पुण्याचे भरत नाट्यमंदिर हे रंगकर्मींसाठी एक संस्कार केंद्र आहे.
एकेकाळी तेथे कै सौ वसुमती विजापुरे एकपात्री अभिनय स्पर्धा होत असत. मीही अभिनयातील अंतःप्रवाह बघण्यासाठी, नव्या (त्यावेळच्या माझ्या) पिढीचे आकलन /जाणिवा/ अनुभव जाणून घेण्यासाठी तेथे खूप वर्षे आवर्जून जात असे.
एका संध्याकाळी एका बलदंड (शारीरिक आणि अभिनय दृष्ट्यासुद्धा) अभिनेत्याने केलेलं “नटसम्राट” मधील चार स्वगतांचे सादरीकरण बघून थरारलो. त्याहीआधी लागूंनी कुसुमाग्रजांच्या शब्दांना दिलेला अफाट न्याय मी अनेकवेळा नाट्यगृहात अनुभवलाय. पण पुनःप्रत्ययाचा आनंद लुटला. तीच चार स्वगते मी वालचंदच्या “आर्टस् सर्कल”च्या उदघाटन प्रसंगी सादर केली आणि त्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या यूथ फेस्टिवलमध्ये कोल्हापूरला! दोन्हीवेळी माझ्या रंगकामासाठी सांगलीचे आमचे “आजोबा” विसुभाऊ आवर्जून आले होते. हे माझं लागू नावाच्या हिमालयाशी पहिलं नातं !
कुसुमाग्रज-मराठी भाषेच्या महालातील एक समृद्ध दालन ! त्यांचे शब्द पेलणं भल्या भल्यांसाठी कायमचं /चिरंतन आव्हान ! त्यांच्या “नटसम्राट”ने हे आव्हान अजूनही जिवंत ठेवलंय – नुकतंच झी टीव्ही वर मोहन जोशींनी अभिनित केलेलं नटसम्राट बघण्याचा योग आला. त्यानंतर “माझा कट्टा” मध्ये शरद पोंक्षेंनीही हा विचार एकदा मनात येऊन गेल्याचे नमूद केले.
कुसुमाग्रजांचे शब्द लागूंच्या वाणीतून कृतार्थ झाले. त्यांच्यानंतर दत्ता भट /यशवंत दत्त यांनी साकार केलेले नटसम्राटही मला भावून गेले. पण लागूंचे interpretation आणि सादरीकरण केवळ ! त्यांच्या “लमाण” ने थरारून सोडले. Athlete/Philosopher ही स्वतःबद्दलची ओळख किती वेगळी ! “मी तो हमाल भारवाही” ही विनम्र भूमिका मांडणारा आणि अखेरपर्यंत जगणारा हा कलावंत !
त्याच्या निव्वळ अस्तित्वाने नाट्यगृहातील प्रेक्षक संमोहित होत हे मी ठाण्याच्या गडकरीमध्ये “सूर्य पाहिलेला माणूस” बघताना अनुभवलं. या शेवटच्या दर्शनालाही आता वीसहून अधिक वर्षे उलटून गेलीत.
लागू विद्यापीठ कोण पुढे चालविणार? फक्त दोन नावं माझ्यासमोर येतात – तितकेच समर्पित ,मेथॉडिकल कलावंत – विक्रम गोखले आणि अमीर खान ! संपली यादी ! कदाचित अतुल कुलकर्णीची वर्णी तेथे लागेल.
प्रेक्षकांचे उन्नयन करण्याची ताकत असणारा हा जागतिक अभिनेता,आपल्या भाग्याने आपल्याला लाभला. स्वतःला किती नशीबवान समजायचं?
लागूंच्या नंतर नटसम्राट केलेल्या काही कलावंतांची त्यांच्या आधीच रंगमंचावरून exit झालीय. हा “पहिला” आजपर्यंत गड लढवीत होता.
आता तोही शेक्सपियरला भेटायला आणि “not to be” हा आपला निर्णय सांगायला निघून गेला.
आपण पोकळ्या मोजत राहू या !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply