रविवारी सकाळपासून घरी मी सुरु केलेला गोंधळ आता तरी थांबेल अशी घरच्या मंडळीना आशा होती , रात्री मित्राने मला ब्राऊन शुगर पाजून तात्पुरता माझा त्रास थांबवला होता व मी शांत पणाने घरी आलो होतो तेव्हा आता सगळे सुरळीत होईल अशी घरच्या लोकांची खात्री होती , मी देखील आता एखादी नोकरी शोधायची असे ठरवले होते मनाशी , सकाळी नेहमी प्रमाणे भाऊ कामावर गेल्यावर आता आई कडून एकदाच शेवटचे पैसे घ्यायचे आणि या पुढे मग ब्राऊन शुगर सोडून द्यायची असा देखील मनाशी विचार करत होतो मी , जे काही दिवसभर घडले होते ते माझ्यासाठी देखील अनपेक्षितच होते , घरचे लोक इतके ताणून धरतील असे मला वाटले नव्हते . जरी सकाळी आणि रात्री दोन्ही वेळा मला ब्राऊन शुगर प्यायला मिळाली होती तरी माझे समाधान काही झाले नव्हते कारण स्वतच्या पैश्यांनी शान मध्ये ब्राऊन शुगर विकत घेऊन एकट्याने संडासात बसून , रेडीओवर गाणी ऐकत पिण्यात , आपले दुखः कुरवाळण्यात जी मजा होती ती काही मला मिळाली नव्हती…( जेव्हा एकटे पिणे सुरु होते , तेव्हा एखादी व्यक्ती व्यसनाच्या आहारी पूर्णपणे गेल्याचे समजण्यास हरकत नाही ) .
सकाळी मी लवकरच उठून स्नान वगैरे करून तयार झालो होतो व उगाच टाईमपास म्हणून एक अभ्यासाचे पुस्तक काढून बसलो होतो , घरची सगळी मंडळी उठून आपापल्या कामाला लागली होती , मी कानोसा घेऊन भाऊ कामावर जाण्याची वाट पाहत होतो , सकाळी साधारण पणे तो ९ च्या सुमारास घराबाहेर पडत असे , पण साडेनऊ होत आले तरी तो काही बाहेर जाण्याची चिन्हे दिसेनात , उलट त्याचे सगळे आरामात चालले होते , बहिणीच्या मुलांशी मी बोलण्याचा प्रयत्न केला पण ती अजूनही कालच्या दहशतीतून बाहेर आलेली नव्हती , लांबूनच माझे निरीक्षण करणे सृरू होते त्यांचे ..
१० वाजून गेले तरी भाऊ काही कामावर जाईना तेव्हा माझ्या ध्यानात आले की याने मुद्दाम माझ्यासाठी सुट्टी घेतली होती , तो मला चांगला ओळखून होता , तुषार आज देखील काहीतरी गडबड करणार हे त्याने हेरले असावे आणि म्हणूनच तो सुट्टी घेऊन घरी थांबला होता , काल इतके रामायण झाल्यावर आता जास्त तमाशा करण्याची माझी इच्छा नव्हती , पण भाऊ घरात केवळ मी नाटके करू नये , पैसे मागू नयेत ,किवा मला पैसे मिळू नयेत म्हणून घरी थांबला याचा मला मनातून राग येत होता , शेवटी मी नवीन अस्त्र बाहेर काढले भावाला म्हणालो ‘ काल जे काही झाले ते झाले , आता आजपासून मी सगळी व्यसने बंद करणार आहे , पण या पूर्वी मी काही लोकांकडून उधार पैसे घेतले आहेत ते , मला परत करायचे आहेत , मी जर त्यांना पैसे परत केले नाहीत तर ते मला त्रास देतील , तेव्हा कसेही करून मला आज २०० रुपये दे , मी अर्ध्या तासात त्यांचे पैसे परत करून घरी येतो ‘ भावाला अंदाज होताच याचा तो म्हणाला ‘ चल मी येतो तुझ्यासोबत , कोणाचे पैसे द्यायचे आहेत ते आपण सोबत जाऊन देऊन टाकू ” त्याला माहित होते मी खोटे बोलतोय आणि म्हणून मी पण सोबत येतो हे त्याचे म्हणणे होते ..
लगेच मग मी ‘ काल पासून तू उगाच माझ्या मागे लागला आहेस , आता मी एव्हढे कबुल करतोय की सगळी व्यसने सोडून देणार आहे , चांगला वागणार आहे , तरी तू विश्वास ठेवायला तयार नाहीस , हवी तर मी शपथ घेतो तू म्हणशील त्याची ‘ ( खोट्या शपथा घेणे , खोटी वचने देणे यात सारे व्यसनी अगदी हुशार असतात ) भाऊ म्हणाला ‘ या अशा शपथा पूर्वी अनेक वेळा घेतल्या आहेस तू , माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीय , तू मुकाट्याने घरात बस , ज्या लोकांचे पैसे द्यायचे असतील त्यांची नावे सांग मला हवी तर , मी जाऊन पैसे देतो त्यांना , तुला जर काही त्रास होत असेल तर माझ्या सोबत दवाखान्यात चल , ती गळ्याची जखम बघ अजून ओली आहे ..’ काल ब्लेडने गळा कापून घेण्याचे नाटक जरी यशस्वी झाले नव्हते तरी गळ्यावर साधारण १ इंचाची चीर पडली होती त्यावर पातळ खपली धरली होती पण जखम जरा मोठीच होती एकदोन टाके लागले असते डॉक्टर कडे गेलो असतो तर ( अजूनही ती खुण माझ्या गळ्यावर आहे ) . पण मी ‘ तुझा माझ्यावर विश्वास नाही , मी सुधारू पाहतो आहे तर तू मला सुधारू देत नाहीस वगैरे आरोप सुरु ठेवले ,शेवटी तो वैतागून म्हणाला जाऊ दे तुझ्या नादाला लागण्यात काही अर्थ नाही . मी आपला कामावर जातो . तुझे आयुष्य आणि तू काय करायचे ते करा असे म्हणत कामावर जाण्याची तयारी करू लागला . वा ! मला हेच हवे होते , सुमारे १२ वा . तो कामावर जातो म्हणून बाहेर पडला …
मी आईकडे मोर्चा वळवला पैसे मागण्यासाठी तर ती म्हणाली कालच तुझ्या भावाने माझ्या कडून आणि ताई कडून देखील सगळे पैसे काढून घेतले आहेत . हे भलतेच झाले होते मला वाटले आई खोटे बोलत असावी मी तिची पर्स तपासली , तिच्या पैसे ठेवण्याच्या गुप्त जागा म्हणजे साखरेचा डबा , व इतर दोनचार डबे होते ते ही तपासले पण एकही पैसा नव्हता , मग मी तू शेजारूच्या काकूंकडून उधार पैसे मागुन आण म्हणून तिच्या मागे लागलो पण ती काही कोणाकडे उधार पैसे मागायला जायला तयार होईना म्हणाली आम्ही गरिबीत दिवस काढले पण कधी कोणाकडे हात पसरला नाही आणि तुझ्यासाठी मी कोणाकडेही हात पसरणार नाही , तुला लाज वाटायला हवी असे उधार पैसे मागून आण म्हणायला , यात लाज कसली एकमेकांची मदत करायला हवी हा तर शेजार धर्म आहे वगैरे मी तिला सांगू लागलो . मी स्वैपाक घरात आईशी वाद घालत होतो . बहिण आणि भाचे नुसतेच आमच्याकडे बघत होते घराचे पुढचे दार उघडेच होते , तितक्यात एकदम घरात भाऊ आणि चार पोलीस शिरले आणि त्यांनी मला पकडले ..
आधी पायावर दोन काठ्या लगावल्या आणि बाहेर फरफटत नेले , हे पोलीस रेल्वे स्टेशनच्या बाहेर असलेल्या चौकीतील होते ते मला ओळखत होते तरीही त्यांनी मला दयामाया न दाखवता बाहेर आणून पायीच चौकीकडे नेणे सुरु केले , गल्लीतील लहान पोरे , बायका हा सगळा तमाशा पाहत होत्या , मी काही विशेष झाले नाही अश्या अविर्भावात उगाच निर्विकार चेहरा ठेवून चाललो होतो . चौकीत गेल्यावर त्यांनी मुख्य पोलीस स्टेशनला फोन लावून मला ताब्यात घेतल्याचे कळवले.
(मनातल्या मनात मी आता भावाला सोडायचा नाही असे ठरवत होतो , काल पासून मी जो घरात तमाशा मांडला होता त्या बद्दल मला लाज वाटण्याऐवजी मी भावाचा सूड कसा घ्यायचा या बद्दल वीचार करत होतो , व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात असे म्हणतात की व्यसनी व्यक्ती हा घरच्या लोकांच्या दृष्टीने एका आतंकवाद्या पेक्षा देखील जास्त भयंकर असतो , कारण खरे आतंकवादी हे दुसऱ्या जातीच्या.. धर्माच्या लोकांना त्रास देऊन त्याच्या मनात दहशत बसवतात पण घरातील मंडळीना सुखात ठेवतात , मात्र व्यसनी हा स्वतच्याच घरात आधी दहशत माजवतो, आणि बाहेरच्या लोकांशी गोड वागतो.)
( बाकी पुढील भागात )
— तुषार पांडुरंग नातू
Leave a Reply