नवीन लेखन...

तगमग.. दारू.. तमाशा ! (नशायात्रा – भाग ३१)

(कुतुहल, मित्रांचा आग्रह किंवा तात्पुरती मॊजमस्ती उसना आनंद म्हणून आयुष्यात प्रवेश केलेले दारु व इतर मादक पदार्थांचे व्यसन कसे आयुष्य उध्वस्त करते याचा मागोवा या सदरात घेतलेला आहे..)


जवळची ब्राऊन शुगर संपल्यावर माझी चीडचीड वाढली होती , मला ब्राऊन शुगर न मिळाल्याने त्रास होतोय हे मित्रांना सांगणे देखील लज्जास्पद वाटत होते , कारण मग त्यांना समजले असते मी ब्राऊन शुगरच्या आहारी गेलोय ते ( एखाद्या व्यसनीला आपण व्यसनी झालोय हे इतरांजवळ कबुल करायला खूप त्रास होतो , त्याचा अहंकार त्याला हे करू देत नाही ) त्यांनी माझ्याशी खोटे बोल्रून माझ्याजवळचा साठा संपवला होता या बद्दल त्यांचा खूप रागही आला होता . आमची समूहगीत स्पर्धा दुपारी चारला होती तोवर जमल्यास दोन वेळा रिहर्सल घेणे देखील भाग होते आणि माझी अवस्था तर बिघडत चालली होती . इतर स्पर्धा जवळजवळ संपुष्टात आल्या होत्या त्यामुळे बाकीचे स्पर्धक मस्त थट्टा मस्करी करत होते , मी उसने अवसान आणून सर्व काही ठीक असल्याचा देखावा करत होतो . ११ वा एक रिहर्सल घेण्यासाठी समूहातील सगळ्या मुलामुलींना गोळा केले तेव्हा लक्षात आले की एक चंदू नावाचा मुलगा हजर नाहीय ..

जेव्हा चौकशी केली तेव्हा समजले की तो पहाटेच जवळच असलेल्या मालेगावला आपल्या नातलगांना भेटण्यास गेला होता व १२ वा पर्यंत येणार असा निरोप त्याने एकाला दिला होता , मला चंदू चा प्रचंड राग आला कारण मी समूह्गीताचा प्रमुख असल्याने त्याने माझ्या परवानगी शिवाय असे जायला नको होते .एकतर मी टर्कीत होतो त्यामुळे माझा आवाज नीट लागत नव्हता त्यात चंदू ची कमतरता नक्कीच जाणवणार होती , मनातल्या मनात मी धुमसत होतो , रिहर्सल च्या वेळी मी एका मुलीवर ती बाजूच्या दुसऱ्या मुलीकडे पाहून हसली म्हणून ओरडलो , ऐरवी मी मुलींशी शक्यतो मृदू स्वरात बोलत असे , काही चुकले तर न रागावता समज देत असी पण आज असे अचानक मी ओरड्ल्यामुळे तिला एकदम अपमान वाटला व ती रडू लागली , मुलींना असे चार चौघात कोणी मोठ्याने रागावले की त्या त्यांचे ब्रह्मास्त्र बाहेर काढतात, तसेच झाले ती रडू लागली , कसेतरी तिची समजूत काढून एक रिहर्सल पूर्ण केली .१२ वाजून गेले तरी चंदूचा पत्ता नव्हता चंदू आलाच नाही तर या विचाराने मी अधिक अवस्थ होत होतो , मनातल्या मनात त्याला लाखोली वाहत होतो .टर्की सुरु असल्याने मी काहीही खाऊ शकत नव्हतो इतर जण मस्त माझ्यासमोर जेवले ..

.
सर्व दुपार अशीच शारीरिक आणि मानसिक त्रासात गेली दुसरी रिहर्सल घेतलीच नाही मी , कसाबसा तयार होऊन चेहऱ्यावर हसू ठेवत मी वावरत होतो गांजाच्या एकदोन सिगरेट ओढून झाल्या होत्या पण त्रास काही कमी झाला नव्हता ,आता आमच्या स्पर्धेची वेळ जवळ आली होती चंदूचा अजून पत्ता नव्हता शेवटी चंदूच्या ऐवजी मी दुसऱ्या एकाला उभे करायचे ठरवले होते व त्याला जमेल तसा आमच्या आवाजात आवाज मिसळ असे सांगितले एकंदरीत सगळा गोंधळच होता . अगदी आमच्या गाण्याचा नंबर येण्यच्या पाच मिनिटे आधी चंदू घाईघाईने माझ्या जवळ येताना दिसला , मला त्याचा राग आला होता , ‘ सॉरी जरा उशीर झाला ‘ असे लोचटपणे म्हणून बाजूला उभा राहिला , त्याला रागावण्यासाठी देखील वेळ राहिला नव्हता . मग त्याच्यासाहित स्टेज वर गेलो आम्ही .. आधी श्लोक …आणि मग गाणे झाले , आमच्या दृष्टीने गाणे अचूक झाले होते बक्षिसाची अपेक्षा ठेवण्यास हरकत नव्हती नशीब असे की माझाही आवाज नीट लागला एकदाही कोरडा खोकला आला नाही हे विशेष …

सायंकाळी ७ ला पारितोषिके जाहीर झाली आणि वाटप देखील सुरु झाले , आमच्या गाण्याचा नंबर नव्हता लागला . म्हणजे चक्क पराभव होता हा माझा गेले २ महिने मी या गाण्याच्या मागे लागलो होतो . माझा चेहरा पडला होता मला इतर मुले समजावीत होती . पारितोषिक वितरण संपेपर्यंत रात्रीचे ९ वाजून गेले , जवळच्या गावातील मुले आपापल्या गावी जायला निघाली होती , जे दूरच्या गावातील होते अश्या आठदहा कॉलेजची मुले थांबली होती रात्री मुक्काम करून सकाळी जावे असे आमच्या जी .एस ने जाहीर केले , खरेतर मला केव्हा एकदाचा नाशिकला जाऊन गर्द ओढतो असे झाले होते पण सर्वांबरोबर थांबणे भाग होते . मग क्वचित दारू पिणारी मुले गावात निघाली पार्टी करायला, मी आणि आमचे मित्र देखील निघालो कशीतरी रात्र काढायची होती मला . बार मध्ये प्रत्येक जण आपल्या जवळच्या पैशांनी पिणार होता , आम्ही मित्रांनी आधीच सर्व मजा करून जवळचे बहुतेक पैसे संपवले होते त्यामुळे आमच्या जवळ जेमतेम पैसे होते जुळवाजुळव करून आम्ही एक क्वार्टर मागवली पण आमच्या सारख्या सराईत लोकांना पाच जणांत एक क्वार्टर म्हणजे ‘ बहोत ना इंसाफी ” होती . ती क्वार्टर संपवल्यावर आम्ही पुन्हा एकमेकांचा तोंडाकडे पाहू लागलो ..

आता सर्वांच्या जवळ जाण्याच्या भाड्याचे पैसे उरले होते ते खर्च केले असते तर परत जायचे वांधे होणार होते , त्यातील काही पैसे खर्च करू आपण आणि कमी पडणारे कोणाकडून तरी उसने घेऊ असे ठरले , पण कोण उसने देणार ? आमचा जी. एस . होताच उसने पैसे द्यायला हे गृहीत धरले आम्ही पण आता इंग्लिश दारू पिणे परवडणार नव्हते म्हणून देशी दारूचे दुकान शोधत गावात फिरू लागलो रात्रीचे ११ वाजून गेले होते त्यामुळे गावातील दुकाने बंद होती थंडीचे दिवस असल्याने वर्दळ ही नव्हती अजिबात एकाने नदीच्या पलीकडे एक हातभट्टीचा अड्डा उघडा असेल असे सांगितले म्हणून शोधत शोधत निघालो गावाबाहेर अंधारात चाचपडत ती कोरडी नदी आम्ही पार केली पलीकडे शेतात एक लाकडी टपरी होती आत कंदील सुरु होता आम्ही टपरी चे दार वाजवून आतल्या माणसाला उठवले तो देखील प्यायलेलाच होता अंगावर जाड कांबळे , मफलर बांधून होता . त्याच्याकडून एक खंबा घातला देशीचा २० रुपयात ..

इतक्यात एकाच्या मनात आयडिया आली याला जर बोलण्यात गुंगवून ठेवला तर अजून एक बाटली लांबवता आली असती . झाले नजरेने इशारे झाले आणि आम्ही चार जण त्या माणसाची चौकशी करू लागलो त्याला बोलण्यात गुंतवले आणि एकाने कोपर्यात भरून ठेवलेल्या बाटल्यापैकी एक बाटली लांबवली मग यथेच्छ दारू पिऊन आम्ही होस्टेलवर यायला निघालो , आता माझी बडबड सुरु झाली होती दिवसभराचा सगळा राग , संताप निघत होता . कॉलेजजवळ आलो तर आमच्या कॉलेजची मुले मुली बाहेर मैदानात बसून गाण्याच्या भेंड्या वगैरे खेळत होती आमच्या आरडाओरडा दुरुनच एकून त्यांना काय ते समजले , मी तेथे पोचताच चंदूच्या नावाने शिव्या घालायला सुरवात केली ‘ आज त्याच्या मुळे आपले गाणे लागले नाही असा आरोप करू लागलो तो बिचारा कुठे तरी झोपला होता , ‘ आज साले को खल्लास करूंगा म्हणत मी सगळ्या खोल्यांमध्ये चंदू ला शोधू लागलो , कोणीतरी त्याला ही बातमी देऊन फरार व्हायला सांगितले आणि तो निघूनही गेला तरी माझा आरडाओरडा सुरु होता , आमच्या कॉलेजच्या मुलीनी माझे हे रूप प्रथमच पाहिलेले होते त्यामुळे त्या भेदरल्या होत्या . निवृत्ती अरिंगळे मला रागावला पण मला कसलीच शुध्द नव्हती , माझ्या बरोबरचे मित्र मला जबरदस्ती झोपवत होते पण राहून राहून मी चंदुला शिव्या घालत उठून वर्गाच्या बाहेर येत होतो . सुमारे पहाटे ४ पर्यंत माझा हा तमाशा चालला होता…

( बाकी पुढील भागात )

— तुषार पांडुरंग नातू

तुषार पांडुरंग नातू
About तुषार पांडुरंग नातू 93 Articles
मी नागपुर येथे मैत्री व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी समुपदेशक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत असुन फेसबुकवर देखिल व्यसनमुक्तीपर लेखन करतो व्यसनमुक्ती या विषयावर माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यातले एक पुस्तक माझे स्वतचे आत्मकथन आहे . व्यसनमुक्ती व भावनिक संतुलन, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच सामाजिक समस्यांवर प्रबोधनपर लिखाण करतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..