नसलं तरी दाखवता आलं पाहिजे
लेव्हलचं सेटींग करता आलं पाहिजे..!!
काल केस कापून आलो.
आश्चर्य वाटलं ना? डोक्यावर फारसे केस नसताना ते कसे काय कापले बुवा, असंच वाटलं असेल ना तुम्हाला?
गंम्मत म्हणजे मलाही याचंच आश्चर्य वाटलं. मी महिन्यातून पाच वेळा केस कापतो. एका वेळेस ८० रुपये लागतात. या हिशोबाने महिन्याचे झाले ४०० रुपये. भरघोस जावळ असणारांच्या हेयर श्टायलीलाही महिनाभराचे इतके पैसे लागत नसणार..! मला आश्चर्य वाटलं ते हेच..!!
कमी केस असणारांना डोक्यावरचं केस असलेलं क्षेत्रफळ, केस नसलेल्या क्षेत्रफळाच्या लेव्हलमधे ठेवलं तरंच ते टक्कल बऱ्यापैकी बरं दिसतं;अन्यथा ते प्रमाणाबाहेर वाढलेले केस आर. के. लक्ष्मणांच्या ‘काॅमन मॅन’च्या केसांसारखे टकलाच्या दोहो बाजुला पिंजारल्यासारखे विचित्र दिसतात. तसं दिसू नये म्हणून माझे महिना अर्धा हजार खर्ची पडतात..!
कमी केसांवरून एक लक्षात आलं, मुळातच जे कमी असतं, ते बऱ्यापैकी आहे असं दाखवण्यात आपला बराच वेळ खर्ची पडतो. पैसेही जातात. त्याची लेव्हल मेन्टेन करणं म्हंजे लय कटकटीचं काम. खुप खर्च तरी करावा लागतो किंवा मग मेहेनत तरी करावी लागते..!!
आता बघा ना, सफेद कमी आणि काळे जास्त धंदे करुन गबर झालेल्यांना प्रतिष्ठेची लेव्हल सांभाळण्यासाठी मोठमोठाल्या रकमा डोनेशन द्याव्या लागतात, कुठल्या कुठल्या फकीरांच्या देवस्थानांना सोन्या-हिऱ्यांनी मढलेली सिंहासन द्यावी लागतात. कारण काळ्या पैशाबरोबर कमी झालेल्या प्रतिष्ठेची लेव्हल करुन घ्यावी लागते, तरच तो पैसा शोभतो. गरीबांची घरं-दारं विस्कटून निवडून आलेल्या नेत्यांना गरीबांच्या कल्याणाच्या घोषणा द्याव्या लागतात. कारण गरीबांच्या शापाची लेव्हल गरीब कल्याणाच्या नाटकाने केली तरच नेतागिरीची पातळी भरुन निघाल्यासारखी वाटते. दहिहंडी, गणपती, नवरात्रासारखे सण धुमधडाक्यात, प्रचंड पैसा खर्च करुन करावे लागतात तरच मुळातच नसलेल्या भक्तीची लेव्हल आहे असा देखावा करता येतो..अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील..!
हे सर्व मला माझ्या केसांसारखं वाटतं. डोक्यावर शिल्लक असलेले केस लेव्हल करत, डोक्यावरच्या केस नसलेल्या जागेशी लेव्हल केले तरच ते चांगलं दिसतं. अर्थात केसांचं चांगलं दिसण आणि वरील उदाहरणांतील ते ते दिसणं हे फक्त दिसणंच असतं. प्रत्यक्षात ते नसतंच. मग ते केस असोत की प्रतिष्ठा असो की नेतागिरी असो की भक्ती असो.. केसांची टकलाशी लेव्हल करुन, मी काॅमन मॅन असूनही ‘काॅमन मॅन’सारखा दिसू नये यासाठी माझीही धडपड सुरु आहेच की..
पण जाऊ दे, प्रत्यक्ष नसलं तरी चालेल, पण लेव्हलची सेटींग करुन दाखवता मात्र आलं पाहिजे, हा सध्याच्या यशस्वी होण्याचा मूलमंत्र झाला आहे, त्याला कोण काय करणार..!!
-नितीन साळुंखे
9321811091
माझं कार्टून महाराष्ट्राचे ज्येष्ठ व्यंगचित्रकार व माझे घनिष्ठ मित्र श्री. प्रभाकर वाईरकर यांनी काढलं आहे..
Leave a Reply