नोकरी करत असताना वेळ नव्हता म्हणून असे करणे जमले नाही. आणि स्वभावही नव्हता. त्यामुळे आता भरपूर वेळ मिळाला आहे म्हणून अशा उठाठेव करते पण फक्त मनातून. दोन दिवसांपूर्वी आमच्या गॅलरीतील आमच्या वर वारा आणि उन्हाचा त्रास न होउ देणाऱ्या नारळाच्या दोन तीन फांद्या छाटल्या. त्यामुळे मला राग आला होता. पण काय करणार नाइलाज म्हणून गप्प बसले…
पण उठाठेव करत होते की आमच तर नुकसान झाले आहे. वारा सावली याचं. त्यामुळे मी विचार करत होते की माझ्या घरी अशा फांद्या पडल्या की मी त्या ओल्या असतानाच मधल्या काडीच्या दोन्ही बाजू काढून टाकायची व घरीच खराटा करायची. नंतर आजूबाजूच्या बायका पण पडलेली फांदी विचारुन घेऊन जायच्या. त्यामुळे आमच्या पैशाची बचत झाली होती. आणि आताही तेच वाटले की त्या फांद्या सोसायटीत ठेवून साफसफाई करणाऱ्या भय्याजी यांना सांगितले असते तर….. मला माहित नाही की खराटा सोसायटी आणून देते की भैय्या स्वतःच्या पैशाने आणतात. कुणी का देइनात. पण असे केले असते तर पैसे वाचले असते ना. आणि समजा मी सांगितलं असतं तर कुणी ऐकतय का. उलट म्हणणार कशाला उगाच नुसती उठाठेव करता. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का. छे छे मला कसलाही प्रॉब्लेम नाही. फक्त वाटलं होतं म्हणून. आणि तुम्ही पण असेच म्हणणार. हे मला माहित आहे…
पैसा तर वाचतोच पण समाधान ते किती छान मिळते. जाऊ द्या आता याची सुध्दा गरज नाही. काम भागल्याशी मतलब…आणि म्हणूनच एक प्रसंग आठवला. गावी असताना पक्षकाराच्या शेतात हुरडा खायला गेलो की आधी हिरवा हरबरा याचा ढिग पडायचा आणि मग खाऊन झाल्यावर ते टहाळे फेकले जातात आणि नेमके माझी मोठी मुलगी लहान असताना ते सगळे आमच्या पिशवीत भरायची. आणि कारण सांगायची की आमच्या घरी गाय आहे तिला असे फार आवडते खायला म्हणून मी घेऊन जाणार आहे. त्यामुळे मलाही अशीच सवय झाली होती. भाज्यांची देठं. मटाराची सालपट वगैरे वगैरे जमले की मी फेकून दिले नाहीत तर घरासमोरच शेळ्या कोंबड्या सांभाळणारी एक शेजारीण होती तिला द्यायची. म्हणजे ही एक उठाठेवच की. अशा प्रकारे अनेक उठाठेव करणारी मी आता मनात तरी करु शकते ना. उठता येत नाही पण उठाठेव नक्कीच करता येते पडल्या पडल्या.
धन्यवाद
–सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply