अनेक प्रकारच्या अध्यात्मिक पुस्तकातून अश्या प्रकारचा अनुभव अध्यात्मिकतेकडे वाटचाल करणाऱ्या लोकांना अश्या प्रकारचा मात्र थोडा वेगळा अनुभव आलेला आहे असे नमूद केलेले आढळले , मी त्या काळात व्यसने करीत होतो त्या मुळे मी अध्यात्मिक वैगरे असण्याचा प्रश्नच नव्हता , एक खरे की व्यसने बंद करण्याचा माझा निर्णय त्या काळापुरता तरी खूप प्रामाणिक होता व व्यसन न केल्यामुळे आलेली अस्वस्थता व बैचेनी घालवण्यासाठी मी जे पुस्तक वाचावयास घेतले होते ते अध्यात्मिक होते . एकंदरीतच जीवनाचे सार उलगडून दाखवणारी ‘ गीता ‘ वाचत असताना मला थोडी गुंगी आली किवा झोप आल्यासारखे वाटले म्हणून मी काही वेळ डोळे मिटून उघडे पुस्तक तोंडावर ठेवून पडलो होतो …
त्या वेळी काही क्षण का होईना मी गीतेत सांगितलेल्या विचारांशी इतका तादात्म्य पावलो होतो की , वर्तमान जीवनातील सर्व चिंता , काळज्या , वैगरे विसरून गेलो होतो , अर्थात माणूस झोपेतही सगळे काही विसरतोच म्हणा , पण ती झोप नव्हती तर अर्ध जागृतीची अवस्था होती अश्या अवस्थेत माणसाचे अंतर्मन अतिशय संवेदनशील झालेले असते , संमोहन हे एक शास्त्र आहे हे विज्ञानाने मान्य केलेले आहे आणि हे शास्त्र देखील अंतर्मनाच्या एकाग्रतेवरच आधारित आहे .
अर्ध जागृतीच्या अवस्थेत मला मी बागेत पहुडलो आहे हे देखील समजत होते तसेच मी गीतेचे विचार वाचले आहेत हे देखील आठवत होते मला फक्त नेमका तो वास कुठून आला हे समजले नाही तसेच तसा वास पूर्वी कधी मी अनुभवला देखील नव्हता हे नेमके कसे घडले याचा मी असा निष्कर्ष काढलाय की ती एक माझी आनंदाची अनुभूती होती …
कारण सर्व काळज्या चिंता विसरून , वर्तमानात फक्त साक्षी भावाने वावरणे हा अतिशय आनंद अनुभव असतो आणि तो अनुभवत असताना तो सुगंध माझी इंद्रियांची संवेदनशीलता खूप वाढल्याने मला जाणवला .मी पुढे ‘ विपश्यना ‘ करण्यासाठी इगतपुरी येथे गेलो तेव्हा देखील मला अगदी सुगंधच नाही पण तश्याच प्रकारचा अनुभव आला होता त्या बद्दल नंतर लिहीनच . ‘ विपश्यना ‘ म्हणजे भगवान गौतम बुद्धाने स्वतच्या अनुभवातून जी ध्यान पद्धती विकसित केली आहे त्याबद्दल मार्गदर्शन करणारे शिबीरे असतात ..
अनेक संतांना भजन , कीर्तन , करताना , किवा ध्यान धारणा करताना असले अनुभव आलेले मी वाचलेले आहे , इतकेच काय पंढरी च्या वारीला जाणारे वारकरी देखील जेव्हा त्यांचा भक्ती भाव टिपेला पोचतो तेव्हा ‘ विठ्ठल , विठ्ठल ‘ असा गजर करत मनाच्या अर्धजागृतीच्या अवस्थेत असा आनंदानुभव घेतात .
म्हणूनच मी या अनुभवला नेमके विशेषण न लावता , भ्रम , अनुभूती की संमोहन ? असे नाव दिले आहे .अर्थात कश्यामुळे ही का असेना तो आनंदानुभव होता हे नाकारता येणार नाही हेच खरे . मी ज्ञानी नाही हे मी येथे स्पष्ट करू इच्छितो . माझे मला जाणवलेले स्पष्टीकरण कदाचित काही लोकांना अयोग्य वाटेल किवा मला नेमके काय सांगायचे आहे याबाबत काही लोकांना संभ्रम पडला असेल तर माफ करावे .
(बाकी पुढील भागात)
— तुषार पांडुरंग नातू
(कुतुहल, मित्रांचा आग्रह किंवा तात्पुरती मॊजमस्ती उसना आनंद म्हणून आयुष्यात प्रवेश केलेले दारु व इतर मादक पदार्थांचे व्यसन कसे आयुष्य उध्वस्त करते याचा मागोवा या सदरात घेतलेला आहे..)
Leave a Reply