मला नोकरी लागलीय हे समजल्यावर आई वडिलांना आणि भावाला देखील खूप आनंद झाला होता , आता सगळे सुरळीत होईल अशी आशा पल्लवीत झाली सर्वांची , मी देखील दोन दिवस सर्व मित्रांमध्ये आणि घरात , रुबाबात वावरत होतो , मी त्या वेळी बी .कॉम शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली होती , अर्थात परीक्षेत मी पास होणार नाही हे मला चांगलेच माहित होते आणि म्हणूनही कदाचित म्हणूनच मी नोकरीबाबत विचार केला असावा , असे आता वाटते आहे .दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या ८ दिवसांच्या प्रशिक्षणाची सर्व तयारी करून मी तयार होतो , कपडे , इतर आवश्यक चीजवस्तू आणि मुख्य म्हणजे माझा सुमारे दोन दिवसांचा ब्राऊन शुगर चा साठा सोबत होताच …
आतापर्यंत दोन तीन वेळा टर्की सहन करण्याचा योग आल्याने त्या बाबत थोडीशी भीती कमी झाली होती व जवळ असलेली ब्राऊन शुगर संपल्यावर आपण बाहेरगावी असू त्या वेळी टर्की झाली तरी सहन करू व हे व्यसन कायमचे सुटून जाईल असेही माझ्या मनात होते ( व्यसनी व्यक्तीला त्याच्या व्यसनाबद्दल आतून अपराधीपणाची भावना असतेच व व्यसन सुटावे असे त्यालाही वाटत असते पण , सगळे काही आपोआप घडेल असे त्याला वाटत राहते किवा त्या बाबतीत त्याला अति आत्मविश्वास असतो की मी ठरवले की मला व्यसन सोडता येईल आणि म्हणूनच तो उपचारांना नकार देत राहतो ) .
अकोल्याजवळ मलकापूर येथे आमची उंट बिडीची प्रचार करणारी गाडी जाणार होती आणि मग तिथेच मुक्काम करून ऐक आठवडाभर आसपासच्या गावात दिवसभर प्रचार करणे , तेथील विक्रेत्यांना तयार माल पुरवणे असे काम होते , मी प्रशिक्षणार्थी म्हणून गाडीसोबत जाणार होतो व त्या गाडीचे व्यवस्थापक , गाडीचे नेहमीचे प्रचारक , चालक आणि ऐक मदतनीस असे आम्ही एकूण पाच जण गाडीत होतो , गाडीच्या मागील बाजूस तयार उंट विड्यांची खोकी भरून ठेवलेली होती , गाडीवर वर दोन भोंगे लावलेले होते व गाडीत ऐक इम्प्लीफायर आणि माईक त्या त्या भोंग्यांना जोडलेले होते . आतील प्रचारक जेव्हा गावात शिरे तेव्हा काही बडबडगीते , उंट बिडीची जाहिरात करणारी घोष वाक्ये म्हणत असे व गाडीभोवती लोक गोळा झाले की मग लकी डूॉ घोषित करण्यात येई …
म्हणजे गाडीभोवती जमलेल्या लोकांना माहिती सांगितली जाई की प्रत्येकी १ रुपयाला १ बिडी बंडल विकत घ्यावे व ते बंडल फोडून आत ज्या नंबरची चिठ्ठी निघेल ती वस्तू त्याला बक्षिस म्हणून मिळेल , लकी डूॉ साठी खास प्रकारची बिडी बंडल तयार करण्यात आली होती ज्यात १ ते ८ अश्या नंबरच्या चिठ्या टाकलेल्या असत व प्रत्येक नंबर साठी ऐक छोटीशी वस्तू बक्षिस म्हणून मिळत असे यात आठ नंबरला सगळ्यात मोठे बक्षिश म्हणजे प्लास्टिक ची बादली असे ठेवलेले होते तर १ ते सात या नंबर साठी पुठ्याच्या आकर्षक टोप्या , कंगवा , प्लास्टिकची शिट्टी , बॉलपेन ,अश्या किरकोळ वस्तू होत्या गम्मत अशी की या विशेष बनवलेल्या बिडीबंडालामध्ये एकूण आठ नंबर च्या चिठ्या फक्त ५ होत्या , टोप्या , कंगवा , पेन अश्या किरकोळ वस्तूंच्या नंबरच्या चिठ्ठ्या मात्र भरपूर होत्या म्हणजे सर्व आठ दिवसांच्या दौऱ्यात आम्हाला जवळपास २००० विडी बंडल विकायचे होते गाडीभोवती जमलेल्या लोकांना व त्या बदल्यात ५ प्लास्टिक च्या बदल्या आणि इतर किरकोळ बक्षिशे वाटायची होती …
या योजनेमागे कल्पना अशी होती की बक्षिसाच्या आशेने लोक बिडी बंडल विकत घेतील त्यांना जर तो ब्रांड आवडला तर बिडीचा खप वाढेल , सुंदर कल्पना होती ही विक्री वाढवण्यासाठी. लोकांच्या मानसिकतेचा चांगला अभ्यास असावा ही कल्पना ज्याच्या सुपीक डोक्यातून निघाली होती त्या व्यक्तीचा , लोक एकाद्या वस्तूवर दुसरी वस्तू फुकट किवा भेट म्हणून दिली की खूप खुश होतात मग त्या मूळ वस्तूची त्यांना गरज असो अथवा नसो किवा ती मूळ वस्तू महाग मिळाली तरी त्यांच्या ते लक्षात येत नाही कल्पना होती या योजनेमागे .
मला प्रशिक्षण देणारे जुने प्रचारक इस्माईलभाई म्हणून ऐक मध्यम वयीन ग्रूहस्थ होते सरळ नाक , गोरेपान, उंच , मोठे स्वच्छ डोळे , आणि हसतमुख असे इस्माईल भाई मला प्रथमदर्शनीच आवडले , ते मितभाषी होते व या गाडीवर सुमारे १० वर्षांपासून ते नोकरी करत होते असे समजले , त्यांनी सर्वात आधी मला गाणी कोणकोणती येतात ते विचारले , मग आवडता गायक कोणता , शिक्षण किती , घरी कोण कोण अशी चौकशी केली व मग म्हणाले ‘ तुला घर सोडून असे बाहेर राहणे करमेल का ?’ या वर मी त्यांना ‘ नोकरी म्हंटली की हे असे करावेच लागते’ असे उत्तर दिल्यावर ते खुश झाले , या गाडीतील लोकांना मला कोणते व्यसन आहे हे मला कळू द्यायचे नव्हते म्हणून मी अगदी सभ्य मुलासारखा वागत होतो त्यांच्याशी . निघताना नाशिक शहरातून गाडी निघून आधी माझ्या घरी आली मला सोबत घेण्यासाठी आणि मग आम्ही मलकापूरच्या दिशेने कुच केले ,
जेव्हा ती बाहेरून आकर्षक रंग देऊन काढलेले उंटाचे चित्र , वर लावलेले भोंगे , असणारी गाडी आमच्या रेल्वे क्वार्टरच्या दारात आली तेव्हा आसपासच्या मुलांची गर्दी जमली होती , आई वडील त्यावेळी घरीच होते त्यांना तर माझे खूप कौतुक वाटत होते , आईने मला निघताना देवाला नमस्कार करायला सांगितला , मग देवाच्या आणि आई वडिलांच्या पाया पडून मी निघालो .( मी नोकरी करतोय म्हंटल्यावर मला घरून फारशी कटकट न होता पैसे मिळाले होते , माझा सकाळचा डोस मारून झाला होता अर्थात म्हणून मी चांगलाच फ्रेश होतो ) गाडीत बसताना मागे पहिले तर आईचे डोळे भरून आले होते आणि वडील नजरेनेच मला आशीर्वाद देत होते .
( बाकी पुढील भागात )
— तुषार पांडुरंग नातू
Leave a Reply