सुप्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमण रामन यांच्या रामन इफेक्ट (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅचरिंग) हे संशोधन प्रकाशित होण्याच्या स्मरणार्थ दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. डॉ. सी. व्ही. रमण रामन यांनी, त्यांचे प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅचरिंग बद्दलचे संशोधन २८ फेब्रुवारी १९२८ या दिवशी जाहीर केले होते. पुढे त्यांना १९३० साली त्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले. म्हणून हा दिवस ’राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो. शास्त्रज्ञ डॉ.वसंतराव गोवारीकर १९८७ साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांनी ज्या विविध योजना सुरू केल्या त्यातील एक योजना म्हणजे देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणे.
राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी कोणती तारीख निवडावी यासाठी तेव्हा खूप चर्चा झाली होती. चर्चेत डॉ. वसंतराव गोवारीकरांच्या मनात आले की अरे! हा तर राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी दिवस शोधायचा आहे आणि भारतात विज्ञानाचा एकमेव नोबेल पुरस्कार डॉ. सी. व्ही. रामन यांना मिळाला आहे, तर त्यांच्याशी संबंधितच तो दिवस असावा. शिवाय तो त्यांचा जन्म अथवा मृत्युदिन निवडण्यापेक्षा त्यांनी ज्या दिवशी त्यांचा निबंध जगप्रसिद्ध ‘नेचर’ या विज्ञान मासिकाला पाठवला आणि ज्याला पुढे १९३० साली नोबेल पुरस्कार मिळाला ती तारीख का निवडू नये? अखेर ती तारीख निघाली २८ फेब्रुवारी. भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन २८ फेब्रुवारी १९८७ पासून साजरा केला जात आहे.
डॉ. सी. व्ही. रामन यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर वेंकट रामन. त्यांचा जन्म तिरुचिरापल्ली येथे ७ नोव्हेंबर १८८८ रोजी झाला. त्यांचं शिक्षण चेन्नईला झालं. सन १९१७ ते १९३३ पर्यंत त्यांनी भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केलं. १९४७ साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले. १९५४ मध्ये भारतरत्न पुरस्कार देवून भारत सरकारने त्यांचा व त्यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच १९५७ मध्ये त्यांना लेनिन शांतता हा पुरस्कारही देण्यात आला होता.
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. डॉ. सी. व्ही. रमण यांना मानाचा मुजरा.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply