झाले ठरले मग मी तीन चार मित्रांना ही आयडिया सांगितली ते आधी घाबरले म्हणाले काही भलते झाले तर एखादा खतरनाक आत्मा आला तर तो त्रास देईल , मग परत गेला नाही तर कसे ? अनेक शंका होत्या तरी कुतूहल मात्र सर्वाना होतेच त्या मुळे भीतीवर कुतूहलाने मात केली आणि ते तयार झाले , जागेचा प्रश्न होता कोणत्याही मोठ्या माणसाला हे सांगणे म्हणजे संकटच कारण कोणीच असे धंदे करायला परवानगी दिली नसती , एकाचे आईवडील दोघेही नोकरी करत असत त्याच्या घरी दुपारी प्लँन्चेट करायचे नक्की झाले .मग आम्ही दुपारी एकूण ५ जण त्याच्या घरी जमलो , सर्व तयारी केली एका गुळगुळीत पाटावर आकडे आणि अक्षरे लिहून झाले , उदबत्ती लावली , बाहेर कोणाला कळू नये म्हणून एकाने सर्व खिडक्या लावल्या पण मग दुसऱ्याने शंका काढली की सर्व जर बंद ठेवले तर आत्मा येणार कुठून ? शेवटी एकच खिडकी उघडी ठेवली ..
कोणाचा आत्मा बोलवायचा हा प्रश्न बाकी होता सर्वानी एकदम इतिहासातल्या आपापल्या आवडीच्या थोर व्यक्तींची नावे सुचवली ,पण इतक्या थोर व्यक्ती जास्त बिझी असणार तर येणार नाहीत म्हणून मग किरकोळ , सर्वसामान्य व्यक्तीचा आत्मा बोलवावा म्हणजे लवकर येईल व शक्यतो नात्यातील असेल तर लवकर येईल या कल्पनेने माझ्या आजोबांचा आत्मा बोलावण्याचे ठरले ते नैसर्गिकरित्या मरण पावले होते . उदबत्ती लावून आम्ही सर्व डोळे मिटून बसलो , वातावरणात गुढ शांतता पसरली , उदबत्तीचा धूर , आमच्या श्वासांचे आवाज देखील आम्हाला एकू येत होते , मी फुलपात्र घेऊन उदबत्तीचा धूर त्याच्या खोलगट भागात दाखवला , मग फुलपात्र तोंडाजवळ नेऊन आजोबांचे नाव घेऊन ‘ लवकर या ‘ असे म्हणून ते फुलपात्र पाटावर उपडे ठेवले , तिघांनी उजव्या हाताचे पहिले बोट त्यावर ठेवले , आणि फुलपात्र केव्हा हलते याची वाट पाहत बसलो सुमारे ५ मिनिटे झाली तरी काहीच हालचाल होईना इतक्यावेळ एका जागी शांत बसून राहणे मला कठीणच होते , माझी थोडी चुळबुळ सुरु होती आणि त्यातच माझ्या बोटाचा दाब त्या फुलपात्रावर वाढला आणि त्या दाबाने ते थोडे सरकले सर्वाना दिसले की भांडे थोडे सरकले …
एकदम आमच्या चेहऱ्यावर आनंद झळकू लागला , मला मात्र शंका होती की बहुतेक माझ्या हाताचा बोटाचा दाब वाढल्याने गुळगुळीत पाटावर ते सरकले असावे पण मी काहीच बोललो नाही कारण हा प्रयोग मीच करायला लावत होतो सर्वाना त्या मुळे तो यशस्वी व्हावा ही जवाबदारी पण अर्थात माझीच होती …भांडे हलल्या बरोबर एकाने प्रश्न विचारला , मी परीक्षेत पास होईन का ? बाकीचे त्याच्यावर ओरडले असे फालतू प्रश्न विचारू नको कारण आत्मा एका वेळी फक्त तीन प्रश्नांची उत्तरे देतो असे त्या पुस्तकात लिहिले होते , अर्थात त्या वेळी आमच्या जीवनात फारसे गंभीर असे प्रश्न उद्भवलेले नव्हतेच म्हणा शेवटी पास , नापास , आणि एखादी मुलगी आवडते तिला पण तसेच वाटते का वगैरे मिळून एकूण तीन प्रश्न विचारले गेले , मला खरी आईडिया कळली होती बोटाचा दाब हळूच त्या फुलपात्रा वर वाढवला की ते सरकते मग फक्त त्याला कोणाला नकळत दिशा दिली की काम फत्ते ..
या यशस्वी प्रयोगामुळे सर्व मित्रांमध्ये माझा मान वाढला होता , व आता आम्ही नेहमी प्लँचेट करू लागलो होते माझ्या दोन मित्रांना देखील माझी आयडिया कळली होती ते देखील आता भांडे नकळत कसे सरकावावे याचे तज्ञ झाले होते . आमचे हे प्रकार वाढल्यावर मोठ्या लोकांना समजलेच व ते आम्हाला रागावले म्हणाले हे आत्मे जर परत गेले नाहीत तर वांधे होतील , तुमचे जिणे कठीण करतील ते वगैरे . अनेकदा आत्म्याने दिलेले उत्तर बरोबर निघत असे त्यामुळे इतरांना विश्वास ठेवणे भागच होते .एकदा दिल्लीला आमच्या आत्याच्या घरी लग्नासाठी गेलो असताना तेथे आत्याच्या मुलीचे दागिने गहाळ झाले होते म्हणून मग मला प्लाँचेट करायला सांगण्यात आले , मोठी जवाबदारी होती मी जरा घाबरलोच होतो कारण पास , नापास , आणि दागिने यात मोठा फरक होता , शेवटी मी मनात आले तसे भांडे फिरवले आणि काय आश्चर्य सर्व उत्तरे तंतोतंत जुळली आणि दागिने सुरक्षित आहेत हे कळले . हा योगायोग म्हणावा की माझ्या अंतर्मनाची शक्ती ?
( बाकी पुढील भागात )
— तुषार पांडुरंग नातू
(कुतुहल, मित्रांचा आग्रह किंवा तात्पुरती मॊजमस्ती उसना आनंद म्हणून आयुष्यात प्रवेश केलेले दारु व इतर मादक पदार्थांचे व्यसन कसे आयुष्य उध्वस्त करते याचा मागोवा या सदरात घेतलेला आहे..)
Leave a Reply