३० मार्च १८५८, अमेरिकन शास्त्रज्ञ हॉफमन लिनमन यांना रबर-टिप्ड पेन्सिल बनविण्याचे पेटंट मिळाले. बऱ्याच युरोपियन देशांमध्ये याला फ्री पेन्सिल डे देखील म्हटले जाते कारण या दिवशी पेन्सिल विनामूल्य वितरित केल्या जातात.
१६२२ पासून युरोपमध्ये पेन्सिलचे उत्पादन केले जात आहे. जुन्या काळातील पेन्सिली आजच्या पेन्सिल पेक्षा वेगळ्या असायची. पहिली अमेरिकन पेन्सिल १८१२ मध्ये तयार झाली. असे मानले जाते की एक सामान्य पेन्सिल सुमारे ४५,००० शब्द लिहू शकते. तसेच, एका पेन्सिलने सुमारे ३५ मैल लांब रेषा काढता येते. पेन्सिलने शून्य गुरुत्वाकर्षणात लिहिणे देखील शक्य आहे. फाऊंटन पेन, बॉल पेन यांच्या तडाख्यातही पेन्सिलीने सहज तग धरला आहे. कॉम्प्युटर व वर्ड प्रोसेसिंगच्या जमान्यातही ती कदाचित तग धरून राहील असे दिसते.
वॉल्ट डिस्ने घरात व ऑफिसमध्ये अनेक ठिकाणी पेन्सिली मुद्दाम ठेवे. कोठेही व केव्हाही कल्पना सुचली की भिंतीवर लगेच तो लिहून ठेवी. एडिसन स्वत:साठी खास लांबीने लहान असलेल्या पेन्सिली बनवून घेई. मोठय़ा पेन्सिली कोटाच्या खिशाच्या शिलाईत अडकतात अशी तक्रार करे. हेमिंग्वे लेखनाचा मूड बनवण्यासाठी पेन्सिली तासणे सुरू करे. रोज दोन पेन्सिली तरी लिहून संपवण्याचा त्याचा प्रयत्न असे.
स्वातंत्र्यपूर्व काळातही भारतात पेन्सिल उत्पादन होत होतं, पण जर्मनी, जपान, इंग्लंड इथून आयात होणाऱ्या परदेशी बनावटीच्या पेन्सिल्ससोबत तगडी स्पर्धा होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात परदेशातून येणाऱ्या पेन्सिल्सचा ओघ आटला आणि आपल्या देशी पेन्सिलच्या उत्पादनाला चालना मिळाली. त्यात अनेक कंपन्या पेन्सिल बनवू लागल्या.
पेन्सिलीचा इतिहास हेन्री पेट्रोस्की यांनी ‘द पेन्सिल : अ हिस्ट्री’ या पुस्तकात उलगडून सांगितला आहे. या पुस्तकात पेन्सिल बनवण्याची फ्रेंचांनी शोधलेली ‘कॉन्ते’ पद्धत दिलेली आहे. कोहिनूर कंपनीने लिहिलेले ‘हाऊ पेन्सिल इज मेड?’ हे प्रकरणही दिलेले आहे.
Leave a Reply