मंडळी आपल्या आयुष्यात एक तरी व्यक्ती अशी असते की , जी शरीरस्वास्थ्याला घेऊन खूप गंभीर असते. बरेचदा अशी व्यक्ती खूप चांगल्या शरीरयष्टीची असते , सुदृढ असते. त्या व्यक्तीला बघून सगळे आकर्षित होतात. कारण ती व्यक्ती चारचौघात त्याच्या शरीरयष्टीमुळे उठून दिसत असते. सगळ्या तरुणांना आपला शरीराचा बांधा तसाच असावा असं वाटत असतं. मग नियमित व्यायाम करायला सुरुवात होते , रोज आरशात पहायला सुरुवात होते. पण बरीच मेहनत करूनही बरेचदा शरीरयष्टीमध्ये काही फरक पडत नाही किंवा थोडासाच बदल होतो. मग बरेच लोक नाराज होऊन व्यायाम करणं सोडून देतात , पण त्यांना ही गोष्ट कळत नाही की , जेवढा व्यायाम आपण करतो तेवढा संतुलित आहार आपल्याला घ्यावा लागतो. हा आहार काय असावा , किती प्रमाणात असावा , काय खावं , काय खाऊ नये ह्याचं योग्य ते प्रमाण कळल्याशिवाय शरीरातील पेशी पोषक होत नाहीत. फिटनेस ट्रेनरही हीच गोष्ट सांगतो की व्यायाम २५ ते ३०% करायचा आणि आहार हा ७५ ते ७०% घ्यायचा. आता आपल्याला काय खायचं काय नाही खायचं हे आपल्या बी.एम.आय. (BMI) वरून कळतं. बी एम आय म्हणजे बॉडी मास इंडेक्स. न्यूट्रीशनिस्ट ह्याच्या आधारावरच आपल्या खाण्याचा तक्ता , वेळा ठरवीत असतात. त्यांनी सांगितलेल्या वेळा , खाण्याचं प्रमाण , पथ्य सांभाळून व्यायाम करून जर योग्य प्रमाणात शरीराला आराम मिळाला तर तुमची शरीरयष्टीदेखील चारचौघात उठून दिसण्यासारखी होईल.
आज दिनांक १ सप्टेंबर. १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर हा आठवडा भारतात राष्ट्रीय पोषण सप्ताह म्हणून साजरा केला जातो. ह्या सप्ताहाची सुरुवात फूड अँड न्यूट्रीशन बोर्डाने केली.
सध्याच्या काळाची पाऊलं ओळखत आपणही संतुलित आहार घेण्यास सुरुवात केली पाहिजे. ह्याने झाला तर फायदाच होईल तोटा होणार नाही.
सगळ्यांना राष्ट्रीय पोषण सप्ताहाच्या हार्दिक शुभेच्छा.
– आदित्य दि. संभूस.
National Nutrition Week
Leave a Reply