सकाळचा फेरफटका मारून घरी आलो. घरी येताच आठ महिन्याची नात मानसी रांगत रांगत माझ्याकडे आली आणि झेपावली. तिला मी लगेच उचलून घेतले. जवळ केले व तिचे पापे घेतले. किती आनंद आणि समाधान ती मला देत होती. नातवंड म्हणजे दुधावरची साय. ज्यांना त्यांचा सहवास लाभतो ते आजोबा आजी खरोखरच नशीबवान व भाग्यवान. आयुष्याची दोर पक्की करणे, आणि वाढविणे ह्या दोन्हीही गोष्टी निसर्ग त्यांच्या कडून करून घेत असतो. ह्यात शंकाच नाही.
लगेच सून बाहेर आली. ती मानसीची तक्रार करु लागली. ” बाबा हिने आज खूप उच्छाद मांडला. तिला शिक्षा करा. “
” काय केले मानसीने?” मी तिच्याकडे कौतुकाने बघत विचारले.
” बाबा मी स्वयंपाक करीत असताना, ती नजर चुकावून देवघरात गेली, आणि तिने देव्हाऱ्यातले देव ओढून पाडून अस्ताव्यस्त केले.”
देवघरातील देव ज्यांना भक्तिभावाने देवत्व दिले जात होते. आणि हे शुषु अवस्थेतील मुल, ज्यालाही एका द्र्ष्टीकोनातून देवत्व दिले जाते. अशा ह्या दोन देवांचे ते एक प्रकारे द्वंदच नव्हते काय? त्यात फक्त दर्शनी अस्ताव्यस्तपणा दिसला होता. त्यांच्या त्या लढाईमध्ये मी हतबल झालो असल्याचा भास होत होता. डोळे मिटून मी क्षमा मागत प्रार्थना करीत होतो. नातीला न समजणारी व देवाला ती पोहोंचली असेल का? हे मला न समजणारी.
आज तरी ह्या जगाचा, ह्या मिथ्या विश्वाचा तिला स्पर्श नाही. जो पर्यंत हे सभोवतालचे खोटे मुखवटे, आचरण, तिच्यावर आघात करून तिला तथाकथित सुसंस्कृत मानवामध्ये बदलणार नाहीत, तोपर्यंत हे लहानगे लेकरू, म्हणजे निसर्गाचीच एक अप्रतिम देणगी आहे. निसर्गाचा तो ठेवा आहे. एक ईश्वरी गुणधर्म, असे समजण्यास हरकत नाही. कश्यावरून मानसीच त्या आदिमायेचे जगदंबेचे स्वरूप नसावे? आज तरी आहे. काळाच्या ओघात तीचातले, नैसर्गिक ईश्वरी गुणधर्म लोप पावू लागतील व त्याची जागा कृत्रिमता घेईल.
तेव्हा मीच म्हणेन – –
ती म्हणजे- – – मानसी- – – शिकलेली शहाणी माझी नात.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply