मलकापूरला प्रशिक्षण दोन दिवस नीट झाले कारण माझ्याजवळ माझा ब्राऊन शुगर )चा साठा होता , पण तिसऱ्या दिवशी मला टर्की सुरु झाली पण मी अंगावर सगळे त्रास सहन करत होतो दिवसभर , मात्र रात्री जास्त त्रास होऊ लागला मला उलट्या झाल्या ते पाहून सोबतचे काळजीत पडले , कदाचित बाहेरचे खाणे , पाणी सहन झाले नसावे असे त्यांना वाटले , इस्माईल भाईंजवळ डोकेदुखी , सर्दी , ताप वगैरेंच्या गोळ्या होत्या त्यांनी मला डोकेदुखीची गोळी दिली ,व आराम करण्यास सांगितले , अतिशय भयानक होती ती रात्र , माझ्या खोलीतील सगळे झोपले होते आणि मी बिछान्यावर तळमळत होतो , सारखे हात पाय गरम होत होते म्हणून मी बाथरूम मध्ये जाऊन हातपाय थंड पाण्याने धुवत होतो , मध्येच एकदम थंडी वाजे , मग कुडकुडत ब्लँकेट घेत होतो अंगावर , जुलाब आला की संडासला पळत होतो , केव्हा एकदा सकाळ होते असे झाले मला कारण आसपास काहीच जाग नसल्याने वेळ जाता जात नव्हता .
इतर सर्व सुखाने झोपलेले पाहून अश्या वेळी त्या लोकांचा खूप हेवा वाटतो . स्वतची चीड येते , स्वतच्या असहायपणा टोचत राहतो .सकाळ झाल्यावर त्रास सुरूच होता पण आसपासच्या लोकांशी बोलण्यात तो त्रास फारसा जाणवत नव्हता . त्या दिवशी इस्माईल भाईनी मला लॉजवरच आराम करण्यास सांगितले . सर्व निघून गेल्यावर मी कसातरी बाहेर पडलो आणि मलकापूर मध्ये ब्राऊन शुगर मिळते का याचा शोध घेऊ लागलो , पण तेथे फक्त गांजा आणि दारू मिळू शकत होती , शेवटी मी ऐक गांजाची पुडी घेतली आणि ऐक देशीची निप घेऊन लॉजवर आलो , दारू पिऊन , गांजाची सिगरेट भरली आणि ओढत बसलो या नशेत सुमारे ३ तास बरे गेले , पुन्हा दारू उतरल्यावर जास्तच त्रास सुरु झाला , तसाच पडून राहिलो . पोटात काही नसल्याने खूप अशक्तपणा आला होता . असे दोन दिवस काढले , तिसऱ्या दिवशी मला थोडी हुशारी वाटली . पण आतल्याआत त्रास होतच होता ..
मलकापूरच्या आसपासची बहुतेक गावे करून झाली होती म्हणून मग , खामगावला जाण्याचे ठरले तेथे उरलेले दोन दिवस राहून मग पुन्हा नाशिकला जाणार होतो . खामगावला आमचे लॉज एका थेटरला लागूनच होते म्हणजे अगदी इतके जवळ की थेटर मध्ये सुरु असलेल्या सिनेमातील संवाद आणि गाणी देखील आम्हाला ऐकू येतील , खामगावला संध्याकाळी लॉज वर आल्यावर आम्ही रूम वर बसलो होतो सुमारे रात्रीचे ९.३० झाले असावेत . माझा त्रास जरा कमी होता तरी मन अतिशय अवस्थ होते , बाजूच्या थेटर मध्ये सिनेमा सुरु झालेला होता , काही संवाद अर्धवट कानावर पडत होते व मग गाणे सुरु झाले ‘ मेरे नैना सावन भादों फिरभी मेरा मन प्यासा ‘ ‘ मेहेबुबा ‘ सिनेमा लागला होता बाजूला . ते गाणे सुरु झाले तसा मी अधिकच अवस्थ झालो , मन एकदम व्याकुळ झाले .. पाहता पाहता मन भूतकाळात जाऊन पोचले ..
मी आठवीत होतो तेव्हा ..उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु होत्या .दिवसभर नुसती धमाल करायचो आम्ही मित्र ..क्रिकेट, सूरपारंब्या . चोर पोलीस , विष -अमृत , जोडीची शिवाशिवी , हत्तीची सोंड , कबड्डी कितीतरी मैदानी आणि बैठे खेळ खेळण्यात दिवस भुर्रकन संपत असे ..त्याकाळी शिवजयंती , डॉ . आंबेडकर जयंती वगैरे च्या वेळी सुमारे तीन चार दिवस कार्यक्रम असत आणि मुख्य कार्यक्रम म्हणजे रस्त्यावर दाखवला जाणारा सिनेमा हा असे . सिनेमा जरी उशिरा सुरु होत असे तरी रात्री ९ लाच आम्ही मित्र बसायला पोती वगैरे घेऊन सिनेमाच्या ठिकाणी जागा धरून बसत असू . रस्त्यावर मध्ये पांढरा पडदा टांगूला जाई , सुमारे २० फुट अंतरावरून प्रोजेक्टर वरून सिनेमा दाखवला जाई पडद्याच्या दोन्ही बाजूला लोक बसत , एका बाजूस स्त्रिया आणि दुसऱ्या बाजूला पुरुष अशी व्यवस्था असे , बहुधा तेच तेच सिनेमे दाखवले जात नेहमी . जय संतोषी मां , जंजीर , धर्मकन्या , गंगा जमुना , वगैरे , त्या वयात घरून थेटर मध्ये जाऊन सिनेमा पाहायला परवानगी मिळत नसे,म्हणून हे रस्त्यावारचे सिनेमे आम्ही सोडत नव्हतो , मध्ये रील तुटले की हल्ला गुल्ला होई , प्रोजेक्टर समोर हात नाचवले जात ..कोणीतरी गर्दीत बेडूक सोडे , मग पळापळ , पुन्हा आयोजकांचे शांततेचे आवाहन ..
तर त्या दिवशी असाच शिवजयंती निमित्य ‘ गंगा जमुना ‘ सिनेमा दाखवला जात होता ..मध्येच रील तुटले आणि ते काही केल्या पुन्हा नीट जोडले जाईना , वारंवार रीळ तुटल्याने शेवटी आजचा सिनेमा रद्द असे जाहीर झाले , आमचा सर्वांचा विरस झाला . सिनेमाला माझे शाळेतील अनुराधा थेटर जवळ राहणारे काही मित्र देखील आले होते ..
सिनेमा दाखवला जाणार नाही म्हंटल्यावर इतक्या लवकर आम्ही घरी जाणे शक्यच नव्हते , तेव्हा एका दिलीप नावाच्या माझ्या वर्गातील मुलाने म्हंटले चला आपण आमच्या घराजवळ जाऊ तेथे गप्पा ..गाणी म्हणत बसू . झाले आम्ही आठदहा जण सुभाष रोड वरून त्याच्या घराकडे निघालो . समोर ऐक मोठी दोन मजली इमारत मध्ये छोटी गल्ली आणि पलीकडील बैठ्या चाळीत दिलीप राहत असे , उन्हाळ्याचे दिवस असल्याने कोणीच लवकर झोपत नसत तर आम्ही त्या इमारतीच्या खाली पायऱ्यांवर बसून गाण्याच्या भेंड्या खेळू लागलो , आमचे आवाज वाढले होते त्यामूळे आसपासचे आणि इमारतीतील जागे असलेले लोक आमची गम्मत पाहत होते .मला लहान पणापासून गाण्याची आवड होती , व गळाही गोड होता त्यामूळे माझा आवाज लक्षवेधी होता . जरा वेळ भेंड्या खेळून झाल्यावर आता एकेकाला आम्ही गाणे म्हणण्याचा आग्रह करू लागलो , इमारतीच्या वर लावलेल्या ट्यूबलाईटच्या हलक्या प्रकाशात आम्ही सर्व बसलो होतो ..जेव्हा मला गाणे म्हणण्याचा आग्रह झाला तेव्हा आधी मी . केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा ‘ हे भक्तीगीत म्हंटले , गाणे संपल्याबरोबर सर्वानी टाळ्या वाजवल्या व मला हिंदी गाणे म्हणायचा आग्रह झाला आता इमारतीतील लोक देखील मुलांची ही गाण्याची मैफिल ऐकायला जमले होते , मी दुसरे गाणे त्यावेळी सगळीकडे गाजत असलेल्या ‘ महेबुबा ‘ सिनेमातील म्हणू लागलो ‘ मेरे नैना ..सावन भादो ..” किशोर कुमारने गायिलेल्या अनेक गीतांपैकी हे अतिशय सुंदर गाणे आहे . मी मग्न होऊन गाणे म्हणत होतो ..आवाज टिपेला पोचला होता. त्याच वेळी जाणवले की गर्दीतून कोणीतरी आपल्या कडे रोखून पाहत आहे जरी नीट चेहरा दिसला नाही तरी ती मुलगी सारखी आपल्याकडे पाहते आहे हे जाणवले ..ट्युबलाईट च्या अंधुक प्रकाशात देखील तिचे ते रोखून पाहणे मला स्पष्ट जाणवत होते …
( बाकी पुढील भागात )
— तुषार पांडुरंग नातू
Leave a Reply