मी पोलीस स्टेशन वरून पळून आल्यानंतर घरात जो हलकल्लोळ माजला होता त्याचे फलित हे झाले की त्या दिवशी रात्री मी सर्वांची माफी मागितली. ( अर्थात तेव्हा ब्राऊन शुगर पिऊन झाली होती , टर्की नव्हती म्हणून ही पश्चात बुद्धी होती , अनेक व्यसनी असे नेहमी करतात , काही मोठी भानगड , भांडण , किवा मोठी चूक केली की ते तात्पुरते माफी मागतात , काही दिवस शांततेने जगतात अर्थात व्यसन बंदच असते असे नाही पण ते घरी त्रास देणे बंद करतात काही काळ ) व या पुढे चांगला वागेन असे वचन दिले . मनाशी देखील मी हे ठरवले होते की आता एखादी नोकरी शोधली पाहिजे जेणेकरून आपला खर्च आपल्याला स्वतःला करता येईल .
माझा ऐक जिवलग मित्र होता भीमा डावरे म्हणून तो विष्णुनगर च्या पलीकडे असलेल्या दलित वस्तीत राहत असे , आठवी पासून तो माझा मित्र होता . भीमाचे वडील लहानपणीच गेले होते , मोठा भाऊ व त्याच्या पत्नी मुलांसोबत भीमा व त्याची आई राहत असे . मोठा भाऊ प्रेस मध्ये नोकरीला होता मात्र त्याच्या भावाला एकंदरीत ५ मुली होत्या व तुटपुंज्या पगारात सर्व कारभार चालला होता . भीमा जरी माझ्यासोबत नेहमी राहत असला तरी त्याचे ऐक वैशिष्ट्य असे की त्याने आमच्या कोणत्याही मवाली पणात अथवा व्यसनात भाग घेतला नव्हता , उलट तो आम्हाला समजावून सांगे व्यसन करू नका म्हणून , आम्ही त्याला अनेकवेळा अनेक प्रकारे व्यसनाचा आग्रह करूनही तो सोवळा राहिला होता .कित्येक वेळा तो कुतूहल म्हणून आमची चिलीम साफ करून देत असे , किवा एखादे वेळी सिगरेट मध्ये गांजा भरून देत असे पण कधी त्याने व्यसन केले नाही हे कौतुकास्पद होते
म्हणजे आम्ही सगळे मित्र व्यसनी आणि सतत आमच्यात राहूनही स्वतःला कोणतेही व्यसन न लावून घेतलेला भीमा म्हणजे ऐक आश्चर्य होते . भीमा नेहमी माझ्या घरी आभ्यास वगैरे निमित्ताने असायचा , आईने मला सांगितलेली अनेक कामे मी भिमावर ढकलत असे , उदा . सिलेंडर साठी नंबर लावणे , दुकानातून किराणा समान घेऊन येणे वगैरे . आई नेहमी म्हणत असे की तुझ्याऐवजी भीमा माझा मुलगा हवा होता इतका प्रेमळ आणि नम्र व गुणी होता तो .( गेल्या अनेक वर्षात भीमा भेटलेला नाही , तो मुंबई ला कोणत्यातरी कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे असे समजले आहे ).
तर या भीमा सारखे आता वागायचे असे मी ठरवले होते व तसे वचन देखील दिले होते सर्वाना . दुसऱ्या दिवशी पासून मी भिमासोबत नोकरी शोधू लागलो , अर्थात नोकरी शोधण्याच्या निमित्ताने व आता चांगला वागतो असे म्हणून आईकडून थोडेफार पैसे उकळतच होतो व त्यात नशा भागवत होतो कसातरी .त्या पोलीस स्टेशनच्या प्रकरणानंतर मोठा भाऊ मला जरा टरकूनच होता , त्याला जरी नंतर मी काही बोललो नव्हतो तरी त्याच्या मित्रांनी बहुधा त्याला शहाणपणाचा सल्ला दिला असावा की तू तुषार च्या भानगडीत पडू नकोस , तो उगाच तुला काहीतरी इजा करेल ,त्यामूळे असावे कदाचित तो आता माझ्या बाबतीत फारसे बोलत नसे अर्थात त्याची माझ्यावर नजर होतीच फक्त त्याने बोलणे कमी केले होते इतकेच .
एकदा अशीच ऐक जाहिरात आली होती स्थानिक दैनिकात ‘ प्रचारक हवेत ‘ या आशयाची . नाशिक मध्ये उंट छाप बिडीचे उत्पादन होते त्याचे मालक बस्तीराम नारायणदास सारडा हे होते , त्या समूहाची ही जाहिरात होती ‘ उंट ‘ छाप बिडी चा गावोगावी प्रसार आणि प्रचार व विक्री वाढवण्यासाठी हे ‘ प्रचारक पद ‘ होते , त्यात उमेदवाराला गायन , अभिनय , ई बाबतीत प्राविण्य असावे असा उल्लेख होता म्हणून मी भीमा सोबत तेथे मुलाखतीला गेलो श्री . पाडेकर साहेब म्हणून होते मुलाखत घ्यायला ( हे पाडेकर नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रात वावरणारे होते ) मुलाखतीच्या वेळी त्यांनी मला कविता म्हणून दाखव , गाणे म्हणून दाखव , कविता कर , असे प्रश्न विचारले तसेच एखादा अभिनय करून दाखवण्यास सांगितले मी त्यावेळी त्यांना नट सम्राट मधील ‘ घर देता का कुणी घर ‘ हा भाग करून दाखवला होता . त्यांनी लगेच माझी निवड केली प्रचारक पदासाठी . भीमा त्या वेळी एका ठिकाणी पार्टटाईम नोकरी करतच होता त्यामूळे त्याने काही मुलाखत दिली नाही . तर आता मी नोकरी करणार होतो , चांगला वागणार होतो भीमा सारखा म्हणून घरची मंडळी खुश होती . कामावर हजर व्हायला अजून ऐक आठवडा बाकी होता तो पर्यंत मग आईकडून निर्विघ्न पैसे मिळत गेले मला .
मी व्यसन बंद केले नव्हते तर फक्त आता जरा सांभाळून व्यसन करत होतो इतकेच , आईने देखील घडल्या प्रकारचा धसका घेतला होता म्हणून ती मला बिनदिक्कत पैसे देत असे . माझ्या नोकरीचा दिवस उजाडला आणि मी सकाळी सकाळी मी माझा ब्राऊन शुगर चा डोस घेऊन कामावर हजर झालो पहिल्या दिवशी मला फक्त कामाचे स्वरूप समजावून सांगण्यात आले , नंतर सातपूर येथे असलेल्या उंट बिडीचे उत्पादन जेथे चालते तेथील कारखान्यात नेण्यात आले , बिडीची पाने वळून त्यात तंबाखू कशी भरली जाते , तंबाखूवर कशी प्रक्रिया होते ते सारे मी पहिले . मग उद्या पासून तुला मलकापूर येथे प्रशिक्षणासाठी जावे लागेल असे सांगितले गेले . प्रशिक्षण म्हणजे उंट विडीचा प्रचार करणारी ऐक व्हँन होती त्या व्हँन सोबत मला जायचे होते त्या गाडीवर वर भोंगे लावलेले होते , ऐक मँनेजर , ऐक प्रचारक , ऐक सहायक , चालक आणि त्याचा सहायक अशी टीम सुमारे १ आठवडा ते १५ दिवस अश्या दौऱ्यावर जात असे , त्या दोऱ्यात गावोगावी जाऊन उंट बिडीचा प्रचार करणे , तेथील व्यापाऱ्यांना बिडी सप्लाय करणे , विक्री वाढण्यास मदत करणे असे काम असे , सगळी टीम एखाद्या स्थानिक लॉज वर मुक्काम करत असे , आम्हाला जेवणाचा भत्ता मिळत असे . मी ज्या गाडीबरोबर प्रशीक्षणासाठी जाणार होतो त्या गाडीचे व्यवस्थापक आणि प्रचारक यांच्याशी माझी ओळख करून देण्यात आली , त्यांनी मला त्यांचे काही अनुभव सांगितले . व दुसऱ्या दिवशी मी प्रशिक्षणासाठी जाण्यास सज्ज झालो . रात्रीच माझा ब्राऊन शुगर चा दोन दिवसांचा स्टॉक मी घेऊन ठेवला होता .
( बाकी पुढील भागात )
— तुषार पांडुरंग नातू
Leave a Reply