भावाने पुन्हा पोलीस स्टेशनला जाऊ का ? अशी धमकी दिल्यावर की गुपचूप त्याच्यासोबत चालू लागलो होतो खरा, पण आता पैसे कसे मिळवावेत याबद्दल डोक्यात किडा वळवतच होता . घराबाहेर रस्त्यावर असल्याने आता मी पुन्हा पैसे मागितले तर भाऊ तसाच मागे वळून पोलीस स्टेशनला जाणार यात शंकाच नव्हती ,आणि त्याला रस्त्यावर अडवणे म्हणजे गर्दी जमा करणे होते , नुकतेच मला साहेबांनी समज देऊन सोडले होते व परत लगेच त्याने जाऊन माझी तक्रार केली असती तर मला रात्रभर कोठडीत रहावे लागणार यात वादच नव्हता , मग मी असा विचार केला की आता आधी घरी जाऊ व मग एकदा घरी गेली की पुन्हा पैसे मागू या वेळी भावाला काही पोलिसांकडे जाऊ द्यायचे नाही तर अडवून ठेवायचे मग मारामारी झाली तरी हरकत नाही पण कसेही करून पैसे मिळवलेच पाहिजेत , सायंकाळपासून जे मरण्याचे नाटक सुरु केले होते त्या नादात ‘ टर्की ‘ फारशी जाणवली नव्हती , पण आता परत त्रास सुरु झाला होता …
घरी पोचल्या बरोबर मी आधी दाराला आतून कडी लावून घेतली आणि दाराजवळच ठाण मांडून बसलो आणि भावाला म्हणालो ‘ तू फक्त शंभर रुपयांसाठी घरापर्यंत पोलीस आणलेस , सगळीकडे माझी बदनामी झाली , आता सगळ्यांना मी व्यसनी आहे हे माहित पडले असेल , तुलाही हेच हवे होते ना ? पण आता तरी पैसे दे , ‘ भावाला हे अनपेक्षित होते त्याला वाटले होते पोलसांनी दम दिल्यावर आता हा शांत बसेल . आता तो बाहेर पुन्हा पोलीस स्टेशनला जाऊ शकत नव्हता कारण मी सावध होतो आणि दारापाशीच ठाण मांडून बसलो होतो , जर त्याने मागील दाराने जाण्याचा प्रयत्न केला असता तरी मी त्याला पकडून अडवले असते , आणि मी किती खुनशी आहे हे त्याला चांगले ठाऊक होते ..
एकदा लहानपणी आभ्यास करताना असेच काहीतरी कारणावरून माझे आणि त्याचे भांडण झाले होते तेव्हा तो मला एक फटका मारून पळत असतांना मी हातात असलेले कर्कटक ( ज्याला दोन्ही बाजूनी टोके असतात ) त्याला पाठीवर फेकून मारले होते आणि ते त्याच्या पाठीत रुतून बसले होते , तसेच माझ्या बाहेरच्या मुलांसोबत झालेल्या मारामा-यांच्या वेळी भवरे खेळताना एकाच्या डोक्यात भव-याची आरी ( पुढील अणुकुचीदार टोक ) मारून त्याला रक्तबंबाळ केले होते , तर एकदा विटीदांडू खेळताना दांडूने एकाचे डोके फोडले होते, त्यामूळे भाऊ माझ्याशी झटपट करणे अशक्य होते . सुमारे रात्रीचे साडेबारा वाजले होते आणि पुन्हा घरात माझही कटकट सुरु झालेली अनेक प्रकारचे आरोप आणि पैसे मागणे चालूच होते सगळी मंडळी त्रासून गेली होती , बहिण म्हणाली मी ‘ चार दिवस माहेरी आले तर तू काही मला सुखाने इथे राहू देत नाहीस , मी जाते उद्याच परत ” तरी माझा भाचा आणि भाची बिचारी लहान असल्याने घाबरून नुसतीच सगळ्यांच्या तोंडाकडे टकामका पाहत होती व जरा आमचे आवाज वाढताच रडत होती..
इतक्यात पुढचे दार बाहेरून कोणीतरी वाजवले , मी खूप घाबरलो , इतक्या रात्री कोण म्हणून , पण पुढे होऊन दार उघडण्याची हिम्मत नव्हती माझी , पुन्हा पोलीस आलेत की काय ही शंका होती , वडील पुढे झाले आणि त्यांनी दार उघडले तर दारात माझा मित्र उभा होता ( हा माझा लहान पणा पासूनचा मित्र , रेल्वे क्वार्टर्सच्या समोरच्या स्टेशन वाडीत राहायचा आणि तो देखील माझ्यासारखाच बिघडलेला होता , तो माझा गांजा , दारू , गर्द या सगळ्या व्यसनात आणि इतर अनेक बाबतीत पक्का साथीदार होता , याच्या वरूनच मी अय्युबशी मारामारी केली होती, १२ वी नंतर याचे वडील गेल्याने याला त्यांच्या जागी प्रेस मध्ये नोकरी लागली होती , त्यामूळे व्यसनासाठी पैसे मिळवण्यात त्याला काही अडचण येत नसे ) तो एकदम मला रागवत म्हणाला ‘ काय रे तुषार , काय नाटक चालवले आहेस तू हे , किती त्रास देतोस घरच्यांना ? , हे चांगले नाही ” असे बोलताना त्याने माझ्याकडे पाहत हळूच डोळा मारला , मग म्हणाला ‘ चल जरा बाहेर रेल्वे स्टेशनवर फिरून येऊ , जरा शांत होशील ” त्याच्या डोळा मारण्याचा अर्थ मला समजला होता माझ्या ब्राऊन शुगरची सोय होणार होती .
आई आणि भाऊ देखील लगेच त्याला म्हणाले ‘ हो रे बाबा , याला जरा समजाव चांगले , सकाळपासून आमचे डोके खातो आहे ‘ .मी लगेच चप्पल घालून बाहेर पडलो ,बहुधा सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला असावा . बाहेर रेल्वे स्टेशनवर पार्सल विभागाच्या मागे जेथे पार्सलची पोती वगैरे ठेवलेली असत तिथे कधी कधी आम्ही ब्राऊन शुगर ओढायला बसत असू त्या ठिकाणी मित्राने मला नेले आणि मग खिश्यातून ब्राऊन शुगरच्या पुड्या काढल्या म्हणाला ‘ मी जरा नशिक शहरात मामा कडे गेलो होतो माझ्या , आता घरी आलो तर समजले की तू काहीतरी भानगड केलीस , पोलसांनी धरून नेले , आधी पोलीस स्टेशनला गेलो , तिथे चौकशी केल्यावर समजले की तूला सोडून दिले , मला माहित होते तू नक्की टर्कीत असशील , म्हणून तुला पाजायला आलो ” मला एकदम हायसे वाटले. वा मित्र असावा तर असा .
आम्ही दोघे गप्पा मारत ब्राऊन शुगर प्यायलो माझा त्रास बंद झाला . सुमारे तासाभराने मी घरी आलो तेव्हा एकदम शांत झालेला होतो . घरच्या लोकांनाही नवल वाटले की मित्राने याला असे काय समजावले की एकदम शांत झाला . सगळे समाधानाने झोपी गेले , मात्र मी जागाच होतो ‘ सकाळी भाऊ कामावर गेल्यावर , मला नक्की पैसे मिळतील याचा विचार करत होतो तसेच आता आपल्याला पैसे मिळणे दिवसेंदिवस अधिक कठीण होत चालले आहे तेव्हा एखादी नोकरी केली पाहिजे असा निश्चय मनाशी केला .मात्र दुसऱ्या दिवशी घडले भलतेच.
( बाकी पुढील भागात )
— तुषार पांडुरंग नातू
Bhot achha Marathi article
I am Gujarati but I read Marathi on this web daily thankyoo