लहानपणा पासून जसा माझा मस्तीखोर , खोडकर स्वभाव होता तसेच वाचनाची देखील खूप आवड होती मला , रेल्वे क्वार्टर्स मध्ये एक रेल्वेची लायब्ररी होती , तेथे अनेक प्रकारची पुस्तेके होती सुरवातीला जादूच्या गोष्टीची म्हणजे जादूचा दिवा , जादूची बासरी , सिंदबादच्या सफरी , बादशहा -बिरबल , तेनालीराम , चांदोबा तर नेहमीचाच , नंतर रहस्य कथा मध्ये , श्रीकांत सिनकर , गुरुनाथ नाईक , काकोडकर , काळापहाड कथा , रातराणी कथा , न्यायधीश कथा इ . पुढे १० वी नंतर मग कादंबऱ्या वाचू लागलो त्यात स्वामी , छावा , मृत्युंजय , श्रीमान योगी ,अमृतवेल , ययाती, राधेय , कौंतेय ,इ व सामाजिक जाणीव वाढत गेली तशी मग आत्मचरित्रे वाचू लागलो यात दलित आत्मचरित्रे मला जास्त भावली कारण त्यात अतिशय कठीण आणि वास्तववादी प्रसंग असत बलुत , उचल्या , अक्करमाशी , बारमाशी , अशोक व्हटकर यांचे’ ७२ मैल ‘ अमृता प्रीतम , भाऊ पाध्ये , विजय तेंडूलकर , भालचंद्र नेमाडे , प. ल देशपांडे . जयंत नारळीकर ,बाबा आमटे , म . गांधी , सावरकर , डॉ . बाबासाहेब आंबेडकर , स्वामी विवेकानंद, हेडगेवार , गोळवलकर गुरुजी , संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम ,प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकांचे रविंद्र गुर्जर यांनी केलेले मराठी अनुवाद ,
खूप खूप वाचत असे मी विशेषतः गुढ विद्या वगैरे बद्दल माझे आकर्षण वाढले होते मग ‘ मोहिनी विद्या , साधना व सिद्धी ,’ मृत्यूच्या पलीकडे ‘ ‘त्राटक विद्या ‘ ..सगळी नावे इथे देणे कठीणच आहे इतके वाचन झालेय ..माझा वाचनाचा झपाटा देखील खूप होता सकाळी आणि पुन्हा संध्याकाळी मी पुस्तक बदलत असे एका घरात एका वेळी दोनच पुस्तके मिळत एक आई वाचत असे व एक मी आणि भाऊ पण मला हा कोटा पसंत नव्हता , तेव्हा काही वेळा मी लायब्ररी वाल्याची नजर चुकवून एक दोन पुस्तके शर्टाच्या आत लपवून आणत होतो , आईला सांगे की तो माझ्या ओळखीचा आहे म्हणून मला जास्त पुस्तके देतो मात्र एकदा वडिलांना समजले की हा चोरून पुस्तके आणतो मग त्यांनी मला सगळी पुस्तके परत नेऊन देण्यास सांगितली सुमारे १५ पुस्तके गुपचूप नेऊन ठेवणे शक्यच नव्हते मी खूप रडलो मग वडिलांनी मला लायब्ररीत सोबत नेले आणि तेथे खरा प्रकार सांगितला की याला वाचनाची खूप आवड आहे म्हणून याने हा असा प्रकार केला आहे ….
तो माणूस काही बोलला नाही पण नंतर माझा रेल्वेच्या लायब्ररीत जाण्याचा उत्साह कमी होत गेला. एकदा एक गुढ विद्येचे पुस्तक हाती लागले त्यात वेग वेगळ्या प्रकारच्या सिद्धी कशा प्राप्त करता येतात या बद्दल माहिती त्यातले काही प्रकार अत्यंत आकर्षक होते ‘ वशीकरण ; ‘ गुप्तधन ‘ अदृश्य होणे ‘ ई. पण त्यासाठी करायचे विधी आणि साहित्य खूप कठीण होते म्हणजे अमावस्येची रात्र , काळ्या मांजरीचे डोळे काढणे , घुबडाच्या पायाचे हाड , वटवाघूळाचे पंख असे प्रकार त्यावेळी मी करणे शक्यच नव्हते . एका पुस्तकात ‘ प्लँचेट ‘ म्हणजे मृत आत्म्याला बोलावण्याचा विधी सांगितला होता व त्या आत्म्याला जर आपण प्रश्न विचारले तर तो त्याची उत्तरे देतो असे लिहिले होते …हे करणे मात्र मला शक्य होते साधने देखील फारशी लागणार नव्हती , म्हणजे फक्त एक गुळगुळीत पाट , स्टील चे पाणी पिण्याचे फुलपात्र , खडू , उदबत्ती , आणि तीन जण .
सोपा विधी होता अगदी गुळगुळीत पाटावर मध्यभागी खडूने एक छोटा गोल काढायचा , त्याच्या एका बाजूला इंग्रजी मध्ये ‘ यस ‘ आणि दुसऱ्या बाजूला ‘ नो ‘ व वरती १ ते १० आकडे आणि उरलेल्या तीन बाजूला इंग्रजी तील ए ते झेड पर्यंत आद्याक्षरे लिहायची . मग उदबत्ती लावून तीन जणांनी डोळे मिटून बसायचे , एखाद्या गेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याचे स्मरण करायचे ( यात ती व्यक्ती नैसर्गिक रित्या मरण पावलेली असावी म्हणजे अपघात , खून , आत्महत्या अश्या प्रकारांनी गेलेली व्यक्ती नसावी ) मग त्या फुलपात्राच्या खोलगट भागात उदबत्ती फिरवायची आणि तोंडाजवळ फुलपात्र धरून ‘ त्या ‘ बोलावणार असणाऱ्या विशिष्ट व्यक्तीचे नाव घेऊन ‘ लवकर या ‘ असे म्हणायचे आणि फुल पात्र पाटावरच्या छोड्या मध्यभागी असलेल्या गोलावर उपडे ठेवायचे व तीन जणांनी त्या उपड्या फुल पात्रावर उजव्या हाताचे पहिले बोट ठेवायचे..
( बाकी पुढील भागात )
— तुषार पांडुरंग नातू
(कुतुहल, मित्रांचा आग्रह किंवा तात्पुरती मॊजमस्ती उसना आनंद म्हणून आयुष्यात प्रवेश केलेले दारु व इतर मादक पदार्थांचे व्यसन कसे आयुष्य उध्वस्त करते याचा मागोवा या सदरात घेतलेला आहे..)
Leave a Reply