माझे वडील रेल्वेत नोकरीस होते व आम्ही सुमारे २० वर्षे नाशिकरोड येथे रेल्वे क्वार्टर मध्ये राहत होतो . तेथे फक्त एकदोन कुटुंबे ब्राह्मणांची होती इयत्ता पहिली पासून मला आसपास खेळण्यासाठी सर्वच जातीधर्मातील मित्र मिळाले, समाजात खोल वर पसरलेला जातीभेद मी तेव्हापासून अनुभवतो आहे तेथे एखाद्या मुलाचा त्याच्या माघारी त्याचा उल्लेख तो गवळ्याचा , तो न्हाव्याचा , धनगराचा , बामनाचा , वाण्याचा असाच होत असे अर्थात प्रत्यक्ष त्या व्यक्तीसमोर असा उल्लेख क्वचितच होई …
रेल्वे क्वार्टरच्या समोर ‘ विष्णू नगर ‘ नावाची वस्ती होती , त्याच्या पुढे सिन्नर फाटा आणि मागे ‘ राजवाडा ‘ म्हणजे दलित समाजाची वस्ती होती . माझा सगळीकडे स्वैर वावर असे माझे खेळगडी सर्व समाजातील् होते , खेळताना नेहमी मला बामन भट , कढी आंबट….सव्वा रुपया दक्षिणा …डाळभात वाला..घाबरट…असे चिडवले जायचे , आमच्या घरी कधीच जात पात पाळली गेली नाही ..तरी देखील हे मित्र मला नेहमी समोर माझ्या जातीचा उल्लेख करून चिडवत असत ..माझ्या बालमनाला ते दुखःद वाटत असे …घरी जेव्हा मी ते सांगत असे तेव्हा…जाऊ दे तू त्यांच्यात खेळायला जाऊ नकोस असा सोपा सल्ला दिला जाई…पण ते देखील मला पटत नसे एकदोन वेळा तर काही मुलांनी माझी पतंग फाडली..भंवरा हिसकून घेतला तेव्हा मी खूप रडलो , आणि तेव्हा असे वाटले की आपण घाबरतो म्हणून हे असे वागतात मग मी ठरवले की घाबरायचे नाही …तेव्हापासून मी निर्भयपणे त्यांच्यात वावरू लागलो , ‘ अरे ‘ ला का रे करू लागलो….मग शिव्या , हाणामारी यातही पुढाकार घेउ लागलो मित्रांच्या घरी जाऊन अंडे , मटन खाण्यास सुरवात केली तेव्हा मला चिडवणे बंद झाले …
घरी माझ्या अश्या वागण्याचे कौतुक होणे शक्यच नव्हते ….’ बिघडलाय ‘असा शिक्का बसला माझ्यावर , मला वाटते माझी बंडखोरी तेव्हापासूनच सुरु झाली असावी .माझ्या अश्या बिनधास्त वागण्याने नंतर माझा उल्लेख माझ्या माघारी ‘ नकली बामण ‘ असा केला जाई म्हणजे बामण हे बिरूद काही जात नव्हते ही गम्मत होती …तेथूनच मी घरी शुभंकरोती म्हणणे सोडले देव वगैरे मानणे बंद केले व ज्याच्या कडे शक्ती आहे…हिम्मत आहे ..दोन देण्याची आणि घेण्याची कुवत आहे तोच श्रेष्ठ असे माझे तत्वज्ञान बनले .. मी ११ वी ला असताना आमच्या भागात एक अय्युब नावाचा मुलगा बराच गुंड म्हणून प्रसिद्ध होता …त्या अयुब चे एकूण ७ भाऊ होते त्या पैकी दोन जरा बरे म्हणजे कामधंदा करणारे होते तर बाकी सर्व माझ्यासारखे उनाड …
हा अय्युब मुलींची छेड काढणे …खेळताना जबरदस्ती मुलांची बॅट व चेंडू हिसकावून पळून जाणे असे प्रकार करत असे …सात भाऊ म्हणून मुले त्याच्या वाट्याला जात नसत एकदा अयुब माझ्या ऐक किरण रोडे नावाच्या मित्राला नडला आणि ते जेव्हा मला समजले तेव्हा माझी सटकली आणि मी अयुब ला पकडले खूप मारामारी झाली शेवटी मी हातात स्ट्म्प घेऊन अयुब च्या मागे धावलो तो पुढे आणि मी मागे असा सर्व विष्णुनगर मध्ये पळापळ झाली . तेव्हापासून माझा सगळीकडे बोलबाला झाला . त्या पुढे माझ्या माघारी माझा उल्लेख ‘डेंजर बामण ‘ असा होऊ लागला .( बामण हे बिरूद मात्र गेले नाही हे विशेष )
( बाकी पुढील भागात )
— तुषार पांडुरंग नातू
(कुतुहल, मित्रांचा आग्रह किंवा तात्पुरती मॊजमस्ती उसना आनंद म्हणून आयुष्यात प्रवेश केलेले दारु व इतर मादक पदार्थांचे व्यसन कसे आयुष्य उध्वस्त करते याचा मागोवा या सदरात घेतलेला आहे..)
Leave a Reply