थानकावर जमलो होतो ..प्रत्येकाने आपापल्या पैश्यांनी आपल्याला लागणारी नशेची सामुग्री खरेदी करावी असे आधीच ठरले होते त्या नुसार मी देखील ब्राऊन शुगर च्या एकूण १० पुड्या सोबत घेतल्या होत्या या वेळी एकूण दोन दिवस महोत्सव चालणार होता त्या हिशेबाने एका दिवसाला ५ पुड्या पुरेशा होत्या माझ्या साठी . आणि गांजाच्या पाच पुड्या घेतल्या होत्या ब्राऊन शुगरच्या तुलनेत गांजा खूप स्वस्त आणि भरपूर असे एका पुडीत . रात्री आधी सर्व एका बार मध्ये जाऊन दारू प्यायलो आणि मग बस मध्ये बसलो बसमध्ये धूम्रपानास मनाई असते परंतु जर कोणी तक्रार केली तरच कंडक्टर देखल घेतो हे आम्हाला माहित होते बसमध्ये फारशी गर्दी नसल्याने आम्हाला प्रत्येकाला खिडकी जवळ जागा मिळाली व बस मध्येच सिगरेट मध्ये गांजा आणि ब्राऊन शुगर भरून ओढत आम्ही प्रवास केला पहाटे साधारण ३ ला आम्ही सटाण्याला पोचलो ..मग तेथून ऑटो ने कॉलेज गाठले कोणत्या कॉलेज ची राहण्याची सोय कोणत्या वर्गात केली आहे याची यादी समोर नोटीस बोर्डावर लावलेली होती .
आमच्या कॉलेज चे जी .एस या वेळी निवृत्ती अरिंगळे आणि राजू विभांडिक हे होते ..ते इतर मुला मुलींबरोबर पहाटे निघणार होते त्यामुळे आमच्या कॉलेज तर्फे सगळ्यात आधी पोचणारे आम्हीच ५ जण होतो . चपराशाने आम्हाला वर्ग उघडून दिला आणि सतरंज्या झोपायला गाद्या वगैरे दिल्या आणि तो निघून गेला बाजूच्या इतर वर्गातून इतर गावातून आलेली काही मुले होती . चपराशी जाताच वर्गाचे दर लावून आमचा नशेचा सामुहिक कार्यक्रम पुन्हा सुरु झाला . मी ब्राऊन शुगरचा कोटा पुरवून पिणार होतो कारण मला ब्राऊन शुगर न मिळाल्यास प्रचंड त्रास होत असे , माझे मित्र तो पर्यंत माझ्या इतके आहारी गेले नव्हते, तरीही ते मित्र सारखे मला ब्राऊन शुगर ची सिगरेट मागत होते मी त्यांना माझी संपेल असे सांगताच ते म्हणत तुला उद्या आम्ही आमच्या जवळची देऊ असे करत करत माझ्याकडे केवळ ३ पुड्या उरल्या व अजून मला पूर्ण दोन दिवस काढायचे होते ( व्यसनी व्यक्तीचे असेच होते जास्ती दिवस पुरेल म्हणून तो जितका जास्त साठा घेऊन ठेवतो तितका तो साठा लवकर संपतो कारण त्याचा स्वतःवरील कंट्रोल केव्हाच संपुष्टात आलेला असतो )
दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी १० पर्यंत झोपून होतो ते एकदम जेव्हा आमच्या कॉलेजचे इतर स्पर्धक आले तेव्हाच उठलो . मी आधी फ्रेश होऊन बाहेर पटांगणाच्या कोपऱ्यात जाऊन ब्राऊन शुगरची १ पुडी संपवली आता फक्त एकच उरली होती व अजून किमान दीड दिवस काढायचा होता . समूह गीताची स्पर्धा दुसऱ्या दिवशी ४ ला होणार होती , तोपर्यंत समूहनृत्य , एकांकिका , व्यक्तिगत गायन , वादन , काव्यवाचन अश्या स्पर्धा झाल्या आमच्या कॉलेजची ‘ छत आकाशाचे माझिया घरा ‘ ही विवेक गरुड सरांनी बसवलेली एकांकिका मस्तच झाली व एकांकिकेला व अभिनयाचे बक्षीस रेवती जाधव या मुलीला मिळणार हे निश्चित झाले होते . मग समूह नृत्यात देखील आमच्या कॉलेजचे ‘ जीवाच मैतर ढवळ्या न पवळ्या ला शेतात घेऊन चालर ‘ या गीतावर बसवलेले नृत्य छान झाले , वाद्य वादन स्पर्धेत आमच्या कॉलेजच्या गोविलकर ने सेक्सोफोन वर ‘ ओ ,मिलन ..मौजोसे मौजो का हे चित्रपटातील गीत वाजवून आपले पदक पक्के केले .
इकडे आम्ही सर्व स्पर्धांचा आनंद घेत अधून मधून गांजा ओढत मजा करत होतो . रात्री अगदी मोह आवरेना आवरेना म्हणून मी उरलेल्या एकमात्र पुडीतील थोडीशी ब्राऊन शुगर ओढली मित्रांना आता तुमच्या कडील मला द्या म्हंटले तेव्हा त्यांनी सरळ सांगितले ‘ अरे आम्ही ब्राऊन शुगर घेतलीच नव्हती सोबत , तुला खोटे सांगितले आम्ही की उद्या तुला आम्ही पाजू असे , बापरे ! माझे धाबेच दणाणले म्हणजे आता आपल्याला पुन्हा मागील वेळे सारखा त्रास होणार .. सटाण्यात ब्राऊन शुगर मिळत नाही याची माहिती मला होतीच म्हणजे चांगलाच अडकलो होतो मी बर परत नाशिकला जाऊन ब्राऊन शुगर घेऊन यावे म्हंटले तर जवळ जाण्या येण्याचे पुरेसे पैसे देखील नव्हते . मित्रांचा खूप राग आला पण त्यांना मला इतका त्रास होतो हे मी सांगितले नव्हते म्हणून कदाचित ते असे वागले होते त्यामुळे मनातल्या मनात त्यांना शिव्या घालत मी कसाबसा झोपण्याचा प्रयत्न करत होतो पण जमले नाही सकाळ पर्यन्त मी उरलेली पुडी देखील संपवून टाकली .
( बाकी पुढील भागात )
— तुषार पांडुरंग नातू
Leave a Reply