
राष्ट्रीय खेळ दिवस हा सगळ्या देशांमध्ये खूप उत्साहात साजरा केला जातो. पण ह्याच दिवशी हा दिवस का साजरा केला जातो? ह्याच तारखेला हा दिवस साजरा करण्यामागे कारण आहे आणि ते कारण म्हणजे भारताचे सुप्रसिद्ध हॉकीपटू मेजर ध्यानचंद ह्यांचा जन्म. मेजर ध्यानचंद यांचा जन्म प्रयागराज अलाहाबाद येथे दिनांक २९ ऑगस्ट १९०५ रोजी झाला. मेजर ध्यानचंद ध्यानचंद यांनी १९३६ साली बर्लिन येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाचे कर्णधार पद भूषविलं होतं. ह्यावर्षी भारतीय हॉकी संघाने चमकदार कामगिरी करीत , सुवर्णपदकावर आपलं नाव सुवर्णाक्षरात कोरलं होतं. आपण थोडक्यात माहिती घेऊ.
प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर ध्यानचंद यांनी १९२२ साली भारतीय सैन्यात सैनिक म्हणून प्रवेश केला. ध्यानचंद सिंग हे एक सच्चे खेळाडू होते. त्यांना सुभेदार मेजर तिवारी यांनी हॉकी खेळण्यास प्रवृत्त केलं. ध्यानचंद यांनी त्यांच्या देखरेखीखाली हॉकी शिकण्यास प्रारंभ केला. त्यांच्या खेळातील उत्कृष्ट कामगिरीमुळे १९२७ मध्ये त्यांची ‘ लान्स नाईक ’ या पदावर नियुक्ती करण्यात आली. पुढे १९३२ साली नायक तर १९३६ साली सुभेदार या पदावर ते सक्रिय होते. कालांतराने लेफ्टनंट , कॅप्टन हा प्रवास करून , मेजर पदावर त्यांची पदोन्नती झाली.
मेजर ध्यानचंद इतके महान हॉकी खेळाडू होते की , एकदा त्यांच्या हॉकी स्टिक मध्ये बॉल अडकला की सरळ गोल झाल्यावरच तो बाहेर पडत असे. ह्याच कारणामुळे एका सामन्यात , ते खेळत असताना त्यांची हॉकी स्टिक त्यात चुंबक आहे का हे तपासण्यासाठी तोडण्यात आली होती.
मेजर ध्यानचंद हे ऑलिम्पिक स्पर्धेत तीन वेळा सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे सदस्य होते.
१९२६ ते १९४८ च्या कारकिर्दीत त्यांनी केलेल्या १००० गोल्स पैकी ४०० आंतरराष्ट्रीय गोल्स त्यांच्या नावावर नोंदविले आहेत.
अशा दिग्गज खेळाडूला श्रद्धांजली म्हणून भारत सरकारने २०१२ सालापासून त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. ह्या मान्यतेपुर्वी १९५६ साली त्यांना भारत सरकारतर्फे पद्मभूषण ह्या किताबाने पुरस्कृत करण्यात आलं. हा आपल्या देशातील तिसरा सर्वात मोठा नागरी पुरस्कार आहे.
दरवर्षी हा पुरस्कार सोहळा राष्ट्रपती भवनात आयोजित केला जातो आणि ह्या दिवशी राष्ट्रपती स्वतःच्या हाताने ज्या खेळाडूंनी जगभरात तिरंग्याचे महत्व वाढवलं , त्या खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारानी पुरस्कृत करतात. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांतर्गत खेळाडू व माजी खेळाडूंना राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार , अर्जुन पुरस्कार , द्रोणाचार्य पुरस्कार अशा नामवंत पुरस्कारांसहित अनेक पुरस्कारांनी भूषविण्यात येते.
१९७९ मध्ये मेजर ध्यानचंद ह्यांच्या निधनानंतर , भारतीय टपाल खात्यानेही त्यांचं टपाल तिकीट तयार करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांना आदरांजली म्हणून दिल्लीतील राष्ट्रीय स्टेडियमचेही मेजर ध्यानचंद स्टेडियम असं नामकरण करण्यात आलं.
इतक्या महान व्यक्तीचा जन्मदिवस आपण घरात मोबाईल आणि संगणकावर खेळ खेळून साजरा करण्यापेक्षा मैदानात जाऊन खेळ खेळून करूया.
– आदित्य दि. संभूस
#National Sports Day #Major Dhyanchand
Leave a Reply