(कुतुहल, मित्रांचा आग्रह किंवा तात्पुरती मॊजमस्ती उसना आनंद म्हणून आयुष्यात प्रवेश केलेले दारु व इतर मादक पदार्थांचे व्यसन कसे आयुष्य उध्वस्त करते याचा मागोवा या सदरात घेतलेला आहे..)
गर्द आणि इतर व्यसनांच्या मी पूर्ण आहारी गेलो होतो व आता माझी घरातील पैश्यांची मागणी वाढली होती , ती प्रत्येक वेळी पूर्ण होणे शक्यच नव्हते तेव्हा मग घरात छोट्या मोठ्या चोऱ्या सुरु झाल्या वडील पक्षाघातातून बरे होऊन आले होते आणि पुन्हा त्यांनी कामावर जाणे सुरु केले होते मात्र ते जरा विसरभोळे झाले होते त्याचा फायदा घेऊन मी त्यांच्या पाकिटातून पैसे गुपचूप काढत असे , त्यांच्या जरा लक्षात आल्यासारखे होई पण मी तुम्हीच कोठेतरी ठेवले असतील , खर्च केले असतील , हल्ली तुम्हाला आठवत नाही नीट, असे समर्थन देऊन त्यांना गप्प करीत असे अर्थात त्यांचे समाधान होत नसे तरी देखील त्यांचा नाईलाज होता , मग त्यांनी पाकीट लपवून ठेवण्यास सुरवात केली किवा पाकिटात अगदी मोजके पैसे ठेवत..
.एकदा तर मी रात्री हळूच ते झोपले असताना त्यांच्या गळ्यातील जानवे ब्लेडने कापून त्यातील कपाटाच्या लॉकरची चावी काढून रात्रीच सगळे झोपले असताना कपाट उघडून पैसे काढले होते व चावी परत तशीच त्यांच्या जवळ ठेवली होती , त्यांना सकाळी उठल्यावर झोपेत जानवे कसे काय तुटले याचे आश्चर्य वाटले होते व काहीतरी गडबड आहे हे देखील ध्यानात आले होते त्यांच्या आणि मी मात्र संभावित होऊन वावरत होतो .( माझी जरी देव धर्मावर श्रद्धा नव्हती तरी त्यांना जानवे असे तुटल्याने किती मानसिक त्रास झाला असावा याची आज कल्पना येते आहे )
मोठा भाऊ अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून नाशिक येथेच पाटबंधारे खात्यात नोकरीस होता मग मी त्याच्या पाकिटाकडे मोर्चा वळविला पण तो माझ्या बाबतीत आधीच सावध असे त्यामूळे मी पैसे काढलेले त्याला लगेच कळत व तो आरडा ओरडा करे पण मी चोराच्या उलट्या बोंबा या नात्याने त्याच्याशी भांडत असे व घरात उगाच कटकट होते म्हणून तो बिचारा माघार घेई …
वडील आणि भाऊ कामावर गेल्यावर मी आईच्या मागे काहीतरी भुणभुण लावून पैसे उकळत असे तिच्याकडून, तिच्या शिवणकामाचे आलेले सगळे पैसे मी उडवून टाकत होतो वर घरखर्चासाठी भावाने आणि वडिलांनी दिलेले पैसे देखील काढत होतो तिच्या कडून मग त्यांनी तिला पैश्यांचा हिशेब मागितला की ती काहीतरी खोटी कारणे सांगून वेळ मारून नेत असे एकदा ती अगतिक होऊन मला म्हणाली होती ” तुषार .. मी आयुष्यात कधी खोटे बोलले नाही कोणाशी पण तुझ्या अश्या वागण्यामुळे मला प्रत्यक्ष घरातील लोकांशीच खोटे बोलावे लागत आहे ” . मला मात्र कशाचेच सोयरसुतक राहिलेले नव्हते .
त्यातल्या त्यात रविवार हा दिवस माझ्यासाठी जास्त घातक असे कारण त्यादिवशी भाऊ आणि वडील दोघेही घरी असत व आईकडे पैसे मागायला काही मौका मिळत नसे मी जरा आईच्या मागे मागे केले की भाऊ लगेच आईला विचारी ‘ काय म्हणतोय ग हा ? ‘ आई त्याला मी पैसे मागतोय हे सांगत नसे कारण तिला घरात भांडणे नको असायची . एकदा असाच रविवार होता भाऊ आणि वडील दोघेही घरात असताना मी आईला हळूच पैसे मागितले ते भावाने ऐकले आणि त्याने स्पष्ट सांगितले की आई तू याला एकही पैसा द्यायचा नाहीस या पुढे , हा बाहेर काय काय धंदे करतो ते सगळे मला समजले आहे हा दारू आणि ड्रग्स च्या आहारी गेलाय याला या पुढे एकही पैसा त्यायचा नाही कोणीही..
भावाला बहुतेक गल्लीतल्या मुलांनी माझ्या बद्दल माहिती दिली असावी कारण त्याचीही सिन्नर फाटा आणि स्टेशन वाडीतील मुलांशी माझ्या इतकी घसट नसली तरी तोंडओळख होतीच . त्याने मला आज काहीही झाले तरी पैसे द्यायचे नाहीत अशी सक्त ताकीद देऊन ठेवली घरात व तसे झालेले त्याला कळले तर तो घर सोडून निघून जाइल ही धमकी दिली , आई वडील बिचारे घाबरले आणि आता भावाने सगळे सांगितलेच आहे म्हंटल्यावर मी निर्लज्ज होऊन ‘ ब्राऊन शुगर घेतली नाही तर मला खूप त्रास होतो व मला कसेही करून पैसे हवेतच असा हट्ट सुरु केला ‘ , मात्र भाऊ असा बधण्यासारखा नव्हताच तो म्हणाला ‘ तुला काय त्रास होईल तो होऊ दे आम्ही तुला दवाखान्यात नेऊ पण पैसे देणार नाही ‘ तो तसा शब्दाचा अगदी पक्का आहे .नाही म्हणजे नाहीच असते त्याचे . तो त्या दिवशी रविवार असल्याने कामावर देखील जाणार नव्हता व माझ्यावर पहारा ठेवणार होता मला घरातील कोणीही पैसे देऊ नये म्हणून . त्याच वेळी उन्हाळ्याची सुट्टी असल्याने माझी मोठी बहिण तिच्या मुलांसहित माहेरी आलेली होती तिलाही त्याने मला पैसे देऊ नयेत अशी ताकीद दिली . माझा अगदीच नाईलाज झाला म्हणून मग शेवटी मी तसाच घराबाहेर पडलो बाहेर मित्रांकडून तात्पुरती नशा मिळवली पण नेहमीच असे कोणी कोणाला नशा देत नाही कारण प्रत्येक व्यसनी कंगालच असतो नेहमी , दुपार कशीतरी काढली संध्याकाळी भाऊ बाहेर जाईल फिरायला तेव्हा पैसे मिळतील आईकडून या आशेवर पण त्या दिवशी त्याने जणू प्रणच केला होता मला पैसे न मिळू देण्याचा ..
भाऊ संध्याकाळी देखील घरातच बसून राहिला तेव्हा मी पुन्हा कटकट सुरु केली आता जरा आक्रमक व्हावे लागेल असे मी मनाशी ठरवले होते , मग मी एखादा व्यसनी आपल्या व्यसनांना जसा कुटुंबियांना जवाबदार धरतो तसे त्यांच्यावर आरोप करणे सुरु केले ‘ तुम्हाला माझ्या भावनांची पर्वा नाही , माणसापेक्षा तुम्हाला पैसा जास्त महत्वाचा आहे , लहानपणापासून माझ्यावर कसे तुम्ही अन्याय केलेत अशी बडबड करू लागलो , मोठ्या भावाला उद्देशून ‘ लोक भावासाठी प्राण देतात , भावासाठी काहीही करतात आणि तू साधे १०० रुपये देऊ शकत नाहीस ? ‘ इतका मोठा इंजिनिअर झालास पण स्वतच्या भावाच्या कामी येऊ शकत नाहीस ? , तू माझ्यावर जळतो म्हणूनच मला त्रास देतोस, मी गर्द न मिळाल्या मुळे होणाऱ्या त्रासाने मरून जावे हीच तुझी इच्छा आहे , तू खूप स्वार्थी आहेस ” वगैरे म्हणू लागलो आणि मग शेवटचे अस्त्र काढले की आता मी ब्लेड ने गळा कापून आत्महत्याच करतो असे म्हणून मी एक नवी कोरी ब्लेड काढली यावर भाऊ म्हणाला ‘ ही सगळी तुझी नाटके आहेत आम्ही घाबरणार नाहीय याला , तुला मरायचे असेल तर बाहेर जाऊन रेल्वेखाली डोके ठेव ‘.
अर्थात मला मारायचे नव्हतेच मुळी फक्त त्यांना घाबरवायचे होते ( व्यसनी व्यक्तीच्या अश्या वागण्याला मांनासशास्त्रीय भाषेत इमोशनल ब्लेकमेलिंग असे म्हणतात , या प्रकारात तो घर सोडून जाण्याच्या , आत्महत्येच्या , बायकोला घटस्फोट देण्याच्या वगैरे धमक्या देतो ) त्यासाठी घरातच त्यांच्या समोर नाटक करणे भाग होते मग मी एक कागद घेऊन सुईसाईड नोट लिहिण्यास सुरवात केली त्यात अगदी उद्दात पणाचा आव आणून ‘ मी ब्राऊन शुगरच्या व्यसनाच्या आहारी गेल्याने जीवनाला कंटाळलो आहे आणि त्यामूळे आत्महत्या करीत आहे , मरणानंतर माझे डोळे व किडनी नसेच इतर उपयुक्त अवयव गरजू लोकांना दान करण्यात यावे अशी माझी अंतिम इच्छा आहे व माझ्या मरणास कोणीही जवाबदार नाही ‘ अशी चिट्ठी लिहून मुद्दाम सगळ्यांना वाचून दाखवली .
( बाकी पुढील भागात )
— तुषार पांडुरंग नातू
Leave a Reply