नवीन लेखन...

राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह

दर वर्षी सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा राष्ट्रीय पोषण आहार-सप्ताह म्हणजेच नॅशनल न्यूट्रिशन वीक म्हणून भारतात साजरा होतो. हा साजरा करण्याचा मूळ उद्देश आहाराबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे असा आहे. आहाराचा परिणाम शरीरावर होतो. चांगला, सकस व समतोल आहार घेतला तर बरेचसे आजार टाळता येतात किंवा लांबणीवर टाकता येतात. त्यामुळे चांगल्या स्वास्थ्याचे गुपित हे चांगल्या आहारात आहे. सर्व लोक सुदृढ असतील तर आरोग्यदायी राष्ट्र निर्माण होते व त्यामुळे देशाची आर्थिक बाबतीत प्रगती होते. या उद्देशाने १९८२ पासून सप्टेंबरचा पहिला आठवडा महिला व बाल विकास मंत्रालयाच्यातर्फे राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह (नॅशनल न्यूट्रिशन वीक) म्हणून साजरा केला जातो.

आहाराचे महत्त्व सर्वाना माहीत असते, पण आहार/अन्नाबद्दल फार गैरसमज आहेत. यामुळे अन्नपदार्थाबद्दल जागरूकता फार आवश्यक आहे. जर आहाराची वैज्ञानिक माहिती साध्या-सोप्या भाषेत मिळाली तर सर्वाना काय खायचे, किती खायचे हे प्रश्न पडणार नाहीत. असे झाल्याने आजारी पडल्यावर आहाराचे ‘पथ्य’ करण्यापेक्षा रोजच्या दैनंदिन जीवनात चांगले अन्नपदार्थ निवडण्यास मदत होईल.

समतोल आहार न घेतल्यामुळे ‘कुपोषण’ व ‘अतिपोषण’ असे दोन्ही विकार होऊ शकतात. आपल्या देशात लहान मुले व स्त्रियांमध्ये कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे. याकरिता सरकारद्वारा ‘इन्टीग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम’, ‘मिड-डे मील’ असे कार्यक्रम राबविले जातात. यामध्ये लहान मुले, गरोदर स्त्रिया यांना आहाराबद्दलचे ज्ञान दिले जाते.

अतिपोषण हा आपल्या देशात नवीन, पण वाढती समस्या झाली आहे. अतिपोषण हेसुद्धा एक प्रकारचे कुपोषण आहे. याचे कारण असे आहे की, अतिपोषण असलेल्या व्यक्तीच्या आहारात एक किंवा दोन अन्नघटकांवर जास्त भर असतो व इतर अन्नघटक व जीवनसत्त्वे, खनिज पदार्थ यांचा अभाव आढळून येतो. अतिपोषणामुळे स्थूलता, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग होण्याची शक्यता वाढते. अतिपोषित रुग्ण/व्यक्तींमध्ये प्रथिने, व्हिटॅमिन बी१२, व्हिटॅमिन डी यांचे कुपोषण आहे, असे आढळून येते.

अतिपोषणासाठी सरकारतर्फे कोणत्याही योजना नसल्या तरी सर्वात महत्त्वाचे म्हणजे अतिपोषण असलेल्या व्यक्तींना इतर त्रास होण्यापूर्वी ओळखणे महत्त्वाचे आहे. त्यांना आहाराचा फक्त सल्ला न देता आहाराचे ज्ञान देणे आवश्यक आहे. कारण सल्ला दिल्यानुसार जेवणे रोजच शक्य होत नाही. पण आहाराचे ज्ञान असले तर समोर असलेल्या अन्नपदार्थातून स्वत:करिता चांगले असे अन्नपदार्थ निवडता येतात. अन्नपदार्थातील अन्नघटक व जीवनसत्त्व ओळखणे फारसे कठीण नाही. अशा तऱ्हेने आहाराबद्दलचे ज्ञान दिले व त्याच्या मनातील अन्नाबद्दलच्या गैरसमजुती दूर केल्या तर समतोल आहार घेण्याची त्याची इच्छा पक्की होईल.

आजकालच्या जीवनशैलीत आहाराचे ज्ञान असणे फारच आवश्यक आहे. याचे दुसरे कारण असे की, धावपळीच्या जीवनात आपण बाहेरचे जेवण, विकतच्या फराळाचे पदार्थ, प्रक्रिया केलेले अन्न जसे रेडिमेड सूप, रेडिमेड मसाला यावर अवलंबून असतो. विकत घेताना आपण ते नावाजलेल्या/चांगल्या कंपनीचे आहे व एक्सपायरी डेट कधीची आहे, एवढेच पाहातो. त्या वस्तूत काय घटक आहेत व त्यातून किती ऊर्जा, प्रथिने, कबरेदके, स्निग्ध पदार्थ मिळतात ही माहितीपण असते. याचबरोबर त्यात साखरेचे, मिठाचे प्रमाण, प्रीझरव्हेटिव्हचा वापर याबद्दलचीही माहिती असते. पण ती फार तांत्रिक किंवा वैज्ञानिक आहे असे समजून त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. ही माहिती वाचली तर आपल्याला अन्नपदार्थ निवडण्यास मदत होते. त्याचबरोबर आपण काय खातो आहोत याबद्दल मनात जागरूकता निर्माण होते. या कारणामुळे अन्नपदार्थ विकत घेताना, मग ते बिस्किट असो किंवा खायचे तेल असो, माहिती वाचणे गरजेचे आहे!

मोठे झाल्यावर आपल्याला एक विशिष्ट प्रकारचे अन्न खायची सवय होते. ही सवय आपल्याला लहानपणापासून आहे म्हणून आता मोडता येत नाही, असे सर्व लोक म्हणतात. या कारणामुळे लहानपणी/ शाळकरी मुलांमध्ये अन्नाचे/ आहाराचे ज्ञान देणे फार आवश्यक आहे. जर मुलांमध्ये चांगले अन्न खाण्याच्या सवयी लावल्या तर त्यांना मोठेपणी पथ्य पाळावे लागणार नाही. ‘न्यूट्रिशन वीक’मध्ये शाळकरी मुले व त्याच्या पालकांना आहाराचे ज्ञान दिले जाते. शाळेतसुद्धा डब्यातून मुलांनी चमचमीत फराळाचे पदार्थ न आणता साधे, सकस, घरी केलेले न्याहारीचे पदार्थ किंवा ‘पोळी-भाजी’ असे पदार्थ आणावे, असे नियम केले पाहिजेत. काही शाळांमध्ये लहान मुलांना डबा नेमून देण्यात येतो. जसे ‘फ्रूट डे’, ‘सॅलड डे’, ‘स्प्राऊट डे’ इत्यादी. असे केल्याने मुलांना आहाराच्या चांगल्या सवयी लागतात. त्यांना आपण चमचमीत पदार्थातून वंचित राहतो आहोत असे वाटू नये म्हणून ‘जंकफूड डे’ म्हणजे त्या दिवशी वेफर्स, चिप्स, बिस्किट्स असे पदार्थ आणता येतात. असे केल्यामुळे मुलांना आपोआप कळते की, आठवडय़ातून रोज साधे, सकस अन्न, फळे, भाज्या खाल्ल्या की एखादा दिवस आवडीचे पदार्थ खाता येतात. असे लहानसहान उपाय करून शाळकरी मुलांच्या अन्नाच्या सवयी बदलता येतात व त्यांना योग्य आहाराचे शिक्षण देता येते.

प्रत्येक अन्नघटकाचे महत्त्व वेगवेगळ्या वयोगटांत बदलते. आहाराची माहिती साधारणत: मुलांसाठी किंवा गरोदर महिलांकरिता असते अशी समजूत आहे. लहान वयात व गरोदरपणात आहाराची जास्त गरज असते हे खरे असले तरीही आयुष्यातील प्रत्येक वयोगटात आहाराचे महत्त्व कमी होत नाही!

पोषण आहार आहारात हे असू द्या.

राजगिऱ्याचा लाडू/वडी व दूध वा ताकातून राजगिऱ्याच्या लाह्य़ा

चण्याचे सूप- रात्री चणाडाळ धुऊन भिजत घाला. सकाळी त्यात २ ग्लास पाणी घालून उकळून शिजवून घ्या. डाळीवरील फक्त पाणी बाजूला काढून त्या पाण्यात चवीनुसार मीठ, हिंग, काळे मिरे व कोथिंबीर घाला. गरमागरम पिण्यास हे चण्याचे सूप छान लागते.

विविध उसळींमध्ये कांदा, लसूण आणि कोथिंबीर जरूर घाला आणि जेवायच्या वेळी त्यात वरून लिंबू पिळा.

तीळ, दाणे आणि जवस सम प्रमाणात घेऊन त्यात जिरे, तिखट व मीठ घालून चटणी करून ठेवा. रोजच्या जेवणात ही चटणी घ्या.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..