अगदी सुइसाइड नोट वगैरे लिहून मी आत्महत्येचा ड्रामा सुरु केला . ब्लेडने हाताची शीर कापून घेतो म्हणून उजव्या हाताच्या मनगटावर ब्लेड ने हळूच कापण्यास सुरवात केली , आता आईचा धीर सुटला व ती रडू लागली , ते पाहून , बहिण आणि तिची मुले देखील घाबरून रडू लागली तेव्हा भावाने त्यांना सांगितले ‘ तुम्ही सरळ शेजारी निघून जा मी पाहतो काय होईल ते ‘ , माझा जीवघेणा हट्ट आणि भावाची ठाम भूमिका या मध्ये त्यांना काय करावे ते समजत नव्हते आई भावाला म्हणाली ‘ जाऊ दे , देऊन टाक त्याला पैसे , उगाच सगळ्यांना तमाशा नको ‘ , ( व्यसनी मंडळींच्या घरचे लोक , आजूबाजूचे लोक काय म्हणतील ? उगाच आपल्या घरातील गोष्टी लोकांना कळतील , आपली अब्रू चव्हाट्यावर येईल या चिंतेत असतात व खास करून महिला वर्ग या बाबतीत जास्त संवेदनशील असतो , हे व्यसनीला चांगल्या प्रकारे माहित असते म्हणूनच तर त्याचे म्हणणे निमुटपणे मानले जाते किवा त्याला हवे ते मिळत जाते ) पण भाऊ ऐकत नव्हता ..
बिचारे सगळे रडके चेहरे करून माझ्याकडे पाहत होते ,मात्र मी जणू दगड बनलो होतो त्यांच्या भावनांची मला अजिबात पर्वा राहिली नव्हती कसेही करून नशेसाठी पैसे मिळालेच पाहिजे हा माझा अट्टाहास . रक्ताची एक लाल रेघ मनगटातून बाहेर पडली तशी आईचे हुंदके वाढले कितीही ठरवले तरी तिला रडू आवरत नव्हते , प्रकरणाची गंभीरता अजून वाढावी म्हणून मग मी हाताच्या ऐवजी गळ्याची शीर कापून घेतो म्हणजे लवकर मरेन असे म्हणत मग ब्लेड गळ्याकडे नेली व हळूच कंठमणी असतो तेथे ब्लेड जरा दाबून फिरवली , पुन्हा एक लाल रेघ उमटली, मनगटाची शीर कापताना नेमके किती कापले जातेय हे मी पाहू शकत होतो मात्र गळ्याच्या बाबतीत तसे नव्हते माझ्या डोळ्यांनी मला माझा गळा किती कापला जातोय हे नेमके कळू शकले नसते व कदाचित चुकून जास्तच कापले गेले तर … प्रकरण अंगाशी येणार या विचाराने मग मी घरातील छोटा आरसा घेतला व त्यात पाहून हळू हळू गळ्यावर ब्लेड फिरवू लागलो .
भाऊ अजिबात ऐकायला तयार नव्हता आणि मी तर पैसे मिळाल्याशिवाय माघार घेणार नव्हतोच , जरा जास्त रक्त येऊ लागले तसे आई , बहिण व तिची मुले शेजारी निघून गेले , आता ज्यांना घाबरावायचे होते त्यातील नेमके लोक निघून गेलेले त्यामूळे माझी जरा गोची झाली , घरात फक्त वडील , भाऊ आणि हट्टाला पेटलेला मी असे तिघेच उरलो , घाबरणारा प्रेक्षकवर्ग कमी झाल्याने माझे अवसान कमी झाले होते तरी मी नेटाने थोडी जास्त रिस्क घेऊन आरश्यात पाहून गळ्यावर ब्लेड फिरवू लागलो तसे जास्त रक्त येऊ लागले , आता वडील ही चप्पल घालून बाहेर पडले घरात फक्त मी व भाऊ उरलो मला पुढे काय करावे ते समजेना रक्ताची एक धार माझ्या गळयावरून ओघळत छातीवर आली बनियान रक्ताने लाल होऊ लागले , मग मी खूप शक्तिपात झाल्या सारखा डोळे मिटून मान वर करून भिंतीला टेकून बसलो आता भाऊ घाबरला असावा तो देखील उठला आणि चप्पल घालून घरातून बाहेर पडला ..
मला नेमके काय होतेय ते कळेना सगळे जण निघून गेलेले, बाहेर जाताना भावाने दाराला बाहेरून कडी लावल्याचा आवाज आला तसा मी भानावर आलो हे काय भलतेच हा बाहेरून कडी लावून का गेला असावा ? या विचारात पडलो आता घरात फक्त मी एकटाच उरलेला , नाटक सुरु ठेवण्यात काहीच अर्थ नव्हता भाऊ बाहेरून कडी लावून गेलेला होता , मी मागच्या खोलीत जाऊन पहिले तर तिथेही बाहेर अंगणाकडे जाणाऱ्या दाराला कुलूप लावलेले दिसले म्हणजे मला मागच्या दराने बाहेर पडणे देखील शक्य नव्हते एकंदरीत मला घरात अडकवून ठेवण्यात आले होते प्रकरण अंगाशी आल्यासारखे झाले होते बराच वेळ तसाच विमनस्क अवस्थेत मी भिंतीला टेकून डोळे मिटून बसून राहिलो आता गळ्याची जखम ठसठसत होती व थोडे थोडे रक्तही येतच होते , ब्राऊन शुगर ची ‘ टर्की ‘ सुरु झालेली , त्यामूळे खूप अवस्थता आलेली ..
तितक्यात बाहेर एका गाडीचा आवाज आला व दोन चार माणसांचे मोठ्याने बोलण्याचे आवाज आले , मग आमच्या पायरीवर बुटांचे आवाज आणि बाहेरून लावलेली दाराची कडी काढली गेली व आत चारपाच पोलीस आणि माझा भाऊ शिरला . म्हणजे डाव माझ्या अंगाशी आला होता तर , पोलिसांनी आधी मला धरले उठवून उभे केले त्यातील एक बहुधा मला ओळखत असावा तो उद्गारला ‘ अरे हा तर इथल्या शिवसेना शाखेचा सेक्रेटरी आहे ‘ मग जखम पाहून म्हणाला ‘ जास्त नाहीय फारसे , चला याला गाडीत घ्या ‘ म्हणत मला ओढून बाहेर आणले गेले , प्रतिकार करणे व्यर्थ होते कारण घरचे लोक नव्हते ते तर पोलीस होते . बाहेर पोलिसांची मोठी निळी गाडी ( डग्गा ) थांबलेली आणि त्या भोवती गर्दी जमलेली होती मला गाडीत बसवले गेले भावाला देखील त्यांनी आत बसायला सांगितले आणि गाडी निघाली , हे भलतेच झाले होते आता पैसे मिळणार नव्हतेच उलट कोठडीत जाण्याची वेळ आली होती ….
भाऊ माझ्या समोरच बसला होता मी त्याच्या कडे खुन्नस ने पाहू लागलो तशी त्याने मान फिरवून घेतली . नाशिक रोड पोलीस स्टेशनला गाडी पोचली आणि मला खाली उतरवून पोलीस निरीक्षकांच्या खोलीत नेण्यात आले भाऊ देखील होताच मागेमागे , आता मला त्या साहेबांचे नाव आठवत नाहीय बहुतेक चांदगुडे असावे , भाऊ त्यांना थोडक्यात माहिती सांगत होता आणि ते खेदाने मान हलवत होते , मग मला म्हणाले ‘ काय रे तू इतका चांगल्या घरचा मुलगा आणि अशी नाटके करतोस होय रे ? मी लगेच रडण्याचा पवित्रा घेतला तसे त्यांचा आवाज जरा खाली आला , मग म्हणाले ‘ रडू नकोस तुला मारत नाहीय कोणी , त्यांनी शिपायांना माझी झडती घ्यायला सांगितली , शिपायानी झडती घेऊन मी लिहिलेली सुईसाईड नोट बाहेर काढली आणि साहेबांच्या हाती दिली ती साहेबानी वाचली आणि म्हणाले ” अरे शहाण्या तू मेल्यानंतर ,डोळे , किडनी दान करायला निघाला आहेस , पण देवाने जे तुला दिलेय ते आधी तू स्वतच नीट वापर की ” आणि हसले व मला समजावू लागले ‘ ” या व्यसनांच्या नादी लागू नकोस या पुढे , सगळे धंदे सोडून चांगला आभ्यास कर आणि नाव कमाव , उगाच स्वतचे आणि कुटंबातील लोकांचे नुकसान करू नकोस ” मी निमुटपणे मान हलवली ..
भावाकडे पाहून म्हणाले ” अहो याच्यावर आत्महत्येची केस दाखल केली तर याचे पुढे खूप नुकसान होईल , त्या ऐवजी आता मी याला सोडतो ताकीद देऊन मग पाहू काही केले तर , याला आधी एखाद्या दवाखान्यात न्या ” आणि त्यांनी आम्हाला जायला सांगितले , बाहेर आलो आम्ही दोघेही एकमेकांशी न बोलता निमूट पणे चालू लागलो भावाने विचारले ‘ दवाखान्यात चालतोस का ? ” या वर मी फक्त नकारार्थी मान हलवली . पोलीस स्टेशन पासून जरा दूर सुरक्षित अंतरावर आल्यावर भावाला म्हणालो दवाखान्यात पैसे खर्च करण्यापेक्षा मला दे पन्नास रुपये , आता मी १०० वरून ५० वर आलो होतो , तर भाऊ लगेच म्हणाला ‘ परत जाऊ का मी पोलीस स्टेशनला ? ‘ म्हणजे पुन्हा मीच अडकणार होतो म्हणून मग चूप राहिलो .
( बाकी पुढील भागात )
— तुषार पांडुरंग नातू
Leave a Reply