(कुतुहल, मित्रांचा आग्रह किंवा तात्पुरती मॊजमस्ती उसना आनंद म्हणून आयुष्यात प्रवेश केलेले दारु व इतर मादक पदार्थांचे व्यसन कसे आयुष्य उध्वस्त करते याचा मागोवा या सदरात घेतलेला आहे..)
मी गांजा , दारू आणि गर्द च्या विळख्यात चांगलाच फसलो होतो , दिवसभरात नशे साठी मला किमान त्यावेळी २० रु , तरी लागतच असत , मी जे द्राक्ष पेट्यांचे हमाली काम करायला जात होते ते काम जेमतेम सिझन मध्ये चार महिने मिळत असे बाकी दिवस मी घरातून काहीतरी खोटीनाटी कारणे सांगून पैसे नेत असे , वडील जरी मला जास्त पैसे देत नसत तरी मी आईला बरोबर वशिला लावून पैसे उकळत असे तिच्या कडून , ती घरातच शिवणकाम करे त्याचे पैसे असत तिच्याकडे , कॉलेजला जाणारा मुलगा आहे तेव्हा असतात खर्च वगैरे असे तिला वाटे , माझ्या व्यसनाची माहिती मिळाली होती पण मी त्यांना लोक उगाच काहीतरी सांगतात असे म्हणून ते उडवून लावत असे , किवा तिला माहित जरी असले व्यसनाबद्दल तरी मी पैश्यांसाठी इतका हट्ट करीत होतो की नाईलाजाने घरात कटकट नको या विचाराने तिने अनेक वेळा मला पैसे दिले होते ..
भाऊ जेव्हा पुण्याहून इंजिनिरिंग चे शिक्षण घेऊन परत आला तेव्हापासून माझे जरा वांधेच झाले होते कारण तो सतत माझ्या हालचालींवर लक्ष ठेवून असे जरी तो मला प्रत्यक्ष अडवू शकत नव्हता तरी माझे काम सोपे पणाने देखील होऊ देत नव्हता . माझे इतर तीन चार मित्र देखील हळू हळू माझ्या सारखेच गांजा आणि गर्द च्या विळख्यात अडकले होते , जसे जसे व्यसनाचे प्रमाण वाढू लागले तसे तसे आमचे जग लहान होते गेले म्हणजे फक्त कॉलेज ला जेमतेम तोंड दाखवण्यासाठी , मग अड्डयावर आणि तेथून घरी असा दिनक्रम ठरला होता .
जेव्हा मी आमच्या विष्णू नगर मधील अय्युब या गुंडाला धडा शिकवला होता तेव्हाच काही दिवसातच सिन्नर फाटा येथे ‘ शिवसेना ‘ शाखा सुरु करण्यात आली होती आणि माझी त्या शाखेचा सेक्रेटरी म्हणून निवड करण्यात आली होती , सिन्नर फाटा येथे एक शिवसेनेचा वार्ता फलक होता , त्यावर आठवड्यातून एकदोन वेळा काहीतरी बातमी , किवा सुविचार लिहिण्याचे काम माझ्याकडे होते . त्याच दरम्यान नाशिक मध्ये ‘ ‘मराठा महासंघ ‘ या नवीन संघटनेची देखील स्थापना झाली होती , शिवसेनेचेच लोक सुरवातीला त्यात सामील झाले होते , माझा एक मित्र मराठा महासंघाचा पदाधिकारी होता , तर दुसरा एक मित्र दलित पँथर चा , मग कॉंग्रेस , स्थानिक बहुजन युवा संघटना ,हिंदू एकता , अश्या सगळ्या सामाजिक आणि राजकीय पक्ष संघटनांमध्ये माझा वावर होता ते देखील हळू हळू कमी कमी होत चालले होते . फक्त बाहेर माझी ‘ ‘डेंजर बामण ‘ अशी ओळख मात्र कायम होती त्यामुळे कोणी माझ्या नादाला लागत नसत . कदाचित माझ्या व्यसनांबद्दल देखील बाहेर माहित असावे तरी कोणी त्याविषयी ‘ हा ज्याचा त्याचा खाजगी मामला ‘ , म्हणून बोलत नसत पण मला वाटे कोणाला काही माहित नाही ..
एकदा असेच सायंकाळी आम्ही दुर्गा गार्डन मध्ये नशा करत बसलो असताना बाहेर च्या रस्त्यावर जरा गोंधळ वाटला अनेक तरुण घोळक्याने रस्त्यावर जमले होते , आमच्या लक्षात आले की दुपारीच त्यावेळच्या विद्यमान पंतप्रधान ‘ इंदिरा गांधी ‘ यांच्यावर त्यांच्या सुरक्षा रक्षकांनीच गोळ्या घातल्याची बातमी रेडिओवर प्रसारित झाली होती , तसेच स्थनिक सायंदैनिक ‘भ्रमर ‘ मध्ये देखील ही बातमी आली होती , त्या आहेत की गेल्या हे नीट स्पष्ट नव्हते पण एकदाचे त्या गेल्या हे कळले आणि त्याच्या शीख सुरक्षा रक्षकांनी गोळ्या घातल्या म्हणून लोक शीख समुदायावर नाराज होते , आवाज आणि गोंधळ वाढला तेव्हा आम्ही देखील मग त्यात सामील झालो. हळू हळू सुमारे ३०० ते ४०० तरुणांचा जमाव जमला होता , सगळे संतापात होते , त्यात फक्त युवक कॉंग्रेसचेच नव्हे तर इतरही संघटनांचे लोक सामील होते त्या घटने बद्दल चा संताप व्यक्त करण्यासाठी लोक आतुर झाले होते..
प्रत्येक माणूस आपल्या व्यक्तिगत , घरगुती , आर्थिक किवा इतर कोणत्यातरी अडचणीने ग्रस्त असतोच व तो आतल्या आत धुमसत असतो व जेव्हा असे काहीतरी कारण मिळते तेव्हा अशी धुमसणारी माणसे एकत्र येतात आणि विध्वंस हा ठरलेलाच असतो .अशा वेळी त्या विशिष्ट व्यक्ती वरील निष्ठे पेक्षा आपल्या मनातील अंगार कोठेतरी बाहेर काढावा ही भावना त्यामागे जास्त असते , त्यावेळी नाशिक रोड येथे ‘ बग्गा ‘ कुटुंबियांची एक इमारत मुक्तिधामच्या समोर होती या घरातील दोन ‘ बग्गा ‘ बंधू जुळे होते आणि ते आमच्या सोबत कॉलेजला शिकत असत तसे ते अगदी सोशल होते सर्वांशी मैत्री होती त्यांची कोणत्याही राजकारणात नव्हते फक्त त्या पैकी एक जरा बिनधास्त प्रवृत्तीचा होता म्हणजे मारामारी वगैरे मध्ये असणारा.. .
तर कोणी तरी गर्दीत ‘ सब सरदार ऐसेही है ‘ असे म्हणाले आणि लगेच गलका झाला आणि तावातावाने मंडळी बग्गा यांच्या घराकडे निघाली , काही लोकांच्या हातात काठ्या होत्या , काहींच्या हातात दगड , तावातावाने घोषणा देत जमाव निघाला ..एव्हाना रात्री चे ८ वाजून गेले होते ..
पोलीस सतर्क होते , रस्त्यावर सगळीकडे सामसूम झालेली होती गलका करत आम्ही बग्गा यांच्या इमारती जवळ पोचलो त्या इमारतीत सगळे बग्गा कुटुंबीयच राहत होते , इमारतीजवळ गेलो तर एकदम अंधार पसरलेला होता खालचे एक हॉटेल , आणि इतर दुकाने देखील बंद केली गेली होती इमारतीत देखील सगळीकडे अंधार होता , जमाव इमारती समोर थांबून घोषणा देवू लागला आता काहीतरी भयंकर घडणार याची मला खात्री होती , इमारतीत अंधार असल्याने नेमकी सुरवात कशी करावी या बाबतीत जमावाच्या समोरच्या फळीचे एकमत होत नव्हते , कोणीतरी एकदोन दगड इमारतीवर भिरकावले आणि अचानक इमारतीच्या गच्चीवरून सोडावॉटच्या रिकाम्या आणि भरलेल्या देखील बाटल्यांचा वर्षाव सुरु झाला , अंधारामुळे बाटल्या कोण आणि नेमक्या कोठून फेकत आहे हे समजायला मार्ग नव्हता , हे सगळे इतके अचानक घडले की असे काही होईल याचा कोणाला अंदाज नव्हता , बग्गा कुटुंबीय असे आक्रमक होतील असे वाटले नव्हते कोणालाच त्यामुळे बाटल्या रस्त्यावर येऊन फुटू लागताच जमावाचे धैर्य खचले एकदम पळापळ सुरु झाली मिळेल त्या दिशेला लोकांना वाट फुटली . आम्ही देखील पुन्हा दुर्गा गार्डन कडे पळालो .
(बाकी पुढील भागात )
— तुषार पांडुरंग नातू
Leave a Reply