लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि अंगी ज्ञानलालसा असल्यामुळे मॅट्रिकच्या परीक्षेत बॅरिस्टर नाथ पै हे चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाले. त्यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२२ रोजी झाला. विद्यार्थी दशेतच स्वातंत्र्य चळवळीत घेतलेल्या सहभागामुळे त्यांनी तुरुंगवास भोगला होता. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतांनाही, आर्थिक मदत मिळवून ते बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले होते. बॅ. पै यांचे मराठी व इंग्रजीवर कमालीचे प्रभुत्व होतेच, शिवाय ते उत्तम जर्मनही बोलत असत.
इंग्लंडमध्येच असताना त्यांचे समाजावादी विचारवंत नेत्यांशी संबंध जुळून आले. त्यामुळे त्यांच्या विचारांवर समाजवादी विचारांचा प्रभाव होता. पुढे त्यांनी प्रसमाजवादी पक्षाचे नेतेपण स्वीकारले. उत्कृष्ट वक्तृत्वकला आणि कोणत्याही गोष्टीचा चिकित्सक अभ्यास करण्याची वृत्ती या गुणांवर भारतीय संसदेत एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांनी नाव मिळवले. भारतीय घटनेवर त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यामुळे संसदीय कामकाज आणि त्यातील बारकावे याबद्दल त्यांचे ज्ञान वाखाणण्यासारखे होते. त्यांचे पाठांतर उल्लेखनीय होते. मराठी, हिदी, संस्कृत आणि इंग्रजी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. स्वातंत्र्यपूर्व काळात भूमिगत चळवळीत काम करणार्या नाथ पै यांनी स्वातंत्र्योत्तर काळात साराबंदी आणि सीमाप्रश्नावर आंदोलन उभे केले.
निर्भयपणा, स्पष्टवक्तेपणा आणि अभ्यासू वृत्ती असलेला सुसंस्कृत राजकारणी म्हणून बॅरिस्टर नाथ पै प्रसिद्ध होते. महाबळेश्वर येथे भरलेल्या १९७० च्या मराठी साहित्य संमेलनाचे ते उद्घाटक होते. संसदेतील त्यांची अनेक भाषणे गाजली. त्यांची भाषणे ऐकण्यासाठी पं नेहरू सभागृहात येऊन बसत. कोकणातील राजापूर मतदार संघातून ते १९५७, ६२ व ६७ अशा तीन निवडणुकांत प्रजा समाजवादी पक्षाच्या तिकिटावर लोकसभेत निवडून आले. आज अस्तित्वात असलेली ‘कोकण रेल्वे’ची मूळ कल्पना त्यांनीच संसदेत ‘किनारपट्टी रेल्वे’ म्हणून मांडली होती. बॅरिस्टर नाथ पै यांचे १८ जानेवारी १९७१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply